विशेष लेख: स्मार्टफोन आणा, स्मार्ट बना... नाहीतर मंत्रालयात येऊ नका... अजब गजब आदेशाचा घोळ

By अतुल कुलकर्णी | Updated: August 17, 2025 11:31 IST2025-08-17T11:25:45+5:302025-08-17T11:31:42+5:30

महाराष्ट्रात कमीतकमी ५ हजार आणि जास्तीतजास्त २ लाखाला स्मार्टफोन मिळतो.

Special article: Bring a smartphone, be smart otherwise don't come to the mantralaya A strange and strange order | विशेष लेख: स्मार्टफोन आणा, स्मार्ट बना... नाहीतर मंत्रालयात येऊ नका... अजब गजब आदेशाचा घोळ

विशेष लेख: स्मार्टफोन आणा, स्मार्ट बना... नाहीतर मंत्रालयात येऊ नका... अजब गजब आदेशाचा घोळ

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

अजब गजब आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांनो, क्या बात है...

आपले कौतुक करावे तेवढे थोडे आहे. आपल्यासारखे विद्वान, काळाच्या पुढचा विचार करणारे अधिकारी आहेत, म्हणून महाराष्ट्राचे प्रशासन, मंत्रालयाचा कारभार व्यवस्थित सुरू आहे. आपण नसता तर काय झाले असते ही कल्पनाही करवत नाही... मंत्रालय प्रवेशाचाच विषय घ्या ना... तुम्हाला मंत्रालयात यायचे असेल तर तुमच्या मोबाइलमध्ये ‘डीजी प्रवेश’ नावाचे ॲप पाहिजे. हे ॲप फक्त स्मार्ट फोनवरच डाऊनलोड करता येते. त्यामुळे भंगार साधे फोन घेऊन येणाऱ्यांना मंत्रालयात प्रवेशच मिळणार नाही. ज्यांनी कोणी ही भन्नाट कल्पना आणली, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे... उगाच बिनकामाचे लोक खेड्यातून मंत्रालयात येतात. मंत्रालय काय बघायला यायची गोष्ट आहे का..? यायचेच असेल तर ते स्मार्टफोन विकत घेतील. त्यावर ॲप डाऊनलोड करतील... शेवटी त्यांना स्मार्टफोन शिकता यावा, म्हणूनच तुम्ही ही आयडिया केली आहे हे आम्ही ओळखले आहे.

महाराष्ट्रात कमीतकमी ५ हजार आणि जास्तीतजास्त २ लाखाला स्मार्टफोन मिळतो. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात येणाऱ्यांची संख्या सिद्धिविनायकाला दर्शनाला येणाऱ्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळे स्मार्टफोन विकत घेणाऱ्यांची संख्या वाढेल. राज्याला करापोटी महसूल मिळेल. त्यातला काही वाटा लाडक्या बहिणीला देता येईल..! केवढी तुमची दूरदृष्टी...! मंत्रालयासमोर मंत्र्यांचे बंगले आहेत. बंगल्यांसमोर मोकळी जागा आहे. तेथे स्मार्टफोन विकण्यासाठी दुकाने काढा. त्या जागेतून भाडे मिळेल. ते भाडे लाडक्या भावांना कामी येईल... वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम कार्ड देण्याची व्यवस्था करा. म्हणजे मंत्रालयात येणारे लोक आधी स्मार्टफोन, सिम कार्ड घेऊन मंत्रालयात उत्साहाने येतील. आपल्याच एखाद्या ओळखीच्या ठेकेदाराला स्मार्टफोन विक्रीचे दुकान टाकून देता आले तर... (डोक्यात कल्पना आली म्हणून सांगून टाकली... आपण योग्य तो निर्णय नक्की घ्याल...)
आता फक्त एकच करा. मंत्रालयात आमदारांसोबत कार्यकर्त्यांचे लोंढे येतात. जे आमदार ठोकमध्ये कार्यकर्त्यांसाठी स्मार्टफोन घेतील, त्यांना वेगळे कमिशन देता येते का पाहा. ज्या आमदाराचे जास्त कार्यकर्ते येतात, त्या आमदारांना स्मार्टफोन कंपनीची एजन्सी देता येते का बघा. त्यामुळे आमदार मंडळी तुमच्यासारख्या अजब गजब अधिकाऱ्यांवर खूश होतील. (आमचे हे फुकाचे सल्ले. ऐकायचे कसलेही बंधन नाही.) तुम्हाला आमचे सल्ले चांगले वाटले, तर आम्हाला एखादा स्मार्टफोन भेट द्या, म्हणजे आम्ही अधूनमधून मंत्रालयात येऊ...

