विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'

By विजय दर्डा | Updated: November 10, 2025 07:37 IST2025-11-10T07:34:51+5:302025-11-10T07:37:33+5:30

Indian Women's Cricket Team: उत्तुंग यशाच्या मागे विलक्षण असे समर्पित प्रयत्न असतात. भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंबरोबरच जय शाह यांच्यासह सर्व संबंधितांचे अभिनंदन !

Special Article: 'Hamari Choriya Choro Se Kam Hain Ke?' Indian women's cricket team Win World cup | विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'

विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'

- डॉ. विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

महिला विश्वकप जिंकणाऱ्या भारतीय मुलींनी मस्तक गर्वोन्नत व्हावे, असा सन्मान प्राप्त करून दिला आहे. त्यांचे मनोबल आणखी वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा या मुलींना बोलावून घेतले, तेव्हा भरून आले. जय शाह यांची जिद्द मला आठवली आणि भारतीय महिला क्रिकेट सुरू करणाऱ्या सर्व खेळाडूंचीही आठवण झाली. त्यांनी दीर्घकाळ अडचणी सोसल्या तरी त्या मागे हटल्या नाहीत. हा विजय त्या सर्वांचा आहे.

विपरीत परिस्थितीचा सामना करून मिळवलेल्या विजयाचा आनंद काय असतो, हे मोदी यांच्यापेक्षा अधिक चांगले कोण जाणू शकेल? जेव्हा जेव्हा देशातील मुला-मुलींनी काही विशेष कामगिरी केली, तेव्हा त्यांचे मनोबल वाढवण्याची एकही संधी पंतप्रधानांनी सोडलेली नाही. विजयच नव्हे, तर पराभवानंतरही त्यांनी हे असे मनोबल वाढवण्याचे काम केले आहे. महिला क्रिकेटपटू जेव्हा विश्वचषक घेऊन आल्या, तेव्हा फोटो काढताना मोदींनी तो विश्वचषक स्वतःच्या हातात घेतला नाही; मुलींच्याच हातात राहू दिला. अगदी असेच दृश्य पुरुषांचा संघ विश्वचषक घेऊन आला, त्यावेळीही पाहायला मिळाले होते.

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता, त्यादिवशी मला वारंवार जय शाह डोळ्यासमोर येत होते. अहमदाबादमधल्या एका भेटीत ते मला म्हणाले होते, 'बघा, मी पुरुष आणि महिला असे दोन्ही विश्वचषक जिंकून आणणार आहे.' जय शाह आपले गृहमंत्री आणि धुरंधर राजकीय रणनीतिकार अमित शाह यांचे सुपुत्र. वडाच्या झाडाखाली दुसरे वडाचे झाड वाढणे कठीण असते म्हणतात, पण जय शाह यांनी ते खोटे ठरवले. ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे चेअरमन झाले, तेव्हा लोकांनी विचारले, 'हे कोण? कुठून आले?' परंतु, जय यांनी हे सिद्ध केले की, आपल्या पित्याप्रमाणेच तेही चाणक्य नीती जाणतात. भारतीय क्रिकेटचे संपूर्ण चित्रच त्यांनी बदलून टाकले. त्यांनी धुरा हाती घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पकडलेला यशस्वीतेचा रस्ता सगळ्यांच्या समोर आहे. महिला क्रिकेट संघाला विजयाच्या रस्त्यावर आणणे सोपे नव्हते. पुरुषांचे क्रिकेट म्हणजे श्रीमंताघरचा जल्लोष आणि महिला क्रिकेट म्हणजे गरिबाघरची मीठभाकर असे सगळे चित्र होते. महिला खेळाडूंना पुरेसे मानधन मिळत नव्हते, विमानाची तिकिटे मिळताना अडचणी येत. त्यांच्यासाठी वेगळ्या बसही नव्हत्या. विमानतळावर रांगेत उभे राहावे लागायचे. हा सगळा काळ मी पाहिला आहे. डायना एडलजी, मिताली राज यांच्यापासून झुलन गोस्वामी, हरमनप्रीत आणि स्मृती मानधना यांच्यापर्यंत अनेक मुलींना संघर्ष करताना पाहिले आहे. 'लोकमत' समूहाने स्मृती मानधनाची प्रतिभा आधीच ओळखली आणि तिला आम्ही 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार दिला, याचा आम्हाला अभिमान आहे.

जय शाह यांनी महिला क्रिकेटची परिस्थिती बदलायला सुरुवात केली. आता मुलींनाही पंचतारांकित हॉटेलसारख्या सुविधा मिळू लागल्या असून, सामना शुल्कही सारखेच मिळते. परंतु, पुरुषांच्या तुलनेत वार्षिक कराराची रक्कम मात्र अजूनही कमी आहे. हा भेदभाव का? जय शाह या बाबतीतही समानता आणतील, अशी आशा आहे. भारतात महिला प्रीमियर लीग सुरू झाल्यामुळे देशांतर्गत पातळीवर खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. महिला क्रिकेटसाठी पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी जय शाह यांनी निधी उपलब्ध करून दिला. ऑक्टोबर २०२३ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून अमोल मुजुमदार यांच्या हाती जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामागेही जय शाह यांचा दृष्टिकोन होता. कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या मुजुमदार यांना प्रशिक्षक म्हणून नेमणे कितपत उचित आहे?, असा प्रश्न विचारला गेला. परंतु, जय शाह यांनी टीकेची पर्वा केली नाही, त्याचे फळ आता समोर आहे.

महिला क्रिकेट विश्वचषकावर आपले नाव कोरून हरमनप्रीत कौरच्या संघाने भारतीय मुलींसाठी एक नवा रस्ता दाखवून दिला आहे. आता गावागावात मुलींचे क्रिकेट लोकप्रिय होत जाईल. भारतीय महिला क्रिकेटचा पाया ज्यांनी घातला त्यांनाही शाबासकी दिली पाहिजे. शांता रंगास्वामी, डायना एडलजी, अंजूम चोप्रा, मिताली राज, पूर्णिमा राव, झुलन गोस्वामी, नीतू डेव्हिड, शुभांगी कुलकर्णी, वेधा कृष्णमूर्ती आणि शिखा पांडे आदी खेळाडूंनी केलेल्या संघर्षांमुळेच आज आपल्या मुली या टप्प्यावर पोहोचू शकल्या. 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?' असे लोक गर्वाने म्हणू शकतात.

मुलींचा हा विजय साजरा होत असताना मी संपूर्ण देशाला एक गोष्ट सांगू इच्छितो की, मुलींमधील प्रतिभा ओळखा. त्यांच्यातील कौशल्य वाढवण्यासाठी साधनसामग्री उपलब्ध करून द्या. त्यांना संधी द्या, देशाचे नाव त्या आणखी रोशन करतील.
vijaydarda@lokmat.com

Web Title: Special Article: 'Hamari Choriya Choro Se Kam Hain Ke?' Indian women's cricket team Win World cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.