राहतं घर कोवीड सेंटर म्हणून देऊ करणाऱ्या,‘पॉलिटिक्स नोकोरीबा बोंधू’ गाणाऱ्या आसामच्या झुबीन गर्गची गोष्ट.

By meghana.dhoke | Published: May 11, 2021 12:51 PM2021-05-11T12:51:38+5:302021-05-11T12:54:37+5:30

कलाकारांनी राजकारणाबाबत बोलावंच का, हा प्रश्न हल्ली विचारला जातो. अनेकदा न बोलताही थेट कृतीच करता येते, तेच झुबीन करतो आहे !

singer Zubin Garg from Assam offered his home as a coveted center. | राहतं घर कोवीड सेंटर म्हणून देऊ करणाऱ्या,‘पॉलिटिक्स नोकोरीबा बोंधू’ गाणाऱ्या आसामच्या झुबीन गर्गची गोष्ट.

राहतं घर कोवीड सेंटर म्हणून देऊ करणाऱ्या,‘पॉलिटिक्स नोकोरीबा बोंधू’ गाणाऱ्या आसामच्या झुबीन गर्गची गोष्ट.

Next
ठळक मुद्देअनेकदा न बोलताही थेट कृतीच करता येते, भले ती आपल्या आधीच्या भूमिकेशी सुसंगत नसली तरीही आणि ते मान्य करूनही..

मेघना ढोके

झुबीन गर्ग. त्याचं नाव आहे झुबीन बोरठाकूर. लोकप्रिय गायक.
नुकतंच त्याच्या बायकोनं, गरिमानं समाजमाध्यमांत पोस्ट केलं की, आमचं गुवाहाटीतलं दोन मजली घर आम्ही कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर म्हणून द्यायला तयार आहोत. शासनाने घर पाहून काय तो निर्णय घ्यावा. झुबीन मुंबईतच राहत असला तरी आपलं गुवाहाटीतलं काहीलीपारा परिसरातलं घर कोविड सेंटर करा असं त्याचं म्हणणं आहे. तिथं किमान ३० बेड्सची सोय होऊ शकते, असं गरिमा सांगते.
हे सारं होत असताना, त्यानं असं राहतं घर देऊ करणं यात काहीतरी पब्लिसिटी स्टंट असेल असं कुणाच्या अगदी त्याच्या राजकीय विरोधकांच्याही मनात आलं नाही. आसाम सरकारने अजून काही त्याच्या प्रस्तावाचा विचार केलेला नाही; पण आपलं राहतं घर देऊ करणारा कोण हा झुबीन, असा प्रश्न आसाम आणि ईशान्येबाहेरच्या अनेकांना पडला असेल. तसं असेल तर त्यांना माहीतच नाही की झुबीन हे काय ‘रसायन’ आहे! आसाम-बंगालसह ईशान्य भारतात झुबीन गर्ग हा तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे. त्यांच्याच कशाला बाकी देशातही झुबीन, पेपॉन, अरिजित अशा वेगळ्या आवाजांवर फिदा असणारा तरुण वर्ग मोठा आहे. त्या तारुण्याला तर झुबीनची ओळख करून द्यायची गरजच नाही. गँगस्टरमध्ये ( कंगणा रणौत- इमरान हाश्मी फेम) सिनेमात त्याचं ‘या अली’ गाणं गाजलं, तेव्हापासून त्याच्या आवाजाचे दीवाने अनेक आहेत.

झुबीन गर्ग(फोटो-गुगल)


पण झुबीन हा फक्त कचकडी पॉपस्टार नाही. सुपारी घेतली, शो केला, गाणी गायली, सुखात बसले असा तो माणूस नाही. त्याला राजकीय मतं आहेत आणि मुख्य म्हणजे ती वेळोवेळी मांडून आवडत्या राजकीय पक्षाला समर्थन देणं हे ही त्यानं जाहीरपणे केलं आहे. आपली राजकीय विचारधारा किंवा कल त्याने लपवून ठेवले नाहीत. २०१६ साली त्याची सर्बानंद सोनवाल यांच्याशी मैत्री होती, त्यानं राजरोस सभांमध्ये गाणी गात भाजपचा प्रचार केला. पुढे सोनवाल मुख्यमंत्री झाले. मात्र २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा ( सीएए) केंद्रात मंजूर झाला आणि आसामी जनतेनं त्याला विरोध केला. संतापलेला झुबीन गर्गही थेट समोर येत म्हणाला, ‘माझ्या आवाजाच्या लोकप्रियतेवर तुम्ही जेवढी मतं जिंकली तेवढी परत करा, मी तुमचे पैसे परत करतो. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आसामविरोधी भूमिका नाही घेऊ शकत, घेतली तर मी तुमच्यासोबत नाही!"
त्यानं जाहीर सभा घेतल्या. ‘पॉलिटिक्स नोकोरीबो बोंधू’ असं गाणं लिहून ते गात लोकांसमोर आपली भूमिका मांडली. शिल्पी शोंकल्प अर्थात स्थानिक कलाकारांच्या संकल्प सभांना हजेरी लावली. सीएएविरोधात उघड भूमिका घेतली.
त्याचे विरोधक म्हणाले, हा तर सोनवाल यांचा मित्र होता, भाजपच्या बाजूचा! आता हा कसा पलटी मारतो? काही जण म्हणाले की ही निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे, अशी कशी भूमिका बदलतो?
मात्र या साऱ्यात तो म्हणत होता की, मी फक्त आसामी माणसांच्या सोबत आहे. आसामी माणसांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. आम्ही एनआरसीची परीक्षा दिली, आता सीएए आणून आसामी माणसांवर लोंढे लादू नका. झुबीन ब्रह्मपुत्र खोऱ्यातील आंदोलनांचा भाग झाला. बोलत राहिला.

कट टू २०२१

आसाममध्ये भाजपा पुन्हा निवडून आला. आसाममधलं धार्मिक ध्रुवीकरण-आसामी बंगाली मतांत पडलेली फूट ही त्यामागची कारणं!- पण तरीही झुबीन गर्ग आसामी माणसांच्या बाजूने उभं राहण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यानं कोरोनाकाळात आपलं घर देऊ करत एक कृतिशील पाऊल पुढे टाकलं आहे.
कलाकारांनी सत्तेच्या बाजूनं किंवा विरोधात बोलत मतं मांडलीच पाहिजे का, बोललंच पाहिजे का, असे प्रश्न वारंवार विचारले जातात. अनेकदा न बोलताही थेट कृतीच करता येते, भले ती आपल्या आधीच्या भूमिकेशी सुसंगत नसली तरीही आणि ते मान्य करूनही..
झुबीन तेच करतो आहे..
गंमत पहा
आणि हे सारं होत असताना भाजपच्या विजयानंतरही सोनवाल यांची मुख्यमंत्री म्हणून खुर्ची गेली आहे, आणि आता हिंमत बिस्वा सरमा आसामचे मुख्यमंत्री झालेत..

Web Title: singer Zubin Garg from Assam offered his home as a coveted center.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app