संहारशक्तीची पंचाहत्तरी, ‘लिटिल बॉय’ नामक अणुबॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 12:17 AM2020-08-07T00:17:47+5:302020-08-07T00:21:56+5:30

अमेरिका आणि सोव्हिएत गणराज्यातल्या शीतयुद्धातून प्रचंड सामूहिक संहाराची क्षमता असलेल्या शस्त्रांच्या निर्मितीला अक्षय ऊर्जा मिळत गेली.

Seventy-five atomic bombs called 'Little Boy' | संहारशक्तीची पंचाहत्तरी, ‘लिटिल बॉय’ नामक अणुबॉम्ब

संहारशक्तीची पंचाहत्तरी, ‘लिटिल बॉय’ नामक अणुबॉम्ब

Next

स्वत:ला प्रगत आणि सुसंस्कृत समजणाऱ्या मानव जातीत हिंसा आणि संहाराची आदिम प्रेरणा अजूनही लवलवत असल्याचे दर्शवणारे काही इतिहासदत्त दिवस आहेत. ६ आॅगस्ट हा त्यापैकी एक. १९४५ मध्ये या दिवशी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर ‘लिटिल बॉय’ नामक अणुबॉम्ब टाकला. क्षणार्धात एक नांदते शहर उद्ध्वस्त झाले. तत्क्षणी मृतांची संख्या ७० हजारांच्या घरातली होती. त्यानंतर रेडिएशनमुळे आणखीन दहा हजारांना प्राण गमवावा लागला. जन्मभराच्या वेदना घेऊन जगणारे अगणित होते. आजही अधूनमधून तेथे जन्मास येणाºया एखाद्या नवजात अर्भकात त्या विध्वंसक शस्त्राच्या परिणामाच्या खुणा दिसतात. या घटनेला यंदा पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली. मात्र, या पाऊण शतकाने मानवजातीला शहाणपणा शिकवलेला नाही, उलट तिची संहारक शक्ती मन बधीर करणाºया गतीने वाढते आहे. १९४५ चा ‘लिटिल बॉय’ खेळणे वाटावे, अशा संहारक क्षमतेची विध्वंसक शस्त्रे जगाने विकसित केलेली आहेत. अणुबॉम्ब आता मागास म्हणण्याजोगे शस्त्र झालेय. सामूहिक नाश करणाºया शस्त्रांचा हव्यास हायड्रोजन बॉम्बचा भयावह टप्पा ओलांडून आता बराच पुढे गेलेला आहे. १९६१ साली तत्कालीन सोव्हिएत गणराज्याने ज्या आरडीएस २२० नामक हायड्रोजन बॉम्बचा प्रायोगिक स्फोट करून आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले होते, तो बॉम्ब हिरोशिमाला उद्ध्वस्त करणाºया अणुबॉम्बपेक्षा ३,८०० पटींनी संहारक होता.

अमेरिका आणि सोव्हिएत गणराज्यातल्या शीतयुद्धातून प्रचंड सामूहिक संहाराची क्षमता असलेल्या शस्त्रांच्या निर्मितीला अक्षय ऊर्जा मिळत गेली. सोव्हिएत गणराज्याच्या अकल्पित आणि गतिमान विघटनानंतर आण्विक शस्त्रे आणि त्यांच्या निर्मितीविषयीचे ज्ञान बेजबाबदार प्रवृत्तीच्या हाती पडण्याची शक्यता निर्माण झाली आणि नागरी समाजातून सतत दबाव येऊ लागला. परिणामी अण्वस्त्रधारी देशांना एकत्र बसून सामूहिक संहार करू शकणाºया शस्त्रांची संख्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला. १९८६ साली या संहारक क्षमतेच्या शस्त्रांची ज्ञात संख्या ७०,००० होती. हळूहळू कमी करत गतसाली ती १३,८६५वर आलेली आहे. यातील ९० टक्के शस्त्रे अमेरिका आणि सोव्हिएत गणराज्याचे हृदयस्थान असलेला रशिया या दोन देशांकडे आहेत. जागतिक महासत्ता म्हणून स्वत:ला गेल्या दशकभराच्या कालखंडात प्रस्थापित केलेल्या चीनच्या संहारक क्षमतेविषयीची माहिती नेहमीप्रमाणे पोलादी पडद्याआड लपलेली आहे. पण आजमितीस अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड आणि फ्रान्स या देशांबरोबरच भारत, इस्रायल व पाकिस्तान हे देशही अणुशस्त्रांनी सज्ज असल्याचे मानले जातेय. शिवाय दक्षिण आफ्रिकेकडेही अशी शस्त्रे निर्माण करण्याचे प्रगत तंत्रज्ञान आहे. आज उत्तर कोरियाही अण्वस्त्रसज्ज असल्याचे बहुतेक तज्ज्ञ मानतात. मध्य पूर्वेत इराणला असलेली अण्वस्त्रांची आस लपून राहिलेली नाही. इराक, सीरिया या देशांनीही इस्रायलला शह देण्यासाठी अण्वस्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान आयात करण्याचा यत्न चालवला होता. ही संहाराची प्रेरणा आता जैविक, रासायनिक आणि रेडिएशनयुक्त शस्त्रांच्या निर्मितीत गुंतलेली आहे. या शस्त्रांना वाहून नेण्यासाठी आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती झालेली आहे. अमेरिका, रशिया आणि चीनसारखे देश तर उपग्रहांद्वारे शस्त्रे सोडण्याच्या तंत्रापर्यंत पोहोचले आहेत. एकूणच जगाची संहारक क्षमता आणि ऊर्मी तसूभरही कमी झालेली नाही. तिने केवळ आपले

स्वरूप नवतंत्रस्नेही बनवत संदिग्धतेचे आवरण पांघरलेले आहे. अमेरिका दरवर्षी आपले ‘न्युक्लिअर पॉश्चर रिव्ह्यू’ हा धोरणदर्शक अहवाल प्रसिद्ध करते. स्वसंरक्षणासाठी वेळ पडल्यास अण्वस्त्रांचा सर्वंकष वापर देश करील, अशी प्रच्छन्न ग्वाही हा अहवाल देतो. अमेरिकेसारख्या महासत्तेकडून जेव्हा अशा प्रकारचे विधान केले जाते, तेव्हा त्याला मदांध म्हणावे लागते, पण मद आणि मत्सराने अंध झालेले उर्वरित जगही अमेरिकेच्याच पावलावर पाऊल ठेवत अतिसंहारक होते आहे, हे कसे नाकारता येईल? हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरांना उद्ध्वस्त करणाºया अणू तंत्रज्ञानाच्या संहारक क्षमतेची मानवाला लागलेली ओढ आजही तितकीच तीव्र आहे. त्यानंतरच्या प्रत्येक दशकात ती अधिक हिंस्र होत गेली आहे. जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर नेणाºया या तंत्रज्ञानाला आवर घातला येईल का?

Web Title: Seventy-five atomic bombs called 'Little Boy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.