भाषेचे मूल्ये जपा

By Admin | Updated: January 1, 2015 02:49 IST2015-01-01T02:49:20+5:302015-01-01T02:49:20+5:30

काय कमावले नाही याची गणती करताना प्रकर्षाने ध्यानात येणारी बाब ही, की दृक-श्राव्य माध्यमात ‘उच्चार’लेल्या शब्दाला महत्त्वच दिले जात नाही.

Speak language values | भाषेचे मूल्ये जपा

भाषेचे मूल्ये जपा

मुद्रित माध्यमांनी गेल्या काही वर्षांत काय काय गमावले व दृक-श्राव्य माध्यमांनी जे कमवायला पाहिजे होते, त्यातले काय कमावले नाही याची गणती करताना प्रकर्षाने ध्यानात येणारी बाब ही, की दृक-श्राव्य माध्यमात ‘उच्चार’लेल्या शब्दाला महत्त्वच दिले जात नाही. तंत्रज्ञानाव्यतिरिक्त भाषाव्यवहारादी प्रशिक्षण देण्याची गरजच तेथे वाटत नसावी. मराठीचे पदोपदी शब्दाचे खून पाडण्याचेच दु:साहस तेथे केले जाते. कित्येकदा ‘मैदान’ स्त्रीलिंगी, तर ‘जागा’ पुल्लिंगी !

खित शब्दाचेही महत्त्व कमी झाले आहे. पूर्वी ‘छापण्यात आले आहे’ हा पुरावा ठरत असे. आता छापले गेले म्हणजे ते सत्य असणार, यावर वाचकाचा विश्वास उरलेला नाही. सत्याला बगल देण्याच्या माध्यमांच्या नव्या सवयीमुळे असे झाले आहे, हे निश्चित. अर्धसत्य - प्रसंगी असत्य सांगून सत्याला अनेक बाजू असतात, हे बिंबवण्याचा प्रयत्न क्षीण ठरतो. अर्धसत्य, असत्य मोठ्याने ओरडून व वाचकांचा त्यावर विश्वास आपल्याला समाजमनाचा आरसा म्हटले आणि आपल्या प्रकाशित वृत्तपत्राची नि:स्पृह, निर्भीड अशी जाहिरात केली, तरी ते गुण त्या वृत्तपत्राला वाचक बहाल करतीलच असे नाही. वाचक पूर्वीसारखा निष्पाप, भोळसट राहिला नसून तो संपादकवर्गापेक्षा अधिक हुशार, बहुश्रुत असतो. त्यामुळे पूर्वीच्या संपादकाप्रमाणे एखाद्या चबुतऱ्यावर उभे राहून जगाला संदेश देत राहणाऱ्या संपादकापेक्षा मित्रत्वाच्या नात्याने काही सांगणाऱ्या संपादकावर तो अधिक विश्वास ठेवील, असे मला वाटते.
छापील शब्दांचे वजन कमी होणे म्हणजे संपादकाची विश्वासार्हता कमी होणे़ वृत्तपत्राची विश्वसनीयता धोक्यात येणे. आजच्या माध्यमांना अस्तित्वाची निकराची लढाई खेळावी लागत असल्याने विश्वसनीयतेसारख्या अमूर्त बाबींचा विचार करण्यास सवड नाही. या लढाईत अनेक वृत्तपत्रांचे बळी जातील, तेव्हा उरलेल्या थोड्याथोडक्या वृत्तपत्रांना विश्वसनीयतेचा विचार करावाच लागेल. पत्रकारितेत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना आज विश्वसनीयता जोपासण्यासाठी काही मूल्यांची जपणूक आवश्यक आहे. त्याची सुरुवात वृत्तपत्रीय भाषेकडे लक्ष देऊन करता येईल. त्यासाठी प्रमाण मराठी भाषेचा आग्रही वापर व नव्या पत्रकारांसाठी ‘शैली-पुस्तिका’ निर्मिती उपयुक्त ठरेल. मराठीची आबाळ होत असल्याची आवई उठवण्यासाठी इंग्रजी भाषेच्या आक्र मणाचा मुद्दा सहजी हाती येतो, पण ही आत्मवंचना आहे. मराठी भाषकांचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे, असे त्यातून ध्वनित होते. वास्तव तसेही नाही. इंग्रजीमुळे मराठी बिघडली आणि इंग्रजी तीही कशी आणि कितपत येणार, असे काहीसे मराठी भाषकांचे झाले आहे. मातृभाषा मराठीकडे होणाऱ्या दुर्लक्षाचे कारण इंग्रजीचे आक्र मण नाही, तर एकंदर भाषा व्यवहाराबद्दलची अनास्था आहे. मराठी पत्रकारांच्या आबाळीमुळे सभ्य आणि असभ्य शब्दांची सरमिसळ बिनदिक्कत होत आहे़ ‘विश्वासार्यता (=विश्वासार्हता)’, ‘गर्व वाटतो (=अभिमान वाटतो)’, असे चुकीचे शब्दप्रयोगही रूढ होत आहेत. ते दुरु स्त करण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे. निदान त्याची सुरु वात या वर्षापासून व्हावी, ही आशा.

- अरु ण टिकेकर

ज्येष्ठ साहित्यिक

Web Title: Speak language values

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.