शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात घोडा अडला; पण भाकरी करपली नाही!

By shrimant maney | Updated: December 15, 2021 08:58 IST

वेळीच सोंगट्या फिरविण्याचे भान राखले की राजकारणात बाजी पलटवता येते. नागपुरात भाजपची भाकरी करपली नाही, ती त्यामुळेच!

श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर

ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे राज्यभरातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका नेमक्या कधी होतील, हे कोणी सांगू शकत नाही. परंतु, त्यांच्या तोंडावर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात वसंत खंडेलवाल यांचा विजय भाजपला दिलासा देणारा आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र आले, तर भाजपला विजय शक्य नाही, हा गेल्या दोन वर्षांतला दावा खोटा ठरला. आधी तो समज पंढरपूरमध्ये खोडून निघाला. आता विदर्भात धक्का बसला. विदर्भात भाजप व काँग्रेस हेच मुख्य पक्ष असल्याने आणि राष्ट्रवादी व शिवसेनेची ताकद कमी असल्यानेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाची भाषा बोलताहेत व शरद पवार यांच्यासह सगळे त्यांना टोमणे मारताहेत. नागपूरच्या निकालामुळे ते टोमणे वाढतील.

नागपूरमध्ये वर्षभरापूर्वी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने भाजपला धक्का दिला होता. उमेदवाराची निवड चुकल्यामुळे तब्बल ५८ वर्षांनंतर भाजपला या मतदारसंघात पराभव पाहावा लागला. संदीप जोशी यांना पराभूत करून काँग्रेसचे अभिजित वंजारी निवडून आले. या पराभवातून, नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या विसंवादातून भाजपने धडा घेतला. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली गेली. ते गडकरींच्या जवळचे. पण, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन फडणवीसांनी त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. विजय सोपा असूनही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मताधिक्य वाढावे म्हणून नागपुरात येऊन गेले. या सगळ्याचा परिणाम निकालात दिसला. भाजपच्या तिकिटावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची संख्या ३२५ असताना, बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली. जवळपास दुप्पट मतांच्या फरकाने बावनकुळे विजयी झाले. 

भाजपमधून आयात केलेले रवींद्र भोयर यांना मतदानाच्या आदल्या रात्री बाजूला करून अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्याचा काँग्रेसचा निर्णय अजूनही अनाकलनीय आहे. तरीदेखील १८६ मते देशमुखांकडे वळविण्यात आलेले यश हेच काँग्रेसला समाधान. पदवीधरप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही चमत्कार घडविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न फसला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सोबतच डॉ. नितीन राऊत, सुनील केदार यांचे सगळे डावपेच संख्याबळापुढे फसले. रवींद्र भोयर यांच्या ताकदीबद्दल खूपच अपेक्षा काँग्रेसने बाळगल्या होत्या. प्रत्यक्षात ते काँग्रेसकडे गेल्याने भाजपचे लोक खूश होते. त्यामुळेच ते गेले की पाठविले, यावर जोरदार चर्चा झडल्या. खरे तर माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यारूपाने असा चमत्कार घडवू शकणारा उमेदवार काँग्रेसकडे होता. याआधी त्यांनी तो घडविलाही आहे. पण, मुळक मोठे झाले तर आपले काय होईल, हा विचार करून त्यांचे पंख उमेदवारीआधीच कापण्यात आले.

अकोल्यातील शिवसेनेचा पराभव महाविकास आघाडीच्या अधिक जिव्हारी लागणारा आहे. तीन जिल्ह्यांत मिळून संख्याबळात क्रमांक एकचा पक्ष भाजप असला तरी, दोन्ही काँग्रेस व शिवसेनेची एकत्रित ताकद त्यापेक्षा अधिक आहे. अठरा वर्षे विधानपरिषदेत राहिलेले गोपीकिशन बाजोरिया यांच्यासारखा तगडा उमेदवार रिंगणात होता. बाजोरिया यांची ताकद यावरूनच स्पष्ट व्हावी, की त्यांनी त्यांचे पुत्र विप्लव यांना बाजूच्या मराठवाड्यातल्या हिंगोली-परभणीमधून निवडून आणले. कदाचित त्यामुळेच ते गाफील राहिले. महाविकास आघाडी एकसंध राहिली नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी नावाला का होईना, तटस्थ राहिली. म्हणजे ती मते वसंत खंडेलवाल यांच्याकडे गेली.

थोडक्यात हे निकाल सांगतात की, घोडा अडला, भाकरी करपली, पाने नासली हे राजकारणात एकाचवेळी घडत नाही. सोंगट्या फिरविण्याचे भान राखले की हे टाळता येते. म्हणूनच नागपूरमध्ये भाजपची भाकरी करपली नाही. वऱ्हाडात मात्र अठरा वर्षे चौखूर उधळलेला शिवसेनेचा घोडा अडला.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक