ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 06:20 IST2025-09-20T06:19:16+5:302025-09-20T06:20:13+5:30

मुंबई आणि दिल्लीकडे असलेला दर्जा त्यांच्याकडून खेचून घेत अहमदाबाद हे शहर भारताची ‘क्रीडा राजधानी’ बनण्यासाठी वेगाने तयारी करताना दिसते.

Special article Is Ahmedabad ready to host the Olympics? | ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

अभिलाष खांडेकर, रोव्हिंग एडिटर, ‘लोकमत’

गुजरातची राजधानी आणि ऐतिहासिक शहर असलेले अहमदाबाद  पर्यावरणपूरक असल्याबरोबरच वेगाने वाढणारे व्यापारी केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करीत आहे. आतापर्यंत मुंबई- दिल्लीकडे असलेला दर्जा त्यांच्याकडून खेचून घेत उद्या हे शहर भारताची ‘क्रीडा राजधानी’ही बनू शकते. कारण भविष्यात येथे अनेक जागतिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत. येथील जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धाही आधीच खेळवली गेलेली आहे. 

या शहराला  कधीकाळी कर्णावती या नावाने ओळखले जायचे. भद्र मंदिराभोवतीच्या जुन्या शहरातील एका भागाला युनेस्कोने २०१७ मध्ये ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले आहे.  या जुन्या शहरातील ‘पोल्स’ वारसातज्ज्ञांना मंत्रमुग्ध करतात. काही वर्षांपूर्वी अहमदाबादला ही वेगळी ओळख मिळाली खरी; पण अनेक नागरिकांची तक्रार आहे की, त्यांना कोणतीही कल्पना न देता, त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या मालमत्तांवर अविचारी ‘हेरिटेज’ शिक्का मारला गेला. ही बाब त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम करणारी ठरली असून, त्यातून त्यांचे नुकसान झाले आहे.

अहमदाबादला साबरमती नदीचे वरदान लाभलेले आहे. ही नदी तिथल्या शहरी जीवनाला एक सुंदर नैसर्गिक आयाम देते. गुजरात सरकारने १९९७ मधील एका जुन्या नदीकाठ विकास आराखड्याला गती दिली. आधीच स्थापन केलेल्या ‘रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ला नदीच्या दोन्ही काठांच्या सौंदर्यीकरणासाठी प्रचंड निधीही (काही लोक म्हणतात १,५००-२,००० कोटी रुपये) दिला गेला, ज्यामुळे हे काम न थांबता सुरू राहिले. नदीतज्ज्ञांनी या ‘रिव्हर फ्रंट’ संकल्पनेवर टीका केली होती. ती बरोबर की चूक हा वेगळा मुद्दा; पण रिव्हर फ्रंट संकल्पना आता देशभर लोकप्रिय होत आहे.  नदी काठांवर अनेक उद्याने विकसित झाली आहेत. येथील हिरवळ गुजराती नागरिकांना, तसेच बाहेरून आलेल्या पर्यटकांना भुरळ घालते.

जुन्या शहराच्या स्वतःच्या गंभीर समस्या  असल्या  तरीदेखील गांधीनगर आणि अहमदाबाद या जुळ्या शहरांतले रुंद रस्ते, सुबकपणे लावलेली झाडे आणि तुलनेने कमी  वाहतूक कोंडी... या गोष्टी मला सर्वाधिक भावल्या. अहमदाबाद ८० लाख लोकसंख्येसह देशातील सर्वांत मोठ्या शहरी समूहांपैकी एक शहर बनले आहे. तरीसुद्धा, येथील शहर नियोजन प्रभावी दिसते.

इथे मोठ्या प्रमाणावर पोपट व मोर सहज दिसतात, जे तुम्हाला मुंबई किंवा इंदूरमध्ये  दिसणार नाहीत.  या ‘टेक्स्टाइल सिटी’मध्ये झाडांची संख्या कमी आहे; परंतु अनेक ठिकाणी गवत-झुडपे  पोपट व मोरांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. जुन्या झाडांसोबतच नवीन  मुख्यतः कडूनिंबाची झाडे ही मुख्य रस्त्यांच्या आणि आतील छोट्या रस्त्यांच्या कडेला विपुल प्रमाणात दिसतात. कडूनिंबाची रोपे नव्याने लावलेली दिसतात. 

या शहराला पुढील दशकात ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद भूषवायचे असेल, तर  विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अहमदाबाद महानगरपालिकेला आणखी झाडे लावावी लागतील, तसेच कांकरिया तलाव किंवा वस्त्रापूर तलावासारखे नवीन जलसाठे उभारावे आणि जपावे लागतील. झाडे जगवणे,  जिओ-टॅगिंग, देखरेख व संरक्षण, अशा उपायांमुळे वृक्षारोपण मोहिमा टिकाव धरू शकतात.

शहरी जैवविविधतेत सुधारणा करण्याची अजूनही खूप संधी आहे. जर आजच ती वाचवली नाही, तर उद्या फार उशीर होईल. कारण शहराचा विस्तार प्रत्येक दिशेला होत आहे.  गाड्यांची विक्री वाढत आहे. भविष्यात लोकसंख्या आणखी वाढेल, आकाशाला भिडणाऱ्या इमारतींची संख्या वाढेल आणि बुलेट ट्रेनची वाट पाहणारे आणखी बरेच मुंबईकर येथे येतील.

जागतिक ख्यातीचे वास्तुविशारद ली कॉर्बुजिए यांनी लुई कानसोबत चंदीगडप्रमाणेच अहमदाबादमध्येही काम केले होते. स्कॉटलंडमधील बहुश्रुत व दिग्गज सर पॅट्रिक गेडीज यांनीही जुन्या अहमदाबादच्या एका भागाचा आराखडा तयार केला होता. आज गुजरातमधील शहरे जागतिक दर्जाची बनण्याच्या उद्देशाने पुढे चालली आहेत.  त्यांना आता आपल्या सुंदर नैसर्गिक  संसाधनांची काळजी घ्यावी लागेल. सोबतच त्यांना अप्रतिम ॲमस्टरडॅम आणि हिरवाईने नटलेल्या बीजिंगकडून काही धडेही घ्यावे लागतील.

Web Title: Special article Is Ahmedabad ready to host the Olympics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.