पुण्याच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनो, राज्यातल्या सर्व शाळा, शिक्षकांवर तुम्ही जी जबाबदारी टाकली, त्यासाठी तुमचेही मनापासून अभिनंदन. ‘स्वातंत्र्यदिनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कवायतीचे कार्यक्रम घ्या. स्वातंत्र्य लढ्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणारे, देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळीवर आधारित २० मिनिटांचा कवायतीचा कार्यक्रम घ्या. त्याची स्मार्ट फोनमधून शूटिंग करा. वीस मिनिटांचे रेकॉर्डिंग यूट्यूब चॅनेल काढून त्यात टाका. ज्यांच्याकडे चॅनेल नसेल त्यांनी यूट्यूब चॅनेल सुरू करा. कवायतीचे चांगले फोटो काढून ते फोटो, यूट्यूबची लिंक शिक्षण विभागाला पाठवा..!’ असे आपण आदेश काढले. अजब गजब अधिकाऱ्यांनो, शिक्षकांना स्मार्टफोन आणि यूट्यूब याविषयीचे समग्र ज्ञान मिळावे, म्हणून तुम्ही सगळे किती विचार करता... हे सगळे पाहून आम्ही शिवाजी पार्कवर तुम्हा सगळ्यांचा सत्कार करायचे ठरवले तर नक्की या... शिवाजी पार्कवर मोकळ्या जागेत आपण स्मार्टफोनची दुकाने टाकू...

गृह आणि शिक्षण विभाग या दोघांनाही स्मार्टफोनविषयी निर्माण झालेली आवड पाहून राज्याच्या मुख्य सचिवांनी तुम्हा सगळ्यांचा भारीतला भारी स्मार्टफोन देऊन सत्कार केला पाहिजे. शेवटी तुम्ही सगळे अधिकारी राज्याच्या भल्याचा विचार करत आहात. महाराष्ट्राने हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्याकडे ग्रामीण भागात इंटरनेट नसले, अनेक ठिकाणी लोडशेडिंग असले म्हणून काय झाले..? झाड, डोंगर, गावातली उंच इमारत जिथे कुठे इंटरनेट मिळेल तिथे बसून शिक्षकांनी हे काम केलेच पाहिजे. मुलं किती शिकली महत्त्वाचे नाही. यूट्यूब चॅनेल सुरू झाले पाहिजे, त्याला जास्तीत जास्त लाइक मिळाले पाहिजेत, जेणेकरून भावी पिढीला या गोष्टी तमाम शिक्षकांना शिकवता याव्या इतका उदात्त विचार तुम्ही सगळ्या अजब गजब अधिकाऱ्यांनी केला आहे. इतके द्रष्टे  अधिकारी लाभले हे महाराष्ट्राचे परमभाग्य...

जाता जाता एक किस्सा. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. सांगलीच्या विश्रामगृहावर त्यांना भेटायला काही शेतकरी आले. दादा मीटिंगमध्ये आहेत, असे म्हणत तुमच्यासारख्या अजब गजब अधिकाऱ्यांनी त्यांना आत सोडले नाही. दुपारी बैठका आटोपून दादांनी जेवायला बसताना कोणी भेटायला आले आहे का? असे विचारले. तेव्हा काही शेतकरी भेटायला आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सगळे शेतकरी विश्रामगृहाच्या समोर एका झाडाखाली बसले होते. वसंतदादा लगेच तिथे गेले. शेतकऱ्यांच्या जवळ एका दगडावर बसले... तेवढ्यात एका सरकारी फोटोग्राफरने फोटो काढायला सुरुवात केली. दादा त्याला म्हणाले, त्या फोटोखाली लिही, “सरकार शेतकऱ्यांच्या पायाशी...” त्या अजब गजब अधिकाऱ्यांनी ही कॅप्शन लिहून फोटो सर्वत्र पाठवूनही दिले... आज हा किस्सा तुमच्यामुळे आठवला हेही नसे थोडके...

- तुमचाच बाबूराव

Web Title: Special article: Bring a smartphone, be smart otherwise don't come to the mantralaya A strange and strange order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.