Of simple humanity, of overall rural development | साद माणुसकीची, समग्र ग्रामविकासाची

साद माणुसकीची, समग्र ग्रामविकासाची

आपण सर्व आज जीवनाच्या अशा वळणावर आहोत की उद्याच्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे त्याची कल्पना करताना इतर देशांत विशेषत: युरोपमध्ये सध्या जे काही घडत आहे; त्याच्यावरून काळजाचे ठोके चुकावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, कोरोनाच्या या महाभयंकर विळख्यातून सहीसलामत सुटल्यावर आपणास प्रतिबंधात्मक अशी जर सर्वांत महत्त्वाची कोणती गोष्ट करावी लागेल तर ती आहे समग्र ग्रामविकास. ज्यामुळे महानगरे आणि शहरांचा बोजा न वाढू देत चंगळवादी संस्कृतीला आवर घालत आपण पर्यावरणाला हानी न पोहोचवता जगू शकू आणि अचानक उद्भवणाऱ्या अशा संकटांना निमंत्रण देणे बंद करू. आयुष्यात प्रथमच संपूर्ण भारत आपापल्या प्रियजनांसोबत घरात थांबून अनेक बाबतीत निरनिराळे वास्तवाचे धडे गिरवत असताना बघतो आहे. थेट भासवत नसले तरी सर्वजण प्रचंड अशा भीतीखाली वावरत आहे. एक दिवस सर्वांनी मिळून एकत्रितपणे कृती केली तर खरंच काय फरक पडतो बरं ? ‘जनता कर्फ्यू’च्या एका दिवसाने मनुष्याला खूप मोठा कानमंत्र दिला आहे आणि तो म्हणजे सर्वांनी मिळून ठरवलं तर अशक्य असे काहीच नाही.


चीनच्या वुहानपासून सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग अमेरिका, युरोपात थैमान घालून दुबईमार्गे भारतात पोहोचला. कोरोनामुळे वेवेगळ्या कारणांनी शहरी बनलेल्या अनेकांनी आपल्या मूळ गावी धाव घेतली आहे. कारण गावे अजूनही या प्रादुर्भावापासून दूर आहेत आणि सहवासात आल्याशिवाय हा संसर्ग होऊ शकणार नसल्याने गावाकडे तुलनेने धोका कमी आहे. गावांनीही त्यांना प्रवेश दिला आहे. आपले मानले आहे. पण हे लोक अपवाद वगळता गावच्या विकासासाठी काय करतात हा प्रश्नच आहे.
निवृत्तीनंतर अनिवासी ग्रामवासींना आपल्या गावाची ओढ असते, त्यांना उर्वरित आयुष्य गावी जाऊन राहावेसे वाटते. मात्र, सोयी-सुविधांच्याअभावी ते शहरातच राहणे पसंद करतात. शहरात ज्यांची कामे संपलेली आहे; अशा अनिवासी ग्रामवासी निवृत्त लोकांना आपापल्या गावांत परतण्यासाठी (रिव्हर्स मायग्रेशन) गावाकडील सोयी-सुविधांकडे लक्ष देणे ही सरकारची प्राथमिकता असली पाहिजे. अनिवासींचा शहरांवरचा हा ताण कमी झाल्यानंतरच उपजीविकेसाठी गावांतील काही तरुणांना शहराची वाट धरता येईल. तोपर्यंत सध्या केवळ ‘वन वे’ ट्रॅफिक झाले आहे. त्यामुळेच भविष्यात वाढून ठेवलेल्या सर्व समस्यांचे ते मूळ आहे आणि म्हणूनच समग्र ग्रामविकास होणे ही काळाची गरज आहे.


ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सरकार योजना आखत नाही असे नाही, पण त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही; हे वास्तव नाकारून चालणार नाही. त्यासाठी राजकारणी व नोकरशाहीच्या वरदहस्ताने आणि जनजागरणाच्याअभावी अनेक योजना गावांपर्यंत पोहोचेपर्यंत मध्यस्थच त्याचा कागदोपत्री लाभ घेतात हे आता सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, अशाही स्थितीत काही ठिकाणी चांगले काम होत आहे. तिथे त्याचे दृश्य परिणाम दिसत आहे. मात्र, त्याचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. आमच्या ‘साद माणुसकीची’ फाऊंडेशनतर्फे मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी या माझ्या मूळ गावापासून ‘सादग्राम’ निर्मिती प्रशिक्षणाला सुरुवात करून काही गावांत काम केले. तेथील चांगल्या-वाईट अनुभवांच्या आधारे परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ९ गावांत आम्ही प्रयोग सुरू केला आहे. अल्पावधीतच त्याला ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या भक्कम पाठिंब्याने खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अशा स्थितीत ग्रामविकासाच्या संबंधित सर्व घटकांना एकत्रित साद घालून त्यांच्या प्रतिसादातून गावांचा विकास साधण्याची प्रक्रिया म्हणजे ‘सादग्राम’ निर्मिती. अर्थातच ही प्रक्रिया जेवढी समजायला सोपी तेवढीच तिची अंमलबजावणी कठीण आहे म्हणूनच एवढे वर्ष ग्रामविकास रखडलेला आहे. मात्र, संबंधित सर्व घटकांनी एकत्रित विचार करून ठरविले तर ग्रामविकास अगदी सहज होऊ शकतो. सादग्राम निर्मिती प्रक्रियेतून आम्ही तेच मांडतो आहोत. समग्र आणि शाश्वत ग्रामविकास झाला नाही तर महानगरांपासून शहरांपर्यंत सर्वांच्याच मुळावर येईल ते काही वेगळे सांगण्याची गरज नाही.


सर्वांनी मिळून मनावर घेतले आणि एकजूट दाखविली की आज ज्याप्रमाणे कोरोनाच्या भीतीने संपूर्ण भारताने एकजूट दाखवत ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी केला तसाच ग्रामविकास मनावर घेतला आणि गावांचे सक्षमीकरण करण्याचे धाडस दाखवले तरच आपण भविष्यात आपल्या पुढे वाढून ठेवलेल्या समस्यांचा सक्षमपणे सामना करू शकू. कोरोनाच्या सद्य:परिस्थितीत शक्यतो गावात जास्त जण एकत्र जमू नये. महानगरांतून आलेल्या आपल्या प्रियजनांपासून साधारणपणे पुढील १०-१२ दिवस शक्यतो सुरक्षित अंतर ठेऊन त्यांच्याशी नित्याचे व्यवहार करावेत. चला तर मग आपण सर्वच मिळून कोरोनाच्या या संकटाचा संधी म्हणून वापर करूया आणि आपल्या गावात आलेल्या सर्व अनिवासी ग्रामवासींना आपल्या गावाच्या समस्यांची माहिती करून देऊया आणि आपल्या गावाच्या विकासात त्यांचे महत्त्वाचे योगदान घेऊया. ज्यांना आपल्या गावाला ‘सादग्राम’च्या वाटेवर न्यायचे आहे त्यांनी आम्हाला संपर्क करावा. त्या-त्या जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यातील किमान एक गाव या प्रक्रियेत सामील व्हायला आले की त्या जिल्ह्याचा सादग्राम निर्मितीसाठी विचार करण्यात येईल.

- हरीश बुटले
संस्थापक-संचालक
साद माणुसकीची फाउंडेशन, पुणे

Web Title: Of simple humanity, of overall rural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.