शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

सोनियांची विराट सभा व कद्रु माध्यमे

By admin | Updated: April 13, 2016 03:47 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सोनिया गांधी व राहुल गांधींसह काँग्रेस पक्षाचे सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक नेते त्यांच्या लक्षावधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सोनिया गांधी व राहुल गांधींसह काँग्रेस पक्षाचे सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक नेते त्यांच्या लक्षावधी अनुयायांसह नागपुरात एकत्र आले तेव्हा त्यांच्या विराट सभेची दृश्ये जनतेपर्यंत पोहोचणार नाहीत याची जी काळजी देशातल्या इंग्रजी व हिंदीसकट काही मराठी प्रकाशमाध्यमांनी घेतली ती त्यांची सरकारसमोरची जी-हुजुरी आणि गळचेपी सांगणारी होती. ज्या एक-दोन मराठी वाहिन्यांनी ती दाखविली त्यांनीही ती सगळी व सभेतील उपस्थितीच्या दृश्यांसह जनतेपर्यंत जाणार नाहीत याची व्यवस्था केली. देशात एकपक्षीय राजवट आणि अघोषित आणीबाणी असल्याचे व त्यांनी प्रसिद्धी माध्यमांची मान आपल्या ताब्यातील भांडवलदार मालकांच्या हातून आवळली असल्याचेच चित्र त्यातून जनतेसमोर आले. २०१४ च्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्ष आपल्या सर्व नेत्यांसह प्रथम ठामपणे जनतेसमोर येऊन सत्तेला आव्हान देत असल्याचे व ते देत असताना भारतीय राज्य घटनेने स्वीकारलेल्या व डॉ. आंबेडकरांनी पुरस्कृत केलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षता या मूल्यांसाठी लढायला तो पुन्हा सिद्ध झाला असल्याचे या सभेने देशाला दाखविले. नरेंद्र मोदींचे सरकार शेतकरीविरोधी, स्त्रीविरोधी, विद्यार्थीविरोधी आणि दलित व आदिवासीविरोधी असल्याचा हल्ला या सभेत सोनिया गांधींनी पुरावे देऊन चढविला. संघाने आरक्षण थांबविण्याची भाषा बोलायची आणि भाजपाच्या एखाद्या मंत्र्याने तसा आमचा विचार नाही असे दुसऱ्या दिवशी जाहीर करायचे ही बाब संघ व भाजपा यांचा इरादा आरक्षणाची व्यवस्था थांबविण्याचा आहे असा आरोप त्यांनी केला तेव्हा सभेने त्यांना जोरदार प्रतिसाद दिला. देशाची धर्मबहुलता, भाषाबहुलता व सांस्कृतिकबहुलता घालवून त्याला एकारलेले व भगवे स्वरूप देण्याचा संघ परिवाराचा प्रयत्न लोकशाही व उदारमतवादी विचारांना मारणारा तर आहेच, शिवाय तो डॉ. आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध जाणारा आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या. ज्या डॉ. आंबेडकरांच्या विचारांची संघाने त्याच्या जन्मापासून अवहेलना केली त्यांनाच आता आपलेसे करण्याचा व त्यांचे सोहळे माजविण्याचा त्याचा प्रयत्न हे ढोंग असल्याचे सांगून घटनेची मूल्ये व गांधी-आंबेडकर यांचे विचार हीच देशाच्या एकात्मतेची आधारशिला असल्याचेही यावेळी सोनियांनी स्पष्ट केले. राहुल गांधींनी आपल्या भाषणात विद्यार्थी व तरुणांची या सरकारने चालविलेली धार्मिक व जातीय कोंडी उघड करताना हैदराबादच्या रोहित वेमुलाने केली ती आत्महत्त्या नसून ते त्याचे बलिदान होते असे म्हटले. या सभेसाठी महाराष्ट्रासह साऱ्या देशातून काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते एकत्र आले होते. पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, खासदार, आमदार व चाहत्यांसह मोठा वर्ग व्यासपीठावर आणि सभेत हजर होता. शिवाय या सोहळ्याला जोडून आंबेडकरांच्या श्रद्धांजलीची झालेली सभा काँग्रेसच्या नव्या उभारीची व त्या पक्षाने सत्तेला दिलेल्या नव्या आव्हानाची तयारी दाखविणारी होती. स्वाभाविकच कोणत्याही फालतू मंत्र्याची व्याख्याने बळजबरीने लोकाना ऐकविणारी माध्यमे ही सभा देशाला दाखवतील असे साऱ्यांना वाटले होते. मात्र राजकारणाची वाकडी वाटचाल, माध्यमांवर ताबा असणाऱ्यांची सरकारसमोरची लाचारी आणि त्यातल्या अनेकांनी वाहत्या वाऱ्यानुसार घेतलेले भित्रे पवित्रे यामुळे ही सभा देशाला पाहाता आली नाही. माध्यमे ही लोकशाहीतील चौथ्या क्रमांकाची ताकद आहे हे खरेच. पण त्या ताकदीचे बळ तिच्यावरील लोकांवरील विश्वासात दडले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. देशात स्थिरावू पाहणारी दूरचित्रवाणी अशी एकतर्फी व एकपक्षीय भूमिका घेऊन देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रीय पक्षाला अशी जाणीवपूर्वक अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करणारी असेल तर हा प्रयत्न त्यांच्याही ताकदीचा अंत ठरेल हे त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे. एक गोष्ट मात्र खरी. काँग्रेस पक्षाचा निवडणुकीत पराभव झाला असला तरी सामान्य काँग्रेसजन तसाच शाबूत व पक्षनिष्ठ असल्याची ग्वाही ह्या सभेने देशाला दिली. सोनिया गांधींचा उत्साह, राहुल गांधींचे आक्रमक नेतृत्व आणि त्या दोघांवर पक्षाची असलेली अविचल निष्ठाही या सभेने अधोरेखित केली. ज्या गोष्टी उघड करायला बाकीचे लोक कचरतात किंवा मोदींवर टीका करताना ज्यांची जीभ अडखळते त्या साऱ्यांना या सभेने लोकशाहीत विरोधी पक्षाला हवे असलेले टीकेचे सामर्थ्य व ती करण्याची प्रेरणा दिली यात शंका नाही. माध्यमांची या सभेने घालविलेली विश्वसनीयता परत मिळवायला त्यांनाही बरेच दिवस लागतील यात शंका नाही. एकटे सरकार प्रसन्न राहून चालत नाही, माध्यमांसोबत लोकही असावे लागतात. त्या दृष्टीने या सभेने माध्यमांची घालविलेली पत मोठी आहे आणि ती परत मिळविण्यासाठी त्यांना सरकार व मालकांचीच नव्हे तर सच्चाईची आणि जनतेची कास धरावी लागणार आहे.