विशेष लेख: ‘चिकन नेक’ला विळखा घालण्याची चिनी चाल...!

By विजय दर्डा | Updated: April 7, 2025 07:45 IST2025-04-07T07:44:45+5:302025-04-07T07:45:36+5:30

पैलवानांच्या लढाईत काडीपैलवानाचे काय होते हे बांगलादेशने नीट लक्षात घेतले पाहिजे. मोहम्मद युनूस तिथे आत्मघातकी निर्णय घेत आहेत!

Special Article on bangladesh muhammad yunus statement about india | विशेष लेख: ‘चिकन नेक’ला विळखा घालण्याची चिनी चाल...!

विशेष लेख: ‘चिकन नेक’ला विळखा घालण्याची चिनी चाल...!

डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,  लोकमत समूह |

बांगलादेशातील बंडाळीतून निर्माण झालेल्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस पूर्णपणे पाकिस्तान आणि चीनच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. जुने वैर असल्यासारखे ते भारताच्या कुरापती काढत आहेत. ‘भारताची ईशान्येकडील राज्ये पूर्णतः भूवेष्टित - लँडलॉक्ड - समुद्राशी संबंध नसलेली आहेत आणि या प्रदेशात बांगलादेश समुद्राचा एकमात्र रक्षक आहे’, असे विधान युनूस यांनी केले; त्यामागे निश्चितच चीनचे डोके आहे. ‘चिकन नेक’वर चीनची ही नवी चाल असून, पाकिस्तानी लष्कर तसेच आयएसआय यात सामील आहे. 

चीनची चाल समजून घेण्यासाठी ‘चिकन नेक’ काय आहे हे समजून घ्यावे लागेल. मोहम्मद युनूस यांनी जे म्हटले ते किती भयंकर ठरू शकते हे मग लक्षात येईल. भारताचा नकाशा पाहा. ईशान्येकडे अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या आठ राज्यांना पश्चिम बंगालशी जोडणारा कॉरिडाॅर कोंबडीच्या मानेसारखा दिसतो. तोच ‘चिकन नेक’. त्याची लांबी सुमारे ६० किलोमीटर आणि रुंदी काही ठिकाणी केवळ २२ किलोमीटर आहे. अरुणाचल प्रदेशावर चीन दावा करतो आणि या राज्यातील गावांची नावे बदलण्याचा उद्योग चीनने चालवला आहे. काहीही करून ईशान्येकडील राज्यांना भारतापासून तोडण्याचा चीनचा प्रयत्न आहे. सिलीगुडी कॉरिडॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘चिकन नेक’चा हा पट्टा चीनच्या दृष्टीने भारताची कमजोरी आहे. त्याच्या एका बाजूला भूतान आणि नेपाळ असून, समोर बांगलादेश आहे. २०१७ साली भूतानमध्ये घुसून याच पट्ट्याजवळील डोकलाममध्ये रस्ता बांधण्याचा प्रयत्न चीनने केला होता. भारतीय सैन्याने बहादुरी दाखवून तो प्रयत्न रोखला. हा वाद दीर्घकाळ चालला आणि शेवटी चिनी सैनिकांना मागे फिरावे लागले. तो रस्ता चीनने तयार केला असता तर युद्धाच्या प्रसंगात भारत कमकुवत ठरला असता. हा पट्टाच ईशान्य सीमेवर भारताच्या सैन्याची मुख्य ताकद आहे. १९७१ सालच्या युद्धात ईशान्येकडील हवाई तळांनी पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाची भूमिका निभावली होती. चीन आणि पाकिस्तान ही शक्ती तोडू इच्छितात. मोहम्मद युनूस यांच्या रूपाने त्यांना एक सहकारी मिळाला आहे. सत्तेवर राहण्यासाठी भारताच्या दोन्ही शत्रूंशी जुळते घेऊन ते आपला देश विकायला तयार झाले आहेत, असे दिसते. 

बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर युनूस यांनी अतिशय वेगाने चीनशी संबंध सुधारले. या त्रिकोणात पाकिस्तानही सामील आहे. याच षड्‌यंत्राचा भाग म्हणून चीनमध्ये जाऊन युनूस यांनी भारताची ईशान्येकडील राज्ये  भूवेष्टित आहेत, असे सांगून स्वतःला समुद्राचा रक्षक घोषित केले. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, त्यांच्या देशात चीन  आपला तळ उभारू शकतो. व्यापार, व्यवसायाची गोष्ट केवळ षड्‌यंत्र लपवण्यासाठी केली गेली. भारताने बांगलादेशला तीन बाजूंनी घेरले आहे, तर आपणही भारताला तीन बाजूंनी घेरलेले आहे, असे बांगलादेशला वाटते. चीन आपल्याबरोबर आला तर आपली ताकद वाढेल, अशी त्याची समजूत आहे. युनूस यांनी चीनला बांगलादेशात हवाईतळ उभारण्यासाठी आमंत्रणही दिल्याची बातमी आहे. बांगलादेशातील लालमोहनहाट जिल्ह्यात एक हवाईतळ बांधण्याचे आश्वासन चीनने दिले असून, एक पाकिस्तानी कंपनी हा तळ उभारून देणार, असेही ठरले आहे. म्हणजेच पाकिस्तानी हेर बांगलादेशात कानाकोपऱ्यात तैनात असतील. बांगलादेशातील सैन्याला पाकिस्तानी सैन्य प्रशिक्षण देईल, हे आधीच ठरले आहे. चीन आणि तिथल्या कंपन्यांकडून बांगलादेशला सुमारे २.१ अब्ज डॉलर्स गुंतवणूक, कर्ज आणि अनुदान म्हणून देण्याचे आश्वासनही मिळाले आहे. तिस्ता रिवर कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅनेजमेंट अँड रेस्टोरेशन प्रोजेक्ट हासुद्धा चिनी कंपन्यांच्या हातात जाणार आहे. चीनला बांगलादेशावर नियंत्रण मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

चीनने बांगलादेशात हवाईतळ उभारला, बांगलादेशच्या समुद्रापर्यंत त्याला पोहोचता आले, त्या देशात चिनी सैनिक वेगवेगळ्या रूपात तैनात झाले आणि पाकिस्तानी सेना तसेच आयएसआय आपला खेळ खेळू लागले तर भारतासाठी ती स्थिती किती खतरनाक होऊ शकते, याचा विचार करा. ईशान्येकडे चीनने मोठ्या प्रमाणावर दहशतवाद पसरवलेला आहे. मणिपूरमधील हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर सापडलेली शस्त्रे बव्हंशी चिनी आहेत. ईशान्येकडे अनेक दहशतवादी संघटनांना पैशांपासून शस्त्रांपर्यंतची मदत चीन करतो.

निश्चितच भारतासमोर अनेक आव्हाने आहेत, परंतु भारताचे नेतृत्व सध्या अशा हातात आहे ज्यांना आव्हानांचा सामना कसा करायचा हे चांगलेच माहीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंडमध्ये मो. युनुस यांच्या नजरेला नजर भिडवली होती.. आपल्याकडे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि अजित डोवाल हे त्रिकूट आहे. कोणत्याही सापाचे विष कसे उतरवायचे हे ते जाणतात. एस. जयशंकर हे मुत्सद्देगिरीचे चाणक्य आहेत आणि भारताचे शूर सैनिक शत्रूला धूळ चारण्यात माहीर आहेतच.

Web Title: Special Article on bangladesh muhammad yunus statement about india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.