डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्डलोकमत समूह
गेल्या आठवड्यात अनेक विषय आणि अनेक चिंता मनाशी होत्या. अमेरिकी आयात शुल्काचा हल्ला होताच. अमलीपदार्थ निर्मिती, विक्री आणि व्यापारासाठी ज्या देशांच्या भूमीचा वापर केला जातो अशा देशांच्या यादीत भारताचे नाव टाकले गेल्याची बातमी आली. शिवाय असेही कळले, की अमेरिकेचे सुमारे १२० सैनिक गुपचूप बांगलादेशमध्ये पोहोचले आहेत. बांगलादेशातील मार्टिन बेटावर सैनिकी तळ उभारण्यात अमेरिकेला यश येईल? भारताचा मित्र असलेल्या सौदी अरेबियाने पाकिस्तानबरोबर संरक्षणविषयक करार का केला असेल? आज या सगळ्याचा आढावा आणि सगळ्यात शेवटी क्रिकेट.
अमेरिकेच्या व्हाइट हाउसने अमलीपदार्थांच्या व्यापारात या ना त्या प्रकारे संबंध असलेल्या २३ देशांची एक यादी अमेरिकी संसदेकडे पाठवली आहे. त्या यादीत पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान-बरोबर भारताचेही नाव आहे. भारत स्वतःच अमलीपदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीशी झुंजत असताना हे घडले आहे. चहूदिशांनी भारतात अमलीपदार्थ पाठवले जात असताना त्यांच्या व्यापारात आपलीच भूमिका कशी असू शकेल? व्हाइट हाउसची एक चलाखी अशी, की अमलीपदार्थांविरुद्ध भारत देत असलेल्या कठोर लढ्याची प्रशंसाही केली आहे. भारतात अमलीपदार्थांविषयी कठोर धोरणे आहेत असे म्हणता तर यादीत भारताचे नाव कसे काय? अमेरिकेच्या राष्ट्रपतींना एखाद्या विशेष कायद्याद्वारे काही कारवाई करावयाची असेल तर अशा प्रकारचे अहवाल तयार केले जातात.
भारताचे नाव यादीत टाकले याचा अर्थ भारताविरुद्ध मोठे षडयंत्र रचले जात आहे. अमेरिका आपल्या पायाखाली काय जळते आहे हे पाहत नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे. न्यू यॉर्कसारख्या शहरात खुलेआम अमलीपदार्थांची विक्री होते. अमेरिकेच्या २२ राज्यात मारिजुआनाची विक्री आणि सेवन दोन्ही वैध आहेत. कॅनडा आणि मेक्सिकोची गोष्ट तर सोडूनच द्या, जिथे अमलीपदार्थांचा कारभार फळतो फुलतो आहे. अमेरिकेचे १२० सैनिक अचानक बांगलादेशमध्ये पोहोचले; त्यांनी गुपचूप चितगावच्या एका हॉटेलमध्ये गुप्तपणे मुक्काम केला. परंतु त्या गुप्तहेरांचे भले होईल ज्यांनी ही बातमी जगाला सांगितली! त्यानंतर अमेरिका आणि बांगलादेशने खुलासा केला, की अमेरिकन सैनिक संयुक्त सैन्य अभ्यास आणि बांगलादेशच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी आले आहेत. असे असेल तर इतकी गुप्तता का पाळली गेली?
बऱ्याच दिवसांपासून अमेरिका बांगलादेशमधील सेंट मार्टिन बेटावर सैन्यतळ उभारण्याच्या प्रयत्नात आहे. सेंट मार्टिन बेटाला नारिकेल जिंजीला म्हणजेच नारळ बेट आणि दारूचिनी म्हणजे दालचिनी बेट या नावानेही ओळखले जाते. या बेटावरून भारत, म्यानमार आणि चीनवर लक्ष ठेवणे अमेरिकेला सहज शक्य होईल. शेख हसीना यांच्या सरकारवर यासाठीच अमेरिकेने मोठा दबाव टाकला होता. परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यांचे राज्य उलथवण्याच्या मागे हेही एक कारण होते म्हणतात. मोहम्मद यूनुस अमेरिकेच्या मांडीवर खेळत असतात; बरोबर पाकिस्तानही आहे. याचा अर्थ एक अत्यंत धोकादायक त्रिकोण तयार झाला आहे. मार्टिन बेट अमेरिकेला मिळावे यासाठी गुपचूप प्रयत्न होत आहेत. तसे झाल्यास अमेरिका आपल्या छाताडावर येऊन बसेल.
सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या दोन्ही देशात एक संरक्षणविषयक करार झाला आहे. जर एखाद्या देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशांवर हल्ला मानला जाईल असा त्याचा सोप्या शब्दांत अर्थ निघतो. सौदी अरेबियाबरोबर भारताचे अत्यंत घनिष्ठ संबंध असताना तो देश पाकिस्तानबरोबर का गेला? भविष्यात जर भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर सौदी अरेबिया भारताच्या विरुद्ध उभा राहील? - तसे वाटत तर नाही. पाकिस्तान आणि सौदी अरेबियात खूप जुना लष्करी संबंध आहे. १९९८मध्ये पाकिस्तानने अणुपरीक्षण केले तेव्हा सौदी अरेबियाचे तत्कालीन संरक्षणमंत्री सुल्तान उत्तान दिन अब्दुल अजीज अल सऊद पाकिस्तानला गेले होते. अणुचाचणीच्या ठिकाणांपासून क्षेपणास्त्रांपर्यंत त्यांना नेले गेले. साधारणतः कोणताही देश कुठल्या विदेशी व्यक्तीला आपली अणुभट्टी कोठे आहे हे दाखवत नाही. अणुपरीक्षणासाठी सौदी अरेबियाने पैसा दिला होता का? असा प्रश्न त्यामुळेच तेव्हा निर्माण झाला होता. आता नव्या करारातून पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून खूप पैसे मिळतील हे नक्की. त्याचा उपयोग भारताच्या विरुद्ध होऊ शकतो. परंतु कराराचे खरे कारण अमेरिका असावी. अमेरिकेवरील अविश्वास वाढत असल्याने इतर आखाती देशांप्रमाणेच सौदी अरेबियालाही धास्ती वाटत असेलच. हे सगळे प्रकरण चीनच्या बाजूने झुकू शकते.
आता क्रिकेट. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्यामुळे क्रिकेटचा अनादर झाला असे माझ्या अनेक पाकिस्तानी मित्रांनी म्हटले. मी त्यांना फक्त एवढेच सांगितले, ‘जनाब, मने एकत्र येत नाहीत तर हस्तांदोलनाची चर्चाच कशासाठी करावयाची? आम्ही नियमांनी बांधलेलो होतो म्हणून आपल्याबरोबर खेळलो एरवी खेळण्याची गरजच काय होती?’