शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

निवडणुकांच्या शास्त्रात AI उलथापालथ घडवेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 8:19 AM

कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून जुन्या निवडणूक शास्त्राला नव्या युक्त्या, बऱ्यावाईट क्लृप्त्यांची जोड कशी मिळते हे उलगडणाऱ्या लेखमालेचा प्रारंभ !

विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयांचे अभ्यासक

‘इलेक्शन इज दी मदर ऑफ ऑल पॉलिटिक्स’ असे म्हटले जाते.  हे तंतोतंत खरे नाही. पण, लोकशाहीतील राजकारणात निवडणुकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते, एवढे मात्र  खरे. राजकीय घटना, घडामोडी आणि प्रक्रिया निवडणुकीच्या पोटी जन्माला येतात. हा तर्क पुढे न्यायचा तर मग निवडणूक कोणाच्या पोटी जन्माला येते, असाही प्रश्न येतो. त्याचे उत्तर नेमके आहे. लोकसंवाद आणि आकडेवारीचे गणित हे निवडणूक नावाच्या प्रक्रियेचे खरे मायबाप. निवडणुकांतील जय-पराजय जनमताच्या ठोस आकडेवारीवर अवलंबून असतो. आणि जनमत अवलंबून असते प्रभावी लोकसंवादावर. आकडेवारीचे गणित आणि लोकसंवादाचा प्रभाव या गोष्टी वरकरणी सोप्या वाटल्या तरी अंमलबजावणीसाठी मात्र महाकठीण असतात.

आकडेवारीच्या गणितात  मतदारांची संख्या, मतदानाची टक्केवारी इतकेच समजून भागत नाही. मतदारांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीचाही अंदाज घ्यावा लागतो.  त्यांचा कल कसा राहू शकतो याचेही गणिती आडाखे बांधावे लागतात. मतविभाजनाच्या फायद्या-तोट्याची समीकरणेही सोडवावी लागतात. मतदारांच्या बेरजा-वजाबाक्यांसोबतच निवडणुकीशी संबंधित अनेक घटकांचे गणिती कलन म्हणजे इंटिग्रेशन करावे लागते. एकुणात निवडणुका  संभाव्यतांच्या संख्याशास्त्राचा एक गुंतागुंतीचा आविष्कार असतात. प्रभावी लोकसंवादातील गुंतागुंत तर याहूनही जास्त. काय सांगायचे, कोणाला सांगायचे, कसे सांगायचे, किती आणि केव्हा सांगायचे अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरे तर शोधावीच लागतात. पण, विरोधकांच्या सांगण्याचा प्रतिवाद कसा करायचा, लोकांच्या प्रतिक्रियांचे अर्थ कसे लावायचे याचीही उत्तरे शोधावी लागतात.

प्रत्यक्ष भेटीगाठीतून, सभा-बैठकांमधून होणाऱ्या लोकसंवादाला तर महत्त्व असतेच. पण, पारंपरिक प्रसारमाध्यमांमधून, नवनव्या डिजिटल माध्यमांमधून होणाऱ्या लोकसंवादाचेही तितकेच, कदाचित त्याहीपेक्षा जास्त महत्त्व असते. काही गोष्टी सरधोपटपणे सगळ्यांपर्यंत, तर काही गोष्टी मतदारांच्या नेमक्या गटांपर्यंत  सतत पोहोचत राहण्याची काळजी घ्यावी लागते. फक्त संवादाचे कौशल्य असून भागत नाही. लोकांच्या मानसशास्त्राचा, त्यांच्या भय आणि आशा-आकांक्षांचाही अभ्यास असावा लागतो. प्रचार मोहीम ही एक गतिमान व्यूहरचना बनवावी लागते.

