अंधश्रद्धा फैलावणे म्हणजे एकप्रकारे संघटित गुन्हेगारीच
By Admin | Updated: January 3, 2015 22:33 IST2015-01-03T22:33:31+5:302015-01-03T22:33:31+5:30
तब्बल सात जणांचे नरबळी, तेही या पुरोगामी महाराष्ट्रात! नाशिक जिल्ह्यातील उघडकीस आलेली ही ताजी घटना.

अंधश्रद्धा फैलावणे म्हणजे एकप्रकारे संघटित गुन्हेगारीच
चेटूक, भुताटकी काढण्यासाठी जातोय निष्पाप जिवांचा बळी
तब्बल सात जणांचे नरबळी, तेही या पुरोगामी महाराष्ट्रात! नाशिक जिल्ह्यातील उघडकीस आलेली ही ताजी घटना. टाके हर्ष या गावातील मांत्रिकीण बच्चाबाई खडकेने ‘भुताळीण’ म्हणून जाहीर केलेल्या वयस्कर स्त्रीस मारून टाकण्यात आले. तिचा आदेश गावातील अनेकांनी मानला. त्यातून हा भीषण प्रकार उघडकीस आला. विज्ञानयुगातील हे भयानक कृत्य आपणास जंगलात नेऊन ठेवते आहे.
हाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर अजूनही या घटना घडताहेत. कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी अशी प्रकरणे खून, खुनाचा प्रयत्न या कलमाखाली दाखल केली जायची. तेव्हा अंधश्रद्धेपोटी बळी जाणाऱ्यांसाठी कायदा नव्हता. पण आता हा कायदा अस्तित्वात आल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात १०६ प्रकरणांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. गंभीर बाब ही आहे, की यापैकी १२ प्रकरणांत नरबळी देण्यात आले. चेटूक, भुताटकी काढण्यासाठी निष्पाप जिवांचा बळी गेला. दोन प्रकरणांत तर जी व्यक्ती जादूटोणा करीत आहे, असा संशय घेण्यात आला; त्यांनाही हकनाक मरावे लागले आहे.
या सर्व प्रकरणांचे वैशिष्ट्य हे, की केवळ आदिवासी, ग्रामीण भागातच जादूटोण्यापोटी बळी देण्यात-घेण्यात आलेले नाहीत. पुण्यासारख्या शहरातील विश्रांतवाडी येथील सय्यद आलम बाबाने पैशाचा पाऊस पाडण्यासाठी नग्नपूजा करवून घेऊन नरबळी घेतला आहे. मुंबईतही हे घडले आहे. मालाड येथे जादूटोणा काढते, म्हणून सुकरी झोप हिची संशयापोटी हत्या केली आहे. आजही या घटना घडताहेत़ यामागची कारणे उघड आहेत. बहुसंख्य प्रकरणे जी झाली आहेत, ती एक तर पैशाच्या हव्यासापोटी झाली आहेत किंवा गुप्तधनासाठी झाली आहेत. परिस्थिती दोष निवारण करणे किंवा आजारपण दूर करणे यासाठी बळी देणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाईट गोष्ट ही आहे की अंधश्रद्धेपोटी हत्या करताना आईची, पत्नीची, मुलांची हत्या करण्यासही आरोपींनी मागे-पुढे पाहिलेले नाही. गुप्तधन असते, अज्ञात दैवी शक्तीमुळे रोग होतात किंवा परिस्थिती बिघडते, या अंध समजुती समाजात अजूनही शाबूत आहेत, हे विशेष!
या अंधश्रद्धा शाबूत ठेवण्यामागे कोण आहेत, हे उघड सत्य आहे. या अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या बुवा-मांत्रिकांचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहे. खरेतर यांचे शासकीय सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सांगली जिल्ह्याचेच उदाहरण घेतले, तर दर तीन ते चार गावांमागे एक मांत्रिक किंवा देवऋषी असतो, अशी स्थिती आहे. पिंगळा, ज्योतिषी, देवऋषी, मांत्रिक, भुते काढणारे, अंगात दैवी शक्ती आणणारे, दैवी पदार्थ-दवा-वस्तूने रोग बरे करणारे, करणी काढणारे असे कोणी ना कोणी तरी असतेच. यात भर पडते ती दर्गे व मंदिरे या ठिकाणी चालणाऱ्या अघोरी प्रकारांची. अशी कृत्ये करणारे दर्गे, मंदिरे, देवस्थाने यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाकडून प्रभावी उपाययोजना आज अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत घाऊक स्वरूपात या ठिकाणाहून अंधश्रद्धा फैलावल्या जातात आणि तेथील अघोरी प्रकार म्हणजे एकप्रकारे संघटित गुन्हेगारीच होय. (लेखक अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)
या समजुती, अंधश्रध्दा निर्माण करणारी प्रसारमाध्यमे, संस्था, स्वयंघोषित धार्मिक-आध्यामिक केंद्रे आणि देवाची भीती घालून कर्मकांडाच्या नावाखाली विधी करणारे विविध जाती-धर्माचे पुजारी या साऱ्यांवर दंडक घालणे आवश्यक आहे. बाजारू अर्थव्यवस्था व विषम समाजरचना ही जी आजची शोषण व्यवस्था आहे, ती अंधश्रध्दांचा भडका उडविण्यास कारणीभूत आहे.
सामान्य माणूस जेव्हा या जादूटोण्याच्या नादी लागतो, तेव्हा त्यास हे लक्षात येत नाही, की तो कोणत्या विनाशाकडे जातो आहे. त्यातही तो हे सर्व छुपेपणाने करतो. त्यामुळेच मांत्रिक-तांत्रिकांचे फावते. समाजानेच आता उघडपणे या गोष्टी समोर आणणे, हा अशा नरबळींना रोखण्याचा प्रभावी उपाय आहे.
अंधश्रध्दा निर्मूलनात शासनाचा सहभाग आजअखेर अत्यल्प राहिला आहे. तो वाढविणे आवश्यक आहे. खेडोपाडी-वाडी-वस्तीवर गेली २५ वर्षे जीवावर उदार होऊन ‘अंनिस’चे कार्यकर्ते समाजप्रबोधन करीत आहेत. मात्र प्रबोधन स्वखर्चाने आणि कोणत्याही शासकीय अनुदानाविना होते. त्यामुळे त्यास मर्यादा पडतात. जर शासकीय कृतिशील सहभागाने प्रभावी प्रबोधन झाले, तर कित्येक नरबळी-जादूटोणाबळी थांबतील.
डॉ. प्रदीप पाटील