शेख हसीनांचा घोटाळा ४३ हजार कोटींचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 09:04 IST2025-01-01T09:03:06+5:302025-01-01T09:04:00+5:30
बांगलादेशच्या अँटी करप्शन कमिशननंही (एसीसी) शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या कथित घोटाळ्यांची चौकशी सुरू केली आहे. ‘एसीसी’च्या मते शेख हसीना आणि त्यांच्या परिवारानं किती मालमत्तेचा गफला केला असावा? त्यांच्या मते, हा घोटाळा पाच अब्ज डॉलर, म्हणजेच सुमारे ४३ हजार कोटी रुपयांचा आहे.

शेख हसीनांचा घोटाळा ४३ हजार कोटींचा?
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कटकटींत दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यांनी भारतात आश्रय घेतल्यापासून त्यांच्यावरचे आरोप वाढतच आहेत. त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करावं अशी भारताकडे होणारी मागणीही सातत्यानं वाढतेच आहे. त्यांच्यावरील आरोपांची जंत्री तर कमी होण्याचं नावच नाही.
शेख हसीना यांना पायउतार व्हावं लागल्यानंतर आणि बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांचं सरकार स्थानापन्न झाल्यापासून मोहम्मद युनूस यांनीही शेख हसीना यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. बांगलादेशच्या अँटी करप्शन कमिशननंही (एसीसी) शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या कथित घोटाळ्यांची चौकशी सुरू केली आहे. ‘एसीसी’च्या मते शेख हसीना आणि त्यांच्या परिवारानं किती मालमत्तेचा गफला केला असावा? त्यांच्या मते, हा घोटाळा पाच अब्ज डॉलर, म्हणजेच सुमारे ४३ हजार कोटी रुपयांचा आहे.
‘ढका ट्रिब्यून’च्या मते शेख हसीना यांच्यावर आरोप आहे की बांगलादेशची राजधानी ढाकापासून सुमारे १६० किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या आणि रशियानं डिझाइन केेलेल्या रुपपूर येथील न्यूक्लियर पॉवर प्लान्टमध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच मोठा हात मारला आहे. त्यातून त्यांनी खूप कमाई केली आहे आणि आपलं उखळ पांढरं करुन घेतलं आहे. रशियाची सरकारी कंपनी रोसाटॉमच्या मदतीनं सुरू असलेल्या या पॉवर प्लान्टमध्ये काही भारतीय कंपन्यांचीही हिस्सेदारी आहे.
रूपपूर न्यूक्लियर पॉवर प्लान्टची सुरुवात २०१७ मध्ये झाली आणि २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच बांगलादेशच्या हायकोर्टानं एसीसीवरही ताशेरे ओढले होते. या घोटाळ्याला तुमच्या निष्क्रियतेचीही साथ होती, त्यामुळे तुमच्या या कृत्याला बेकायदेशीर का म्हणू नये, म्हणून एसीसीची लक्तरं चव्हाट्यावर आणली होती. त्यातून आपली अब्रू थोडी तरी झाकली जावी म्हणून एसीसीनं लगेचं शेख हसीना यांच्याविरुद्ध चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शेख हसीना यांनी या पॉवर प्लान्टच्या माध्यमातून मोठा घोटाळा केला असून, त्यातून कोट्यवधी रुपये हडपले असल्याचे आणि हा पैसा त्यांनी मलेशियात ट्रान्सफर केला असल्याचा एसीसीचा आरोप आहे.
शेख हसीना, त्यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय, बहीण रेहाना आणि भाची ट्यूलिप सिद्दीक यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आलं आहे. माध्यमांच्या अहवालानुसार ट्यूलिप सिद्दीक, शेख रेहाना आणि इतर काही जणांना मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून तीस टक्के रक्कम मिळाली होती. शेख हसीना सध्या भारतात असल्या तरी त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो, तर त्यांची भाची ब्रिटनमध्ये आहे. शेख रेहाना यांच्याबाबत मात्र अजून ठोस माहिती मिळालेली नाही. शेख हसीना यांची भाचीही राजकारणी असून ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या लेबर पार्टीची ती सदस्य असून खासदार आहे. शेख हसीना यांनी जेव्हापासून भारतात आश्रय घेतला आहे, तेव्हापासून त्यांना परत बांगलादेशात पाठवण्याची मागणी होते आहे. बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन यांनीही याबाबत भारताला पत्र पाठवले आहे. त्यांचं म्हणणं आहे, बांगलादेश सरकारला माजी पंतप्रधानांनी कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं असं वाटतं. त्यापासून त्यांनी पळ काढू नये.
दुसरीकडे या मागणीवरून शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद यांनी युनूस सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या मते युनूस सरकारनं नियुक्त केलेले न्यायाधीश आणि वकील यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाच्या माध्यमातून एक हास्यास्पद खटला सुरू केला आहे. खरं तर तो आमचा राजकीय छळ करण्याचा प्रयत्न आहे. न्यायाला बगल देताना अवामी लीगच्या नेत्यांवरील हल्ल्यांना सरळसरळ प्रोत्साहन देण्याचा हा प्रकार आहे. आमच्या हजारो कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे अटक केली जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे आणि त्याचवेळी इतरांवर हत्येचे आरोप लावले जात आहेत. याप्रकरणी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होण्याची गरज आहे, पण सरकारनं न्यायालयाचं आपल्या हातातलं बाहुलं आणि हत्यार बनवलं आहे. या न्यायावर आमचा बिलकुल विश्वास नाही.
२० वर्षे सत्तेचा प्रदीर्घ पट!
शेख हसीना जवळपास वीस वर्षे बांगलादेशच्या सत्तेत राहिल्या. २३ जून १९९६ला त्या पहिल्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या. २००१ ते २००९ त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. ६ जानेवारी २००९ला त्या दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या. २०१४ला तिसऱ्यांदा, २०१९मध्ये चौथ्यांदा तर जानेवारी २०२४मध्ये त्या पाचव्यांदा आणि लागोपाठ चौथ्यांदा पंतप्रधान बनल्या. देशात आंदोलन सुरू झाल्यानंतर ५ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि भारतात आश्रय घेतला.