- हेमंत ढोमे (मराठी चित्रपट दिग्दर्शक)१ जानेवारी २०२६ रोजी माझा 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाचा विषय आहे 'आपल्या महाराष्ट्रातल्या झपाट्याने कमी होत जाणाऱ्या मराठी शाळा आणि त्या शाळांमधली घटलेली विद्यार्थ्यांची पटसंख्या'. या विषयावर अनेक मंडळींनी यापूर्वी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. अनेक मोर्चे आणि आंदोलनं उभी राहिली. पण, आत्ताच्या माध्यमांना या विषयाकडे लक्ष द्यायला फारसा वेळ नाही, असे दिसून आले.
हा विषय फक्त मराठी शाळांपुरता मर्यादित नसून तो मराठी भाषेच्या भवितव्याचा आणि अस्तित्त्वाचा प्रश्न आहे, हे अनेकांच्या लक्षात कसं येत नाही, हा विचार अस्वस्थ करणारा होता. मग ठरवले की, आपण मनोरंजनाच्या माध्यमातून या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे महाराष्ट्राचं लक्ष वेधायचं.
या चित्रपटाला प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली, चित्रपटगृहात ५० दिवस पूर्ण करून अनेक वेगवेगळे विक्रम रचून हा चित्रपट यशस्वी घोडदौड करतोय. हे केवळ आणि केवळ चित्रपटाच्या विषयामुळे झालंय हे नक्की! कारण या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मराठी शाळा, संस्था चालक, सरकारी अधिकारी, शिक्षक या सगळ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधता आला आणि त्यातून हेच लक्षात आलं की, सगळ्यांना वाटतंय खूप, पण त्यांना काही करता येत नाहीये.
मराठी शाळांचा दर्जा वाढवणं आणि आपली दहावी-बारावीचे परीक्षा मंडळ सुधारणं, ही जबाबदारी सरकारची आहेच. पण, आपल्या मुलांना शिक्षणासाठी मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणं, ही जबाबदारी पालकांची आहे आणि त्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या लेकराप्रमाणे शिकवणं, ही जबाबदारी शिक्षकांची आहे. आपण आपल्या पाल्याला इंग्रजी यावं म्हणून त्याच्यावर किती ओझं टाकणार आहोत, याचा विचार करायला हवा.
जोडण्यासाठी तोडणं गरजेचं आहे का?
इंग्रजी या एका भाषेसाठी मातृभाषेशी त्याची नाळ का तोडायची आहे? व्यवहारासाठी इतर भाषा येणं गरजेचं आहे. पण, आपली ओळखच मुळात आपली मातृभाषा असते आणि तीच नाही आली तर त्या शिक्षणाचा उपयोग तरी काय? आजकाल पॉश शाळांमध्ये आपल्या मुलांना घालण्याची एक नवीन फॅशन आहे, तो काय म्हणतात तो 'स्टेटस सिम्बल' आहे. पण, याचा दूरगामी परिणाम कोणी लक्षात घेतंय असं दिसत नाही, ना सरकार ना आपण!
ही उमेद अशीच टिकली पाहिजे...
या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवी चर्चा सुरू झाली आहे, मराठी माध्यमात शिकणं कमीपणाचं नाही, हे कुठेतरी लक्षात येऊ लागलं आहे. आपल्या मुलांना मराठी भाषा नीट बोलता आणि वाचता येत नाहीये, याची जाणीव होऊ लागली आहे.
अनेक तरुणांनी आवर्जून सांगितलं की, आम्ही आमच्या होणाऱ्या बाळाला मराठी माध्यमातच शिकवू. अनेक माजी विद्यार्थी आपल्या शाळांना भेटी देऊ लागले आहेत. बरेच शिक्षक पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागले आहेत.
पण, ही उमेद अशीच टिकवणं, हे आपल्या आणि 3 सरकारच्या हातात आहे. आता दोन्ही बाजूने काम व्हायला पाहिजे, 'मराठी शाळांचं भवितव्य' हा नुसता 'चर्चेचा' नाही तर 'कृतीचा' विषय झाला पाहिजे. मराठी भाषा अभिजात झाली आता मराठी शाळादेखील अभिजात झाल्या पाहिजेत.
'मराठी शाळा जगल्या तरच मराठी भाषा जगेल', अहो मंडळी संत ज्ञानेश्वरदेखील म्हणतात 'जैसी दीपांमाझि दिवटी, का तिथीमाझि पूर्णिमा गोमटी, तैसी भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम! तीर्थामध्ये काशी, व्रतांमध्ये एकादशी, भाषांमध्ये तैशी मराठी शोभिवंत!!'
Web Summary : Marathi film director highlights the decline of Marathi schools, urging collective action. Government, parents, and teachers share responsibility. Prioritize mother tongue alongside English for cultural identity and future preservation.
Web Summary : मराठी फिल्म निर्देशक ने मराठी स्कूलों के पतन पर प्रकाश डाला, सामूहिक कार्रवाई का आग्रह किया। सरकार, माता-पिता और शिक्षकों की जिम्मेदारी है। सांस्कृतिक पहचान और भविष्य के संरक्षण के लिए अंग्रेजी के साथ मातृभाषा को प्राथमिकता दें।