शरद पवार ‘समजणे’ महाकठीण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 02:22 AM2019-12-04T02:22:55+5:302019-12-04T02:23:16+5:30

शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती जेवढे समज आहेत, त्याहून अधिक गैरसमजही आहेत. त्याला त्यांचे विरोधक जितके जबाबदार आहेत, तेवढेच ते ...

Sharad Pawar 'Understanding' is HARD! | शरद पवार ‘समजणे’ महाकठीण!

शरद पवार ‘समजणे’ महाकठीण!

Next

शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती जेवढे समज आहेत, त्याहून अधिक गैरसमजही आहेत. त्याला त्यांचे विरोधक जितके जबाबदार आहेत, तेवढेच ते स्वत:ही आहेत. अनेक गैरसमजुतींविषयी वेळेवर त्यांचा खुलासा ते करीत नाहीत, त्यामुळे सामान्य माणसांचा गैरसमज होतो. याचा त्यांच्या राजकीय विरोधकांनी अनेक वेळा फायदा उठविला आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा घोळ पाच आठवडे चालू होता. या दरम्यान, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतरच अजित पवार यांनी बंड करीत भाजपला पाठिंबा दिला. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध नसताना तो जोडला गेला. त्यावर सामान्य माणसांचा विश्वास बसला होता.

मोदी-पवार भेट अणि अजितदादांचा शपथविधी यांच्यात काहीतरी समान धागा असल्याची चर्चा चालू झाली, तेव्हा त्यांनी तातडीने खुलासा केला नाही; कारण राजकीय घडामोडी चालू होत्या. त्या दरम्यान पवार यांच्या ख्यातीप्रमाणे अफवांचे पेव फुटले. शरद पवार काहीही करू शकतात, अशीही चर्चा चालू झाली. वास्तविक, त्यांचे राजकीय आकलन, त्यांचे इतरांशी असलेले संबंध यांचा अंदाज नसल्याने अनेक जण फसतात. विरोधकांना त्यांच्यावर मात करण्यासाठी अविश्वासार्ह नेता अशी प्रतिमा करण्यात रस असतो. अशा आरोपांना किंवा टीकेला ते तातडीने उत्तर देत नाहीत. त्यांचा इतका प्रचंड जनसंपर्क आहे की, कोणत्या कामासाठी कोणाशी संपर्क साधून ते काम ते साध्य करतील, हे कळणारही नाही. त्यामुळे त्यांचा अंदाज येत नाही.

नरेंद्र मोदी यांनी शेतीच्या प्रश्नाशिवाय राजकारणावर केलेली चर्चा त्यांनी बाहेर सांगून मोठेपणा मिळविला नाही. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हा सर्व घटनाक्रम सांगितला. त्याला आपण ‘गौप्यस्फोट’ म्हणतो. राजकारणात अशा अनेक गोष्टी पडद्यामागे घडत असतात. पंजाबच्या प्रश्नावर राजीव गांधी यांना मदत करण्यासाठी भोपाळच्या तुरुंगात जाऊन प्रकाशसिंग बादल यांची त्यांनी रातोरात भेट घेतली होती. पहाटे दिल्लीला जाऊन राजीव गांधी यांना भेटीचा वृत्तान्त सांगून ते परतले होते. तेव्हा ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. राष्ट्रीय प्रश्नांवर राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टी करायच्या असतात. या भेटीवर त्यांनी कधीही भाष्य केले नाही.

राजीव गांधी यांना पंजाब कराराचे श्रेय मिळाले. त्यात त्यांनी राजकारण आणले नाही. नामांतराच्या प्रश्नावर बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधी भूमिका घेतली. ते औरंगाबादला जाऊन विरोध करणार होते. ठाकरे यांना जिल्हाबंदी घातली होती. शरद पवार मुख्यमंत्री होते. संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण तंग बनले होते. शरद पवार मात्र, त्या दिवशी सांगली दौºयावर होते. एका कार्यक्रमात ते शेजारच्या घरात जाऊन फोनवर बोलून आले. बातमी न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, ठाकरे नगर-औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवरून परतले. प्रशासनावर असलेला हा वचक होता. शरद पवार यांच्या कार्यशैलीसह कार्यक्षमतेचाच अंदाज अनेकांना नाही. परिणामी, ते काय करू शकतात, याचा अंदाज अनेकांना येत नाही. मोदी यांची भेट ज्या कारणांसाठी होती, तेवढेच त्यांनी माध्यमांना सांगितले.

ज्या राजकारणावरून अनेक गुंतागुंती तयार होऊ शकतात, त्या त्यांनी तातडीने उघड केल्या नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक गुणांचा परिचय नसलेले वेगळाच प्रचार करतात. अशा माध्यमांवर ते अलीकडे नाराजीही व्यक्त करीत असतात. अजित पवार यांचे प्रकरण त्यांनी ज्या पद्धतीने हाताळले, ते पाहता शरद पवार ‘समजणे’ महाकठीण आहे. ‘महाविकास आघाडी’ स्थापन होत असताना, ठाकरे कुटुंबीयांशी असलेल्या संबंधांची चर्चा झाली. त्याचे त्यांनी कधी प्रदर्शन केले नव्हते. उलट एकमेकांवर सडकून टीका केली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी दिलेली आॅफर आणि त्यावर घेतलेला निर्णय हा शरद पवार यांचा मुरब्बीपणाच म्हणावा लागेल. याची माहिती असणाऱ्यांनीच त्यांच्यावर प्रतिक्रिया द्याव्यात; अन्यथा शरद पवार समजणे कठीण जाईल. त्यासाठी हा गौप्यस्फोट महत्त्वाचा ठरतो.

Web Title: Sharad Pawar 'Understanding' is HARD!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.