‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 06:16 IST2025-09-20T06:14:54+5:302025-09-20T06:16:26+5:30

‘नॅनो बनाना’ हे एआय मॉडेल वापरून तुम्ही तुमचे ‘रेट्रो फोटो’ बनवत असाल, तर तुम्ही स्वत:च तुमचा मौल्यवान डेटा कुणालातरी सहज ‘देऊ’ करता आहात...

special artical magic of 'nano bananas', 'retro' photos, and the dangers behind them! | ‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!

‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!

चिन्मय गवाणकर  , माहिती तंत्रज्ञान विशेषज्ञ

सध्या ‘ट्रेंड’ आहे  ‘नॅनो बनाना’ नावाच्या एका जादुई इमेज एआयचा ! गुगलने नुकतंच बाजारात आणलेलं हे एआय मॉडेल सध्या सोशल मीडियावर इतकं गाजतंय की, सोशल मीडियावर रेट्रो साड्या ‘नेसलेल्या’ एआय महिला आणि डेस्कवरच्या 3D बाहुल्या (फिगरिन्स) यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ‘मॅगी’ दोन मिनिटांत होते, पण हे ‘नॅनो बनाना’ तर तुमचा फोटो दोन सेकंदातच रेट्रो साडीत किंवा ॲक्शन फिगरमध्ये बदलून दाखवतं ! साध्यासुध्या सेल्फीचा कायापालट करण्याची ही जादू लोकांना इतकी आवडली आहे की, एका महिन्यात लाखो यूझर्सनी याचा वापर करून इंटरनेटवर अक्षरशः उच्छाद मांडला आहे !

‘नॅनो बनाना’ हे गुगलच्या ‘जेमिनी’ ॲपचा एक भाग आहे. तंत्रज्ञानाचा ‘ट’सुद्धा माहीत नसलेला माणूसही याचा वापर करू शकतो. तुम्हाला फक्त तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि तुम्हाला हवा असलेला ‘प्रॉम्प्ट’ (म्हणजे सूचना) द्यायची आहे. उदाहरणार्थ, ‘माझा फोटो रेट्रो साडीच्या लूकमध्ये तयार कर’ किंवा ‘माझा फोटो 3D ॲक्शन फिगरमध्ये बदल’.  काही क्षणातच एआय तुमच्या इच्छेनुसार फोटो तयार करून देतो.

याआधी असे फोटो तयार करण्यासाठी फोटोशॉपसारख्या सॉफ्टवेअरची गरज लागत होती.  ‘नॅनो बनाना’ने ही प्रक्रिया इतकी सोपी केली आहे की, एका क्लिकवर तुम्ही कोणताही फोटो कलाकृतीमध्ये बदलू शकता. केवळ काही दिवसांतच या फीचरने १० दशलक्ष (एक कोटी) डाऊनलोड्स आणि २०० दशलक्ष (२० कोटी) इमेज एडिट्सचा आकडा पार केला आहे.

भारतात ‘नॅनो बनाना’ने दोन प्रमुख ट्रेंडना जन्म दिला : पहिला ट्रेंड ‘3D फिगरिन’ (3D Figurine). या ट्रेंडमध्ये लोक स्वतःचे, त्यांच्या मुलांचे किंवा त्यांच्या पाळीव प्राण्यांचे फोटो लहान बाहुल्यांच्या (figurines) रूपात तयार करत आहेत. हे फोटो खऱ्याखुऱ्या खेळण्यासारखे दिसतात आणि त्यासोबत पॅकेजिंगचं डिझाइनही एआय करून देतो.

