प्रशांत दीक्षित

मुंबई - अरूण जेटली यांच्या निधनामुळे मोदींच्या सत्ता परिवारातील दरबारी राजकारणी काळाच्या पडद्याआड गेला आहे. जेटली हे जनतेमधील राजकारणी नव्हते. त्यांचा वावर दरबारात असे. त्यांची बुद्धीमत्ता, कायद्याचा अर्थ लावण्यातील निपुणता आणि विरोधकांचे कच्चे दुवे नेमके हेरण्याची क्षमता याचा उपयोग भारतीय जनता पार्टीला नेहमी होत असे. ते दरबारी राजकारणी असले तरी काँग्रेस पक्षातील दरबारी राजकारण्यांप्रमाणे नव्हते हेही लक्षात घेतले पाहिजे. जेटलींच्या राजकारणामध्ये स्वार्थापेक्षा पक्षाच्या फायद्याला नेहमी अग्रक्रम होता. दिल्लीतील उच्चभ्रू वर्तुळात ते वावरत होते आणि खान मार्केट गँग म्हणून मोदी ज्याला हिणवत त्या गँगमध्येही जेटली यांच्याबद्दल आदर होता. उत्तम वाकचातुर्य व चलाख युक्तिवाद यांचा वापर करून खान मार्केट गँगचा भाजपाविरोधातील प्रचार उधळून लावण्यात जेटली वाकबगार होते. असे करण्यात त्यांना बौद्धिक आनंदही मिळत होता.

जेटली हे दरबारी राजकारणात असले तरी लोकभावनेची उत्तम समज त्यांना होती. गांधी घराण्याभोवती वावरणार्या दरबारी लोकांपेक्षा त्यांची लोकभावनेची समज वास्तवाला धरून असे. नरेंद्र मोदी यांच्या बाजूने भारतीय जनता झुकत आहे हे जेटली यांनी सर्वांआधी ओळखले. २०१४ नंतर ते मोदींचा विश्वासू सहकारी म्हणून जगासमोर आले. २०१३ मधील भाजपाच्या सत्तासंघर्षांत त्यांनी मोदींना खंदी मदत केली होती. मनोहर पर्रिकर आणि अरुण जेटली हे अडवाणी गटाला बाजूला करून मोदींना भाजपाच्या शीर्षस्थानी घेऊन गेले. तथापि, त्याआधी म्हणजे २००२ मधील गुजरात दंगलीनंतरही जेटली यांनी मोदींचे समर्थन केले होते. मोदी हे उगवता तारा आहे हे त्यांनी फार आधी ओळखले. मात्र, असे करण्यामागे गटबाजीचे राजकारण नव्हते तर देशाची बदलती मानसिकता ओळखण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. २००८ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीतील मोदींच्या विजयाचे त्यांचे विश्लेषण गाजले होते. योगेंद्र यादव व अन्य निवडणूक विश्लेषकांच्या विश्लेषणातील फोलपणा व एकांगी युक्तिवाद त्यांनी उघड केला होता. त्यानंतर योगेंद्र यादव यांनीही स्वतःच्या चुकांची प्रांजळ कबुली दिली होती.

संसदपटू म्हणून जेटली अधिक चांगले चमकले. राज्यसभेतील त्यांचे काम उल्लेखनीय होते. विरोधी पक्षनेते म्हणून ते प्रभावी काम करीत. त्याचबरोबर सर्व पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवीत. त्यांची टीका जहाल असली तरी विषारी नसे. टीकेपलिकडेही मित्रभावना ठेवण्याची त्यांची वृत्ती होती. मात्र मैत्र टिकविताना भाजपाच्या राजकीय हेतूंना धक्का पोहोचणार नाही याची ते काळजी घेत. त्याचबरोबर मैत्रीसाठी विचारधारा पातळ होऊ देत नसत. जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणात आले. ते कट्टर संघीय नव्हते. संघाच्या परंपरावादी विचारसरणीपेक्षा आधुनिक विचारसरणीशी त्यांचे नाते होते. मात्र, अन्य पुरोगाम्यांप्रमाणे हिंदू आचारविचारांचा त्यांनी कधीही दुःस्वास केला नाही. त्याचबरोबर कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे बाष्कळ समर्थनही केले नाही. सहमतीने राजकीय हेतू साध्य करण्याची कला त्यांच्याजवळ होती. त्यासाठी लागणारा बौद्धिक युक्तिवाद करण्याची क्षमता होती. असा युक्तिवाद करणारा जवळचा सहकारी आता मोदींजवळ नाही हे मोदींचे मोठे नुकसान आहे. मोदी लोकप्रिय आहेत व आपले म्हणणे सामान्य जनतेच्या गळी उतरविण्यात वाकबगार आहेत. परंतु, आपल्या दृष्टीकोनाला बौद्धिक पाठबळ देण्याची क्षमता मोदींकडे नाही. ती गरज जेटली पुरी करीत असत. अडचणीच्या प्रसंगी संघर्ष न करता वाटाघाटीतून मार्ग काढण्याची क्षमता जेटलींजवळ होते. ट्रबलशूटर किंवा आपत्तीनिवारक अशी त्यांची प्रतिमा होती. पक्ष वा सरकार अडचणीत सापडले की त्यांच्याकडे धाव घेतली जात असे. असा नवा आपत्तीनिवारक आता मोदींना शोधावा लागेल. कारण अमित शहा हे नेहमी संघर्षाच्या पवित्र्यात असतात. भाजपातील अन्य नेते मोदींना मानत असले तरी जेटलींइतके विश्वासाचे नाहीत.

