स्मृती इराणींना लगेच मोडीत काढता येणार नाही
By Admin | Updated: July 8, 2016 04:38 IST2016-07-08T04:38:40+5:302016-07-08T04:38:40+5:30
ट्विटरवरील गोष्टी तशा लागट पण क्षणभंगुर असतात. स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ खाते काढून घेऊन तुलनेने कमी महत्वाचे समजले जाणारे वस्त्रोद्योग खाते त्यांना दिल्याची बातमी
स्मृती इराणींना लगेच मोडीत काढता येणार नाही
- राजदीप सरदेसाई
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)
ट्विटरवरील गोष्टी तशा लागट पण क्षणभंगुर असतात. स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ खाते काढून घेऊन तुलनेने कमी महत्वाचे समजले जाणारे वस्त्रोद्योग खाते त्यांना दिल्याची बातमी येताच त्यांच्या टीकाकारांनी ट्विटरवरुन ‘बाय बाय स्मृती इराणी’ म्हणायला सुरुवात केली. त्यातल्या काहींनी नव्या खात्याला उद्देशून ‘आंटी नॅशनल आता साडी नॅशनल’ झाल्याची खिल्लीही उडवली. इराणींच्या समर्थकांनी सुद्धा ट्विटरवर गर्दी करीत त्यांची बाजू लावून धरली. यावरुन एकच दिसून येते की, स्मृती इराणी इतक्या वादग्रस्त झाल्या होत्या की त्यांना आवरणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा अवघड झाले होते.
स्मृती इराणी निष्णात राजकारणी व बहुभाषिक उत्तम वक्त्या आहेत आणि लोकसंवाद साधण्याचे कसब त्यांना अवगत आहे. त्यांच्यातील हे गुण आजच्या काळात आवश्यकच आहेत. पण प्रभावी मंत्री होण्यासाठी आणि विशेषत: मनुष्यबळ विकास खाते सांभाळण्यासाठी ते आवश्यक आहेतच असे नाही. या खात्याची जबाबदारी पेलणाऱ्याला अनेक महत्वाचे मुद्दे काळजीपूर्वक हाताळावे लागतात. दूरचित्रवाणीवरील एखाद्या वाचाळ आणि वात्रट निवेदकास प्रभावहीन करणे ही वेगळी बाब आहे (त्याचीही कधीमधी गरज असतेच) पण कुलगुरू, आयआयटीचे संचालक, शिक्षणतज्ज्ञ आणि राज्यांचे शिक्षणमंत्री यांच्याशी भांडण करणे ही आणखीनच वेगळी बाब आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची अपेक्षा असणाऱ्या मंत्रालयाने गुणवंताप्रति अनादर बाळगणे त्या खात्याला शोभणारे नाही.
दूरचित्रवाणीवरील चर्चेतून मिळणाऱ्या टीआरपीपेक्षा आपल्या कार्यालयात बसून फायलींचा निपटारा करणे अधिक महत्वाचे असते हेच कदाचित स्मृती इराणी यांना समजले नसावे. वृत्तपत्रांच्या प्रथम पृष्ठावर पण तेही चुकीच्या कारणांखाली झळकण्याने व्यक्तिमत्वाला जे महत्व प्राप्त होते ते नेहमीच दुधारी तलवारीसारखे असते. जेएनयु आणि हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या इराणी यांनी केलेल्या जाहीर निर्भर्त्सनेमुळे त्यांच्या समविचारी लोकांनी इराणींची भरभरून प्रशंसा केली. पण त्यामुळेच त्यांनी स्वत:च्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लावून घेतले व मवाळपंथी लोक त्यांच्यापासून दुरावले. लढाऊ बाणा आणि नाटकीपणा तसेच आत्मविश्वास आणि औधत्य यांच्यातली सीमारेषा फार नाजूक असते आणि स्मृती इराणी यांनी तीच वारंवार ओलांडली. बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी त्यांना उद्देशून ट्विटरवर ‘डियर’ (प्रिय) असे म्हटले. पण या निरुपद्रवी संबोधनावरील इराणींची प्रतिक्रिया अत्यंत जहाल होती.
वरील सर्व गोष्टी विचारात घेता, विचारावेसे वाटते की इराणींची पदावनती त्यांच्या भांडखोर स्वभावामुळे झाली की पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे ती झाली? अर्थात रालोआच्या मंत्र्यांमध्ये वादग्रस्त ठरलेल्या त्या एकट्याच नाहीत. गिरीराज सिंह, संजीव बलियन आणि साध्वी निरंजन ज्योती यांनीसुद्धा अत्यंत जहाल विधाने केली आहेत. पण त्यांच्यावर अद्याप प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कारवाई झालेली नाही. इराणी संघ परिवार किंवा पक्षाच्या विरोधात गेल्या असेही काही झालेले नाही. वास्तवात जेव्हा केव्हां तशी वेळ आली तेव्हा इराणींनी एक पाऊल पुढे जात सांस्कृतिक हिंदुत्व आणि संघाचा कार्यक्रम राबविण्यात उत्साहच दाखवला आहे. आणि एखादे मंत्रालय कायम ठेवण्यासाठी ऊर्जा आणि प्रभाव या दोन बाबी गरजेच्या असतील तर मोदी सरकारमध्ये आणखीही काही लोक असे आहेत की ज्यांचीही गच्छंती व्हायला हवी.
