विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 06:35 IST2025-11-03T06:34:51+5:302025-11-03T06:35:21+5:30

धर्म, जात, पंथ यांच्या लढाया सोप्या असतात; पण शेतकऱ्यांसाठी लढणं सर्वांत कठीण. कारण, प्रश्न सारखे असले, तरी शेतकरी विखुरलेला आहे.

special article on farmers loan waiver proptest march by bacchu kadu mahaelgar morcha | विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

बच्चू कडू, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती संघटना

ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अवस्था बघून मन हेलावून जायचं. कुणाचं पीक अतिवृष्टीने, तर कुणाचं कमी पावसाने गेलेलं. कुठे वादळाचा फटका बसून संसार उद्ध्वस्त झालेला. अस्मानी अन् सुल्तानी संकटात शेतकरी पुरता अडकला आहे. सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे, स्थिर भाव न मिळाल्यामुळे त्याच्या घामाचं सोनं तर सोडा, उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्याला सन्मानाने जगताही येत नाही. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार सगळ्यांची अवस्था तशी सारखीच. या सगळ्यांची एक मूठ बांधून नाव ठेवलं... ‘महाएल्गार!’ 

१४ मार्च २०२५. रंगपंचमीचा दिवस. त्या दिवशी तब्बल २० किलोमीटरचा रस्ता आम्ही ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे’ या घोषणेने रंगवला. ती रंगपंचमी आंदोलनाच्या ठिणगीचा दिवस ठरला. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा, हमीभावाचा लढा जसा महत्त्वाचा; तसा समाजातील मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी युनियन यांच्या समस्या शासन दरबारी मांडणंही महत्त्वाचं! अशी आंदोलनं उभी करणं आणि ती टिकवणं जिकिरीचं असतं, हे लक्षात घेऊन नियोजनासाठी प्रशिक्षण व बैठका झाल्या. सुरुवातीला अशक्य वाटणारं हे आंदोलन लोकांनी एकत्रित उचलून धरलं. रंगपंचमीनंतर लगेच रायगडच्या पायथ्याशी तीन दिवसांचं उपोषण आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा हा पहिला गंभीर प्रयत्न होता. ७ एप्रिलला मुख्यमंत्री, तर १७ एप्रिलला कृषिमंत्र्यांसोबत बैठक घेतली. कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना मानधन, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या हे सर्व मुद्दे मांडले. कार्यकर्ते जमत गेले. गट तयार झाले. लढा संघटित स्वरूपात पुढे जाणार हे ठरलं.

१४ मे रोजी छत्रपती संभाजीनगरात हजारो ट्रॅक्टर रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांचा आवाज आता केवळ घोषणांमध्ये नव्हे, तर कृतीत उमटू लागला. ‘आता थांबणार नाही!’ या घोषणेनं संपूर्ण राज्य दणाणून गेलं. ८ ते १५ जून – गुरुकुंज मोझरीत अन्नत्याग आंदोलन केलं. १४ जूनला महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी लेखी आश्वासन दिलं. त्या क्षणापासून शासनालाही जाणवलं, हा लढा थांबणार नाही. भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळपासून पहिली आत्महत्या करणारे शेतकरी साहेबराव करपे पाटलांचे चिलगव्हाण आणि पुढे आंबोडा या मार्गाने आम्ही १५० किलोमीटरची पायदळ यात्रा काढली. ‘कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही’, ‘सातबारा कोरा कोरा कोरा’ या घोषणांनी महाराष्ट्राच्या मातीत नवा उत्साह भरला. 

८ ऑगस्टला पुण्यात शेतकरी हक्क परिषद झाली. शरद जोशी यांच्यानंतर पहिल्यांदाच शेतकरी संघटना एका मंचावर आल्या. शेतकरी नेते विजय जावंदिया, राजू शेट्टी, वामनराव चटप, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, प्रकाश पोहरे, राजन क्षीरसागर, रविकांत तुपकर, दीपक केदार, प्रशांत डिक्कर, विठ्ठलराजे पवार.. सगळ्यांनी एकाच आवाजात सांगितलं, ‘आता शेतकरी एकत्र आला आहे!’ २९ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर यादरम्यान शेतकरी हक्क यात्रा निघाली. वाशिमपासून सुरुवात करून ४५ दिवस, ३३ जिल्हे, ९३ सभा आणि ८,२६७ किमी प्रवास! प्रत्येक गावात, प्रत्येक शेतकऱ्याच्या दारी जाऊन सांगितलं ‘तुमचा लढा आमचा आहे!’ 

२७ ऑक्टोबर. नागपूरमध्ये ‘महाएल्गार’चा उत्कर्षबिंदू झाला. २८ ऑक्टोबरला नागपूर ठप्प झालं. शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार, संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी युनियन सगळे एकत्र आले. ३० तास नागपूर बंद, समृद्धी महामार्ग ठप्प! धर्म, जात, पंथ यांच्या लढाया सोप्या असतात, पण शेतकऱ्यांसाठी लढणं सर्वात कठीण. कारण, शेतकरी विखुरलेला आहे. कुणी कापूस, कुणी संत्रा, कुणी सोयाबीन, कुणी ज्वारी.., पण आपण सगळे एकत्र आलो, तर आपण एकच- शेतकरी! हा आत्मविश्वास परत मिळवणं; हीच आमची खरी लढाई आहे. हा प्रवास कर्जमुक्तीपुरता नाही. हा प्रवास आहे शेतकऱ्याच्या सन्मानाचा ! आज एक टप्पा पूर्ण झाला, पण लढा थांबलेला नाही. जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा एल्गार थांबणार नाही! दिलेल्या मुदतीत कर्जमाफी झाली नाही, तर सरकारला अजिबात स्वस्थ बसू देणार नाही.

(शब्दांकन : प्रतिनिधी)

Web Title : कर्ज माफी मिलने तक किसानों का संघर्ष जारी रहेगा, नेता का प्रण।

Web Summary : किसान नेता ने कर्ज माफी मिलने तक अथक संघर्ष का संकल्प लिया। महाराष्ट्र में विभिन्न विरोध प्रदर्शनों, मार्चों और सभाओं ने कृषि उत्पादों के लिए ऋण माफी और उचित मूल्य की मांग करते हुए राज्य को हिला दिया है। आंदोलन किसानों, मजदूरों और सीमांत समूहों को एकजुट करता है, और न्याय मिलने तक आंदोलन जारी रखने का वादा करता है।

Web Title : Farmers' fight continues until debt relief is achieved, vows leader.

Web Summary : Farmers' leader vows relentless fight until debt relief is achieved. Various protests, marches, and gatherings have shaken Maharashtra, demanding loan waivers and fair prices for farm produce. The movement unites farmers, laborers, and marginalized groups, promising continued agitation until justice prevails.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.