‘क्षमा वीरस्य भूषणम्’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:16 AM2018-03-19T01:16:41+5:302018-03-19T01:16:41+5:30

‘ज्यांच्यासोबत मी लहानपणी बॅडमिंटन खेळलो त्याच शिपायांनी माझ्या आजीवर गोळ्या झाडून तिची निर्घृण हत्या केली.

'Sorry Veershya Bhushanam' | ‘क्षमा वीरस्य भूषणम्’

‘क्षमा वीरस्य भूषणम्’

googlenewsNext


‘ज्यांच्यासोबत मी लहानपणी बॅडमिंटन खेळलो त्याच शिपायांनी माझ्या आजीवर गोळ्या झाडून तिची निर्घृण हत्या केली. त्याचा राग दीर्घकाळ मनात होता. पण पुढे तो मावळत गेला. त्यानंतर लिट्टेच्या ज्या मारेकऱ्यांनी माझ्या वडिलांचा स्फोटक मृत्यू घडवून आणला त्यांचाही राग मनात होता. तोही आता राहिला नाही. आता मला त्या मारेकºयांच्या घरातल्या मुला-मुलींची अधिक आठवण येते. मी त्यांना मनापासून क्षमा केली आहे. त्यांना मोकळे करण्यावर माझा कोणताही आक्षेप नाही. माझ्याएवढे माझ्या बहिणीचे, प्रियंकाचे मनही मोठे व मोकळे असल्याने तिनेही त्यांना क्षमा केली आहे.’ हे राहुल गांधी यांनी सिंगापूरमधील एका वार्तालापात काढलेले उद्गार हिंसा आणि हिंसाचार व सूड आणि सूडाचार या वृत्ती मनात बाळगणाºया साºयांनीच लक्षात घ्यावे असे आहेत. राहुल गांधी संत नाहीत, ते राजकीय नेते आहेत. पण राजकारणातली काही माणसे अशी की त्यांच्यावर अहिंसेचा व मनुष्यधर्माचा संस्कार टिकला आहे. मोतीलाल नेहरू आणि त्यांच्या पत्नी स्वरूपादेवी यांनी स्वराज्याच्या आंदोलनात अनेकदा तुरुंगवास अनुभवला. विजयालक्ष्मी आणि कृष्णा या त्यांच्या दोन कन्यांनीही आंदोलने करून तुरुंगवास ओढवून घेतला. त्यांचे चिरंजीव जवाहरलाल हे तर स्वातंत्र्यलढ्याचे नेतेच होते. राहुल गांधींवर मोतीलालजींपासून राजीव गांधीपर्यंतच्या चार पिढ्यांचा देशभक्ती व अहिंसापरतेचा संस्कार आहे. १९५० च्या सुमाराची येथे नोंदविण्याजोगी एक घटना. पं. जवाहरलाल नेहरू इंग्लंडच्या दौºयावर होते. त्यांच्यासोबत त्यांची कन्या इंदिराही होती. त्यावेळी सर विन्स्टन चर्चिल हे दुसºयांदा इंग्लंडच्या पंतप्रधानपदावर आले होते. त्यांची भेट झाली तेव्हा चर्चिल यांनी इंदिरा गांधींना विचारले ‘तुझ्या वडिलांना आम्ही अकरा वर्षे तुरुंगात ठेवले, त्यात त्यांचा छळही केला. त्याचा राग तुझ्या मनात अजून आहे काय’. एका क्षणाचाही विचार न करता इंदिरा गांधी म्हणाल्या ‘नाही’. आम्ही गांधीजींचे अनुयायी आहोत. त्यांनी आम्हाला सूड शिकविला नाही. ममत्व आणि उदारपणच तेवढे सांगितले. त्यामुळे तुम्हीही तुमच्या तेव्हाच्या निर्णयांचा आता पश्चात्ताप करण्याचे कारण नाही.’ शेवटी हिंसा वा सूड ही एक प्रवृत्ती आहे. तिचा संस्कारही सहज साध्य नसतो. तो दीर्घकाळच्या शिकवणुकीतून वा घरातल्या वातावरणातूनच यावा लागतो. तो धर्मातून वा धार्मिक म्हणवून घेणाºया संघटनांमधून येत नाही. नथुराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या घालून त्यांचा खून केला. त्याच्यावर खुनाचा खटला सुरू असताना त्याने रामदास गांधी या गांधीजींच्या चिरंजीवांना पत्र लिहून आपण तो खून का केला ते सांगितले. पुढे रामदास आणि नथुराम यांच्यात बरेच दिवस पत्रव्यवहार चालला. रामदासांनी नथुरामच्या साºया प्रश्नांची त्याला निरुत्तर करणारी उत्तरे दिली. अखेरच्या पत्रात रामदासांनी लिहिले ‘साºया देशाने ज्याला आपला पिता मानले तो गांधी माझा बाप होता. तू त्याची हत्या केलीस. हा देश तुला कदाचित क्षमा करणार नाही. पण मी बापूंच्या संस्कारात वाढलो आहे. जा, मी तुला क्षमा केली आहे.’ क्षमाशीलता ही उपजतच असावी वा संस्कारातून येत असावी. महावीरांनी तर क्षमा हे शूराचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. दुबळ्यांना फक्त द्वेष करता येतो, भयभीतांना शस्त्रे बाळगावीशी वाटतात. दया, क्षमा व शांती या गोष्टी फक्त सामर्थ्यवानांनाच साधत असतात असे उद्गार प्रत्यक्ष कस्तुरबांनीही एकदा काढले आहेत. ज्यांना कसलेही भय नाही ते निर्भय लोक गांधींसारखे शत्रूच्या राज्यातही नि:शस्त्र राहतात व सत्तेशी लढा देतात. गांधींनी या देशावर नि:शस्त्र व निर्भय राहण्याचा संस्कार केला तसा शत्रूवरही प्रेम करण्याचा संदेश दिला. तो ज्यांना स्वीकारता आला नाही, त्या करंट्यांना काही म्हणायचे नसते. त्यांची फक्त कीवच करायची असते. राहुल आणि प्रियंका या दोघांनी त्यांच्या वडिलांच्या मारेकºयांबाबत जी क्षमाशील वृत्ती धारण केली ती गांधीजींच्या शिकवणीची व भ. महावीरांच्या ‘क्षमा वीरस्य भूषणम्’ या संदेशाची साक्ष देणारी आहे.

Web Title: 'Sorry Veershya Bhushanam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.