दुसरा आणि सर्वांत लोकप्रिय ट्रेंड म्हणजे ‘विंटेज साडी लूक’. या ट्रेंडमध्ये महिलांनी आपले साधारण फोटो जुन्या बॉलिवूड चित्रपटांमधील नायिकेसारख्या साडीच्या गेटअपमध्ये बदलून घेतले आहेत. या फोटोमध्ये शिफॉन साडी, ९०च्या दशकातील पोल्का-डॉट डिझाइन्स आणि आकर्षक लायटिंगचा समावेश आहे. ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’वर अशा फोटोंची लाटच आली आहे. अनेक महिलांनी आपले ‘बिफोर-आफ्टर’ फोटोही शेअर केले आहेत.

पण या सगळ्या गमतीत एक मोठा धोका दडलेला आहे : तुमच्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग होण्याचा धोका. याच आठवड्यात आलेल्या एका बातमीनुसार, एका वापरकर्तीने (झलक भवानी) जेव्हा तिचा फोटो साडीच्या लूकमध्ये बदलला, तेव्हा एआयने तिच्या मूळ फोटोमध्ये नसलेला, पण तिच्या खऱ्या हातावर असलेला एक लहानसा तीळ तयार केलेल्या फोटोमध्ये दाखवला. तिने आपला हा अनुभव इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. हे उदाहरण आपल्याला एआयच्या क्षमतेची जाणीव करून देतं. एआय मॉडेल मोठ्या प्रमाणात डेटावर प्रशिक्षण घेतात आणि त्यामुळे तुमच्या अपलोड केलेल्या फोटोतील लहान तपशीलही ओळखू शकतात.

आपण जेव्हा कोणतेही फोटो ‘नॅनो बनाना’सारख्या ॲपवर अपलोड करतो, तेव्हा ते त्या कंपनीच्या सर्व्हरवर जातात. भविष्यात या डेटाचा वापर कशाप्रकारे होईल, हे स्पष्ट नाही. ‘सायबर सुरक्षा तज्ज्ञ’ नेहमीच सांगतात की, तुम्ही अपलोड केलेला कोणताही डेटा कायमचा इंटरनेटवर राहतो.  गुगल ‘सिंथआयडी’ (SynthID) सारखे तंत्रज्ञान वापरत असले (त्यामुळे एआय-निर्मित फोटोंवर अदृश्य वॉटरमार्क लागतो) तरी हे १००% सुरक्षित नाही. एकदा फोटो सार्वजनिक झाल्यावर तो कॉपी केला जाऊ शकतो, बदलला जाऊ शकतो किंवा त्याचा गैरवापरही होऊ शकतो. तुमचा चेहरा, तुमचा पोशाख आणि तुमच्या सभोवतालचे वातावरण या सर्व गोष्टींचा डेटा गुगलसारख्या कंपन्यांकडे जमा होतो. भविष्यकाळात या डेटाचा वापर चेहरा ओळखण्यासाठी किंवा इतर ॲप्ससाठी केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘नॅनो बनाना’ हे एक उत्कृष्ट आणि मनोरंजक साधन आहे. यामुळे सामान्य लोकांनाही कलात्मक प्रयोग करण्याची संधी मिळाली आहे. आपण तंत्रज्ञानाला मागे ढकलू शकत नाही, पण त्याचा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खासगी आणि संवेदनशील फोटो अपलोड करणे शक्यतो टाळावे. सोशल मीडियावर शेअर करतानाही विचार करा की, हा फोटो सार्वजनिक झाल्यावर तुम्हाला काही धोका आहे का?

‘नॅनो बनाना’सारखी एआय मॉडेल आपली सर्जनशीलता वाढवण्यासाठी एक अद्भुत व्यासपीठ आहे. परंतु, त्यांचा वापर करताना ‘डिजिटल सुरक्षा’ हा महत्त्वाचा मुद्दा आपण कधीही विसरता कामा नये. तंत्रज्ञानाचा फायदा घ्या, पण आपल्या गोपनीयतेची किंमत देऊन नाही. तुमचा डेटा ही तुमची संपत्ती आहे. ती तुम्हीच जपली पाहिजे.

Web Title: special artical magic of 'nano bananas', 'retro' photos, and the dangers behind them!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.