निवडणुका हा पैशांचा, संपत्तीचा, दंडशक्तीचा वगैरे खेळ असतो हे खरेच. पण, त्यापेक्षाही कितीतरी पटीने निवडणुका म्हणजे लोकसंवादाची आणि मतगणितांची व्यावहारिक पातळीवर केलेली गतिमान व्यूहरचना असते. राजकारण, समाज, लोकमानस, इतिहास यांचे आकलन आणि पूर्वानुभव हा या व्यूहरचनेचा आधार असतो. विदा (डेटा), माध्यमे, कल्पकता, सजगता ही या व्यूहरचनेची साधनसामग्री असते. समज, नियोजन, कष्ट, नावीन्य, चतुराई, चलाखी, लबाडी, प्रसंगी फसवणूक अशा अनेक घटकांमधून ही व्यूहरचना आकाराला येत असते. ही व्यूहरचना यशस्वी झाली की नाही हे मात्र निवडणूक निकालांच्या आधारावर ठरविता येते. म्हणूनच निवडणुका हे शास्त्रही असते.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यासारखे ते आखीव-रेखीव शास्त्र नसेलही. पण, समूहांच्या राजकीय निवडी-नकारांचा अर्थ लावणारे राज्यशास्त्र, शक्य-अशक्यतांचा पट मांडणारे संख्याशास्त्र, प्रभावी संवादाची सूत्रे सांगणारे संज्ञापनशास्त्र, मानवी वर्तन समजू पाहणारे मानसशास्त्र आणि सामूहिक कार्याचे नियोजन शिकविणारे व्यवस्थापनशास्त्र यांच्या सरमिसळीतून निवडणुकीचे उपयोजित शास्त्र आकाराला येते.

एकदा शास्त्र म्हटले की, त्यातून तंत्र जन्माला येणार आणि तंत्रज्ञानही (प्रत्यक्षात हा प्रवास बरेचदा उलटाही असतो). शास्त्र जसजसे गुंतागुंतीचे होत जाईल तसा तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा वापरही वाढत जाणार. निवडणुकांचे शास्त्रही त्याला अपवाद नाही. पूर्वीही असा वापर व्हायचा. निवडणुका जशा गुंतागुंतीच्या होऊन व्यावसायिकतेकडे झुकायला लागल्या तसतसा तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा वापरही वाढायला लागला. जगभराप्रमाणेच आपल्याकडेही हे घडते आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र आणि तंत्रज्ञानही या निवडणूक शास्त्राच्या कामाला जुंपले जातेय.

निवडणूक शास्त्रातील काही खोलवरच्या आव्हानांवर उत्तरे, युक्त्या आणि बऱ्या-वाईट क्लृप्त्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मूळ क्षमतेत सापडतात. विदेच्या साठ्यातून खोलवरच्या वृत्ती प्रवृत्ती शोधणे यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा हातखंडा. निवडणुका म्हणजे तर विदेचा अखंड प्रवाह. एखाद्या निर्णयासाठी प्रतिमान (मॉडेल्स) मांडणे, त्यावरून परिणामांची भाकिते करणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे बलस्थान. निवडणुका म्हणजे तर भाकितांचा खेळ. दिलेल्या विदेच्या शैलीनुसार वेगाने आणि घाऊक प्रमाणावर मायावी आशय निर्माण करणे, संवाद साधणे ही कृत्रिम बुद्धीची नवी सर्जनशीलता. निवडणुका म्हणजे तर घाऊक संवाद व्यवहार. त्यामुळे निवडणुका आणि एकूणच राजकारण यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आणि अपील फार खोलवरचे आहे. त्याची थोडीफार चुणूक याआधीही दिसली आहे. पण, भारतासह जगभरातील अनेक देश यावर्षी निवडणुकांना सामोरे जात असताना या शास्त्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्र आणि तंत्रज्ञानाचा कसा प्रभाव पडेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही छोटी लेखमालिका या शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या एकत्र येण्याने होणाऱ्या बऱ्या-वाईट शक्यतांचा आढावा घेणार आहे. ते आवश्यक आहे. कारण शेवटी शास्त्र असतं ते.vishramdhole@gmail.com

टॅग्स :Electionनिवडणूक