अर्थमंत्री म्हणून जेटली यांच्या मर्यादा उघड झाल्या हेही नमूद केले पाहिजे. मोदींना पूर्ण बहुमत होते. तरीही मोदींच्या नेतृत्वाखाली जेटली हे मनमोहनसिंग किंवा चिदम्बरम यांच्याप्रमाणे उल्लेखनीय अर्थसंकल्प मांडू शकले नाहीत. मनमोहनसिंग व चिदम्बरम यांना त्यावेळच्या पंतप्रधानांचे भक्कम पाठबळ मिळाले तसे अर्थसंकल्पात जेटलींना मोदींचे मिळाले नाही काय याबाबत निश्चित माहिती नाही. कारण मोदींपेक्षा वेगळा माझा म्हणून आर्थिक विचार आहे असे जेटलींनी कधी जाणवू दिले नाही. सर्व सहमतीने जीएसटी लागू करण्यातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती व देशाच्या आर्थिक इतिहासात त्याचा ठळकपणे उल्लेख होईल. जीएसटीमध्ये सुधारणा करण्यातही ते तत्पर होते. बँकावरील अनुत्पादीत कर्जाबाबतही त्यांनी उचललेली पावले महत्वाची होती. अनुत्पादिक कर्जांच्या बोज्यातून बँका बाहेर येत आहेत त्यामागे जेटलींचे काम कारणीभूत आहे. इलोक्टरल बाँड ही त्यांची योजना टीकेचा विषय झाली असली तरी सरळमार्गाने पक्षांना पैसा उभा करण्याचा मार्ग त्यातून पुढे आला हे नाकारता येत नाही. आर्थिक वा सामाजिक सुधारणा समाजाला कितपत रुचतील हे लक्षात घेऊन तितकीच पावले आधी टाकण्याची दक्षता जेटली घेत. जीएसटी, इलेक्टोरल बाँड, इनसोल्व्हन्सी कोड अशा सुधारणांतून ही बाब लक्षात येते. झेप घेण्यापेक्षा लहानलहान सुधारणा करून अर्थव्यवस्था मार्गी लावण्याकडे जेटली यांचा कल होता. त्यांच्या काळात केंद्र सरकारची तूट मर्यादेत राहिली हे विसरता येत नाही.

क्रिकेटमध्ये त्यांना विलक्षण रस होता. क्रिकेट संघटनांमध्येही ते सक्रीय होते. यातून त्यांच्यावर केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तेव्हा त्यांनी केजरीवाल यांना कोर्टात खेचले व आरोप मागे घेण्यास लावले. कायदेशीर मार्गाने संघर्ष करण्याचा त्यांचा स्वभाव होता. काही वर्षांपूर्वी, ते सत्तेत नसताना, कुलाबा येथील एका गेस्टहाऊसमध्ये जेटली यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारण्याचा योग आला होता. त्यावेळी सचिन तेंडूलकर लोकप्रियतेच्या शिखरावर होता. सचिनला आव्हान देईल असा फलंदाज आमच्या दिल्लीत तयार होत आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवा असे त्यांनी हसत सांगितले होते. वीरेंद्र सेहवाग या त्यावेळच्या उदयोन्मुख खेळाडूकडे त्यांचा कटाक्ष होता. सचिनची जागा तो घेईल असे त्यांना वाटत होते. ते भविष्य खरे ठरले नाही, पण वीरेंद्र सेहवागच्या फलंदाजीने भारतीय क्रिकेटवर ठसा उमटविला हेही नाकारता येत नाही.
 

Web Title: A skilled lawmaker, disaster-loving cricketer arun jaitley passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.