शाब्बास तुकाराम मुंढे!
By Admin | Updated: December 10, 2015 23:43 IST2015-12-10T23:43:58+5:302015-12-10T23:43:58+5:30
श्री सिद्धेश्वर देवस्थान आणि दरवर्षी भरणारी गड्डा यात्रा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय आहे. इथल्या भुईकोट किल्ल्याजवळील निसर्गरम्य तलावाच्या मध्यभागी असलेले

शाब्बास तुकाराम मुंढे!
श्री सिद्धेश्वर देवस्थान आणि दरवर्षी भरणारी गड्डा यात्रा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय आहे. इथल्या भुईकोट किल्ल्याजवळील निसर्गरम्य तलावाच्या मध्यभागी असलेले श्री सिद्धेश्वर मंदिर आणि परिसर जगतविख्यात अमृतसरच्या सुवर्णमंदिराशी तुलना करावी एवढा सुंदर! त्याच कारणाने सुवर्णमंदिराच्या धर्तीवर हेही मंदिर विकसित व्हावे हे स्वप्न उराशी बाळगून मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी धडपड करीत आहेत. त्यांचा प्रामाणिकपणा, सुस्वभाव आणि लोकाभिमुख कार्यपद्धती हा देखील जिल्ह्याच्या कौतुकाचा विषय असतो. काडादी आणि मंदिर समितीच्या टीमच्या परिश्रमामुळे लाखो भाविकांच्या साक्षीने दरवर्षी तब्बल दीड महिना चालणारी गड्डा यात्रा मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पडते. गत वर्षापासून मात्र गड्डा यात्रा आणि तिचे व्यवस्थापन या मुद्यावरून धुसफुस सुरू झाली. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करण्यास सुरुवात केली आणि सगळे बिनसले! २००५ च्या शासनाच्या निर्णयानुसार आणि कायद्यानुसारच आपण काम करीत असल्याचा जिल्हाधिकारी मुंढे यांचा दावा आहे. यातूनच मुंढे विरुद्ध सिद्धेश्वर देवस्थान समिती असा वाद सुरू झाला. मुंढेंनी यात्रा नियोजनासाठी तीस कलमी आराखडा तयार केला. त्यापैकी २८ कलमांवर मंदिर समिती राजी झाली. आपत्कालीन रस्त्यावर दुकाने थाटू नयेत आणि मंदिर परिसरापासून दूर असलेल्या गड्डा यात्रास्थळी धुळीपासून भाविकांच्या संरक्षणासाठी नंदीध्वज मार्ग, पार्किंग, शोभेचे दारूकाम स्थळ आणि होमविधी स्थळ सोडून उरलेल्या ३५ ते ४० टक्के परिसरात मॅटिंग टाकावे, या दोन कलमांना मंदिर समितीने विरोध केला आणि वातावरण चिघळले. मुंढेंच्या विरोधात बंद आणि मोर्चाचे हत्त्यार भाविकांनी उपसले. या पार्श्वभूमीवर अनेकांच्या मनात ‘शाब्बास, तुकाराम मुंढे’ का म्हणायचे, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पण एकूणच मुंढेंच्या गड्डा यात्रा कृती आराखड्याचा अन् होम मैदानाच्या कायमस्वरूपी नियोजनाचा अभ्यास केल्यानंतर कोणताही सुजाण नागरिक किमान या मुद्यावर तरी ‘शाब्बास’ म्हटल्याशिवाय राहणार नाही, असे वाटते. एकीकडे राज्याच्या स्मार्ट सिटीच्या यादीत आल्याचा आनंदोत्सव आपण करीत आहोत. मग सर्वाधिक धूळ असलेल्या देशातील पहिल्या १० शहरातही आपले सोलापूर शहर आहे, याची खंत करायला नको का? सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या भुरेलाल समितीने तसा अहवाल दिला होता, हेही आपण विसरायचे काय? आपत्कालीन रस्ता ही सुरक्षेची व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेचे महत्त्व आपण दुर्घटना घडल्यानंतरच जाणणार आहोत का? अशा असंख्य प्रश्नांनी आपल्या मनाला त्रस्त केले की मग आपसूकच ‘शाब्बास, तुकाराम मुंढे’ म्हणावे वाटते.
सुधारणावाद आणि पुरोगामी विचारांचा जागर हे श्री सिद्धेश्वरांच्या पवित्र विचारतत्वाचे सार आहे. ९०० वर्षांची परंपरा तर आपण जतन केलीच पाहिजे. पण ती करताना मंदिर परिसराच्या बाहेर बदलत्या काळानुसार अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि सुरक्षेच्या आघाडीवर योग्य ते बदल स्वीकारायलाच हवेत. सुवर्णमंदिराच्या धर्तीवर तेवढ्याच तोलामोलाने श्री सिद्धेश्वर देवस्थान विकसित व्हावे. त्यासाठी कालानुरुप बदल स्वीकारले पाहिजेत. त्याच बदलांची नांदी म्हणून मुंढे आग्रही असलेल्या मुद्यांकडे पाहायला हवे.
मुंढेंना गड्डा यात्रा आराखड्याबद्दल शाब्बासकी देत असताना त्यांच्या एककल्लीपणाबद्दल देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकप्रतिनिधींच्या सामाजिक प्रतिष्ठेचा आदर न राखणे, त्यांना न भेटणे, ताटकळत ठेवणे, भेटीसाठी येणाऱ्या सामान्य माणसांना भेट न देणे, समोरच्यांचे म्हणणे समजून न घेता आपलेच खरे करणे, आणि सर्वात महत्त्वाचे ग्रामीण भागाच्या पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, दुष्काळ या मुद्यांवर लोकहितापेक्षा तथाकथित नियमांना मिठी मारून बसणे या कृतींमुळे मुंढेंच्या विरोधातील लोकांचा रोष वाढत आहे. लोकभावना आणि कायद्याचा मेळ घालून सर्वांना सोबत घेऊन जाणे हा मुंढेंचा स्वभाव नाही. त्याच स्वभावामुळे त्यांना जनक्षोभाला सामोरे जावे लागत आहे.
- राजा माने