अन्य कुणी असते तर कदाचित असे न घडते; भारताचे खरे रत्न आहेत डॉ. मनमोहन सिंग

By विजय दर्डा | Published: February 12, 2024 07:32 AM2024-02-12T07:32:32+5:302024-02-12T07:33:24+5:30

आर्थिक विकासाचा पाया घालणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांची प्रशंसा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षभेद दूर सारले आहेत !

Special Article on Former Prime Minister of India Dr. Manmohan Singh | अन्य कुणी असते तर कदाचित असे न घडते; भारताचे खरे रत्न आहेत डॉ. मनमोहन सिंग

अन्य कुणी असते तर कदाचित असे न घडते; भारताचे खरे रत्न आहेत डॉ. मनमोहन सिंग

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील एक छायाचित्र आठवा. ‘दिल्ली कॅपिटल टेरिटरी बिल’ दुरुस्तीसाठी राज्यसभेत मतदानाला आले होते. काँग्रेसने विधेयकाला विरोध केला होता; परंतु बहुमत सरकारच्या बाजूने असल्याने निकाल आधीच स्पष्ट होता. तरीही माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर बसून संसदेच्या सभागृहात पोहोचले होते. अन्य कुणी असते तर कदाचित असे न घडते. परंतु डॉ. सिंग यांना त्यांचे कर्तव्य नेहमीच सर्वतोपरी वाटत आले. ते भारताच्या आर्थिक सुधारणेचे प्रणेते! भारतासाठी जगाचे आणि जगासाठी भारताचे दरवाजे उघडण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. राजकारण बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली अशा व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा महत्त्वाची आहे.

मी १८ वर्षे संसदेचा सदस्य होतो. या काळात डॉ. सिंग यांचे निकटचे साहचर्य मला मिळाले. आपल्याकडचे सर्वश्रेष्ठ  ते देशाच्या लोकशाहीला कसे अर्पण करावे, हे मी त्यांच्यापासून शिकलो. काही अडचण आली तर त्यांना जाऊन विचारण्याचा संकोच मी कधी केला नाही; ना त्यांनी मला सल्ला देताना काही हातचे राखून ठेवले. त्यांच्या स्नेहास पात्र होणे ही भाग्याची गोष्ट होती. भारताला जगाच्या पातळीवर सशक्त कसे करावे, याबाबतीत त्यांचा दृष्टिकोन नेहमीच स्पष्ट राहिला. भारतीय रिझर्व्ह  बॅंकेचे गव्हर्नर आणि कुशल अर्थशास्त्री म्हणून मनमोहन सिंग यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्यातील अद्वितीय प्रतिभा पी. व्ही. नरसिंह राव यांनी ओळखली. राव यांच्या सरकारमध्ये  १९९१ ते १९९६ या काळात डॉ. सिंग अर्थमंत्री होते. याच काळात भारताने जागतिकीकरणाच्या दिशेने पावले टाकली. भारतातले बदनाम लायसन्स आणि परमिटराज त्यांनी संपविले. त्यानंतर भारताच्या बुडत्या अर्थव्यवस्थेने हातपाय हलवायला सुरुवात केली. अख्ख्या जगाने त्याचे कौतुक केले.

२००४ साली डॉ. सिंग पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना ‘ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ म्हटले गेले. परंतु एरवी गप्प राहणाऱ्या डॉ. सिंग यांनी ते एक सर्वोत्तम पंतप्रधान होते याची नोंद इतिहासात केली. दहा वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशाला जी दिशा आणि गती दिली त्याची फळे आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारत जगातली पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था झाला असून, तिसऱ्या स्थानी येण्यासाठी आपण आगेकूच करतो आहे. यात डॉ. सिंग यांच्या धोरणांचे मोठे योगदान आहे. त्यांनी केवळ देशाच्या आर्थिक उन्नतीवर लक्ष केंद्रित केले  नाही, तर त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक सुरक्षेच्या अनेक योजना कालजयी ठरल्या. देशाला विकासाच्या रस्त्यावर पुढे घेऊन जाईल, असे महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षण, हे ते जाणून होते,  म्हणून त्यांनी सहा ते चौदा या वयोगटातल्या प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मौलिक अधिकार मिळवून दिला. सर्व काही पारदर्शक असेल तर लोकशाही मजबूत होईल, असा त्यांचा विश्वास होता; म्हणून त्यांच्या सरकारने सामान्य माणसाला माहितीचा अधिकार दिला.

कोणी भूकबळी ठरू नये यासाठी खाद्यसुरक्षा कायदा त्यांनी केला. भूसंपादन कायदा तसेच वनअधिकार कायदा ही सुद्धा त्यांच्या कार्यकाळाची देणगी आहे. प्रत्येक ग्रामीण परिवाराला वर्षातून कमीत कमी १०० दिवस काम देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम त्यांच्या सरकारने आणला. त्यालाच आता मनरेगा या नावाने ओळखले जाते. जगातली ही  अनोखी अशी रोजगार योजना आहे. गर्भावस्थेपासून माता आणि बाळाची काळजी घेणारी इंदिरा गांधी मातृत्व योजना त्यांनी आणली. आर्थिक मदत आणि अन्य सामुग्रीची व्यवस्था त्यातून केली गेली.

या सर्व योजनांच्याही खूपच पुढचा विचार दाखविणारी एक योजना डॉ. मनमोहन सिंग यांनी  देशाला दिली : आधार कार्ड ! संयुक्त राष्ट्रांनी आधार कार्ड योजनेची पुष्कळ प्रशंसा केली; परंतु कमालीची गोष्ट अशी की आधार कार्ड योजनेविषयी संशय घेणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. त्यावेळचा विरोधी पक्ष आधार कार्डाविषयी आक्रमक होता. ‘हे कार्ड तयार करण्यासाठी सरकार लोकांकडून माहिती घेईल; पण त्याचा दुरुपयोग झाला तर काय?’- असा प्रश्न लोकांच्या मनात पेरला गेला. पण त्याविषयीच्या शंका-कुशंका निराधार ठरल्या. आज आधार कार्ड सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. पॅन कार्ड असो, मोबाइल नंबर की बँकेचे खाते; सगळीकडे आधार कार्ड अनिवार्य आहे. आपण ज्या वेगाने डिजिटलायझेशनच्या दिशेने जात आहोत, त्यात आधार कार्डाचे खूप मोठे योगदान आहे. आपण याचे श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना दिले पाहिजे.

वर्तमानकालीन आणि येऊ घातलेल्या प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाऊन उपाय शोधायचा डॉ. मनमोहन सिंग यांचा प्रयत्न असे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारताचा अमेरिकेशी झालेला अणुविषयक करार हा आपल्या देशाच्या इतिहासातला एक मैलाचा दगड आहे. त्यांनी स्वतः या कराराला ‘आपली सर्वांत मोठी उपलब्धी’ म्हटले होते. भारताला परमाणू इंधन खरेदी करता येणे, तसेच परमाणू संयंत्रांसाठी इंधन तंत्रज्ञान हस्तगत करणे या करारामुळे शक्य झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी तत्कालीन अमेरिकी राष्ट्रपती जॉर्ज बुश यांना मोठी आस्था होती. डॉ. मनमोहन सिंग या नेक माणसाची इमानदारी नेहमीच निर्विवाद राहिली आणि राहील ! भारताचे हे लाडके नेते राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. डॉक्टर साहेबांना प्रदीर्घ आयुष्य लाभो, त्यांची प्रकृती उत्तम राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना !

vijaydarda@lokmat.com

Web Title: Special Article on Former Prime Minister of India Dr. Manmohan Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.