शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: पुस्तकाच्या जन्माची गोष्ट - पाच दशकांपासून अस्तित्व टिकवून राहिलेली 'राणीची बाग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 11:54 IST

आज पाच-सहा दशके ‘राणीची बाग’ बालवाङ्मयातील सर्वार्थाने श्रेष्ठ पुस्तक हे कोणीही मान्य करील.

रामदास भटकळ

काव्यलेखन हे उत्स्फूर्त असायला हवे, किंबहुना कविता ही उत्स्फूर्ततेचा अचानक झालेला विस्फोट असतो हे इंग्रज कवी विलियम वर्ड्सवर्थचे वचन नेहमीच उद्धृत  केले जाते. विंदा करंदीकर हे फार वेगळ्या प्रेरणेने लिहिणारे लेखक असले तरी त्यांच्या बुद्धिवादी, परिवर्तनवादी मार्क्स, फ्रॉईड आइन्स्टाईन यांच्या प्रभावाखालील कवितेतही हा विशेष दिसतो.

तरीही त्यांचे एकूण लेखन पाहता त्यात जाणीवपूर्वक झालेल्या लेखनाच्या, निदान परिष्करणाच्याही खाणाखुणा जाणवतात. आततायी अभंग, गझल, तालचित्रे हे जाणीवपूर्वक लिहिताना काही वेगळे भान ठेवावे लागते. तरीही करंदीकर कदाचित स्वतंत्रपणे बालगीते लिहिण्याकडे वळले नसते असे वाटते. मात्र, त्यांनी बालगीते लिहायला एक घरगुती कारण झाले, असे त्यांनी स्वतः नमूद केले आहे. त्यांचा धाकटा मुलगा उदय याला झालेला भीतिग्रस्तपणा हे ते कारण ठरले. उदय लहान असताना त्याला काही अनामिक कारणामुळे भीती वाटू लागली. त्यावर उपाय डॉक्टरांनाही सापडेना. पण ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ या न्यायाने करंदीकरांना उपाय दिसला तो अर्थातच कवितेचा. ‘स्वप्नात पाहिलेली राणीची बाग’, ‘माकडाचे दुकान’ अशा करंदीकरांनी निर्माण केलेल्या काव्यसृष्टीत उदय रमला आणि त्याची भीती पूर्णपणे निवळली.

केवळ एका घरगुती कारणासाठी झालेल्या या अपघाती लेखनाला काही साहित्यिक मूल्य आहे हे जाणण्याचे बळ करंदीकरांत होते. त्यांची बालगीते मुलांना खेळवत होती तर मोठ्यांना त्यात वेगळे अर्थ जाणवत होते. पॉप्युलरने तोपर्यंत बालगीतांचे प्रकाशन केले नव्हते. करंदीकरांची खासियत म्हणजे हातात घेतलेल्या कामाचा सर्वांगीण विचार करणे. बालगीतांच्या त्यांच्या कवितेतील काल्पनिक विश्व जिवंत करणारा प्रतिभावंत चित्रकार हवा हे लक्षात घेऊन ते आमच्याकडे आले ते एका तरुण चित्रकाराला घेऊनच.

वसंत सरवटे हे कोल्हापूरचे, इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेले प्रशिक्षित अभियंता. मुंबईत येऊन एसीसी या सिमेंट कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होते. त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना कदाचित रुक्ष काम करावे लागत असेल; परंतु, त्यांची काही व्यंगचित्रे रसिकांनी पाहिली होती. त्यांना असलेली उच्च दर्जाची सूक्ष्म वाङ्मयीन जाण आणि ती चित्रांत उतरवणारी प्रतिभा याची कल्पना करंदीकरांना होती. आम्ही ज्या हेतूने या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहोत याची जाणीव सरवटे यांना वाचक या नात्याने आली होती. पॉप्युलर बुक डेपोत आयात केलेली मुलांसाठीची जाडजूड किमती पुस्तकेसुद्धा ग्राहक आपल्या मुलांसाठी विकत घेत. त्या स्तरावर नव्हे आणि त्या किमतींना तर नक्कीच नाही; पण, तोवर प्रसिद्ध होणाऱ्या उत्तम छापलेल्या, परंतु फक्त एका रंगात छापलेल्या स्वस्त पुस्तकांपेक्षा पुढचे पाऊल टाकायची आमची जिद्द त्यांना दिसत होती.

या प्रयासात तेही सामील झाले. रंगीबेरंगी आभास निर्माण करणारी तरी कमीतकमी खर्चात, हे धोरण सांभाळून आम्ही कामाला लागलो. तेव्हा ऑफसेट पद्धती रुळली नव्हती. लेटरप्रेस पद्धतीत रंगीत छपाईसाठी अनेक ठसे (ब्लॉक्स) करावे लागायचे. धारगळकर हे ब्लॉकमेकर या आमच्या उद्योगात सामील झाले. तेव्हा केलेली धडपड ही आजच्या तांत्रिक आणि आर्थिक पार्श्वभूमीवर डोंगर पोखरून उंदीर काढला अशी वाटते. परंतु, तेव्हा मात्र आम्ही निदान एका टेकडीवर धापा टाकत चढावे या थाटात रोज शिकत होतो. हे वीस पानी उत्कृष्ट कवितांचे देखणे पुस्तक आम्ही फक्त दोन रुपये किमतीला देऊ शकलो याचा आनंद आज वाचकांच्या आणि ग्राहकांच्या लक्षात येणार नाही. कर्नाटक प्रिंटिंग प्रेसचे सोन्याबापू ढवळे आमच्या गिर्यारोहणात सोबत होतेच.

रंगीत छपाई चित्रकाराच्या मनासारखी व्हावी यासाठी रंग मिसळताना ते स्वतः जातीने लक्ष घालत होते. ह्या पुस्तकाला केंद्र शासनाचा पुरस्कार मिळाला याला व्यावहारिक महत्त्व होते; कारण शासन पुस्तकाच्या दोन हजार प्रती विकत घेणार होते. कमिशन वजा जाता प्रश्न फक्त तीन हजार रुपयांचा होता. तरी ही जबाबदारी राज्य शासनावर झटकून पुस्तके घेण्यात आली नाहीत. पॉप्युलरने बालसाहित्याची शंभर पुस्तके प्रसिद्ध केल्यानंतर आम्ही थांबलो याचे हा सरकारी निरुत्साह हेही एक कारण आहे.

आज पाच-सहा दशके ‘राणीची बाग’ बालवाङ्मयातील सर्वार्थाने श्रेष्ठ पुस्तक हे कोणीही मान्य करील. करंदीकरांचे सर्वच लेखन (कविता, लघुनिबंध, अनुवाद, समीक्षा) श्रेष्ठ दर्जाचे खरे, तरीसुद्धा राणीची बाग आणि त्यानंतर या साहित्य प्रकारावर उदयच्या आजारावरील उपाय हे कारण संपल्यावरही प्रेम करणारे करंदीकर यांनी बालगीतांची तब्बल ११ पुस्तके लिहिली.

टॅग्स :Mumbaiमुंबई