खरे तर ज्या क्षणापासून या ३८ वर्षीय महिलेने मंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हापासून ती मत्सर आणि उपहासाचा विषय ठरली आहे. पक्षातील आणि बाहेरच्यांनीदेखील त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरुन त्यांच्यावर सतत टीकाच केली आहे. तितकेच नव्हे तर इराणी यांनी पदवी मिळवण्यासाठी येल विद्यापीठात एक आठवड्याचा अभ्यासक्र म पूर्ण केल्याची टिंगलदेखील केली गेली. काहींनी तर असेही म्हटले की बड्या नेत्यांची मर्जी प्राप्त करुन घेण्यासाठी इराणींनी त्यांच्या महिला असण्याचाही उपयोग केला. एका काँग्रेस खासदाराने त्यांना चक्क ‘नाचने-गानेवाली’ असेही म्हटले. मात्र आजच्या पुरुषसत्ताक व्यवस्थेत इराणी मात्र नेहमीच साडी, भाळी कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र याच वेशात राहिल्या आणि तेही काहीशा नवागतासमान.
स्मृती इराणी म्हणजे मायावती, जयललिता किंवा ममता नाहीत. त्या तिघींंचे राजकारणातले व त्यांच्या पक्षातले स्थान खूप मोठे आहे. म्हणूनच त्या एकतर्फी निर्णय घेण्याची जोखीम उचलू शकतात. इराणी सुषमा स्वराजदेखील नाहीत. कारण स्वराज यांच्या प्रमाणे इराणी यांनी आणीबाणीच्या काळात संघर्ष करून आपली राजकीय कारकीर्द उभी केलेली नाही. त्या सोनिया गांधीसुद्धा नाहीत कारण त्यांना बड्या घराण्याचा वारसा नाही. आणि त्या वसुंधरा राजेंप्रमाणे राजघराण्यातल्याही नाहीत. इराणी या राजकीय वारसा नसलेल्या, मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असलेल्या आणि त्या मानाने नंतर राजकारणात आलेल्या आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द अल्पकाळात आणि नाटकीय पद्धतीने उभी राहिली आहे. राजकारणात प्रचंड मेहनत घ्यावी लागत असते. भाजपासारख्या पारंपरिक विचार असणाऱ्या पक्षात तळा-गाळात जाऊन प्रचंड मेहनतीने काम करणे अपेक्षित असते. इराणींच्या अल्प काळातल्या प्रगतीने पारंपरिक वर्चस्वाची चौकट मोडली आहे आणि त्या भाजपाच्या सर्वात तरुण मंत्री झाल्या आहेत.
याचा अर्थ असाही होतो की, आपल्या विरोधातील कोणत्याही राजकीय खेळीला तोंड देण्यास इराणी असमर्थ होत्या. म्हणूनच त्यांनी आताही काळजीपूर्वक विचार करून कुणाशीही संघर्ष न करता शांत राहणे पसंत केले आहे. आपल्या टीकाकारांना नि:शब्द करण्याची मोठी संधी आता त्यांना प्राप्त झाली आहे. प्रशासकीय कामाचा मोठा रेटा असतो तेव्हां राजकीय प्रगल्भतेमध्ये घट येऊ शकते. आता तसे नाही. कदाचित आधीच्या मंत्रालयातील कामाचा अनुभव त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालयात उपयोगी पडू शकेल. पण त्यांच्या बाबतीत एक कटू सत्य मात्र नाकारता येत नाही की, भारतीय राजकारणात महत्वाकांक्षी आणि जलद प्रगती करु इच्छिणाऱ्या महिलेचे नेतेपण नेहमीच सत्वर नष्ट होणाऱ्या प्रजातीसारखे असते.
ताजा कलम: जे लोक आज इराणींना पार मोडीत काढीत आहेत ते कदाचित स्वत:च स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेत असतील. दोनेक वर्षांपूर्वी भाजपाचा एक वरिष्ठ राजकारणी त्याचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्याने आणि त्वरित दुसरी जागा नसल्याने आपल्या मूळ गावी परतत होता. पण आज तोेच राजकारणी दिल्ली दरबारात सुस्थापित झाला असून त्याने निवृत्तीचे सारे विचार बाजूला सारुन दिले आहेत. हा राजकारणी म्हणजेच देशाच्या मनुष्यबळ विकास खात्याचे नवे मंत्री प्रकाश जावडेकर! कदाचित आजपासून सहा महिन्यांनी स्मृती इराणीदेखील उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाच्या मुख्य चेहऱ्यांपैकीच एक असूही शकतील.