उद्धव ठाकरे यांच्यात घडते व्यावहारिक नेत्याचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 05:29 AM2020-07-27T05:29:57+5:302020-07-27T05:31:05+5:30

कालपर्यंत आपण शिवसेना परिवाराचे नेते होतो. मात्र, आता महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या कुटुंबाचे प्रमुख आहोत, अशी उद्धव यांची धारणा असून, जेव्हा उद्धव आता पूर्वीसारखे सहज भेटत नाहीत अशी तक्रार शिवसैनिक करतात, तेव्हा उद्धव हेच त्यांना सांगतात.

SEEING of a practical leader takes place between Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्यात घडते व्यावहारिक नेत्याचे दर्शन

उद्धव ठाकरे यांच्यात घडते व्यावहारिक नेत्याचे दर्शन

Next

- संदीप प्रधान । वरिष्ठ सहायक संपादक
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारली तेव्हा ससा आणि कासवाच्या गोष्टीतील शर्यत जिंकणारे ते कासव आहेत, असे लिहिले होते. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या उद्धव यांच्याकडील बदललेल्या जबाबदारीनंतर त्यांच्यात झालेल्या बदलांची चर्चा करणार आहोत.
उद्धव यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे असे आहे की, पक्षप्रमुख असताना उद्धव यांच्यात असलेला आत्मविश्वास आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्माण झालेला आत्मविश्वास यामध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आहे. बाळासाहेबांच्या पश्चात आपली उपेक्षा केलेल्या भाजप नेत्यांना सत्ताविन्मुख राहायला भाग पाडून आपल्यावरील अन्यायाची सव्याज परतफेड केल्याचा आनंद त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो. जोपर्यंत शरद पवार यांच्यासारखा मुरब्बी नेता आपल्यासोबत आहे, तोपर्यंत काळजी करण्याचे कारण नाही, अशी उद्धव यांची धारणा आहे.


कालपर्यंत आपण शिवसेना परिवाराचे नेते होतो. मात्र, आता महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या कुटुंबाचे प्रमुख आहोत, अशी उद्धव यांची धारणा असून, जेव्हा उद्धव आता पूर्वीसारखे सहज भेटत नाहीत अशी तक्रार शिवसैनिक करतात, तेव्हा उद्धव हेच त्यांना सांगतात. मुख्यमंत्री होईपर्यंत पक्षाच्या वैचारिक वारशाबाबत हळवे असलेले उद्धव आता व्यावहारिक राजकारणी झाले आहेत. राजकारणात राममंदिरावर बोलत राहताना सेक्युलर (?) विचारधारा मानणाऱ्या पक्षांसोबत सत्तेत राहण्याची व सत्तेचा जास्तीत जास्त वाटा आपल्या ताटात खेचून घेण्याची कसरत ते उत्तम करू लागले आहेत. बाळासाहेबांनी कायम लक्ष्य केलेल्या सोनिया गांधी यांना दिल्लीत स्वत:हून भेटण्यात कमीपणा न मानणे हा उद्धव यांच्यात सत्तेने घडविलेला मोठा बदल आहे.
शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून वाद होईल, असे विरोधकांना वाटत होते. उद्धव हे मुख्यमंत्री झाले व नंबर दोनवरून पक्षात संघर्ष होऊ नये याकरिता आदित्य यांना सोबत घेऊन प्रश्न निकाली काढला. उद्धव हे ‘मातोश्री’बाहेर पाऊल ठेवत नाहीत, यावरून विरोधक त्यांच्यावर टीका करतात. त्याबाबत ते म्हणतात की, मी महाराष्ट्रातील जनतेचा कुटुंबप्रमुख आहे. या जनतेला जेव्हा मी घरीच सुरक्षित रहा, असे सांगतो, तेव्हा मीच जर फिरलो तर जनता मलाच जाब विचारेल. ज्या बैठका मी तंत्रज्ञानाच्या मदतीने घरात बसून घेऊ शकतो, त्याकरिता मी घराबाहेर का पडायचे? कोरोनामुळे आता आॅनलाईन शिक्षण सुरू झाले; पण व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे याकरिता मी कितीतरी अगोदर प्रयत्न केले होते. आदित्य यांनी प्रशासनाचा, सरकारी कामकाजाचा अनुभव घ्यावा व भविष्यात दीर्घकाळ सत्तेच्या माध्यमातून जनतेची सेवा करावी, अशी पितृसुलभ भावना त्यांची आहे. एकाच कामाकरिता आदित्य यांना भेटल्यावर मला भेटू नका, असे सक्त आदेश उद्धव यांनी दिलेत.


उद्धव यांच्या नोकरशाहीच्या हाताळणीवरून टीका होते. त्यावर ते म्हणतात की, भाजपने मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या मुसक्या आवळण्याकरिता अजोय मेहता यांना नियुक्त केले. मात्र, त्याच मेहता यांच्याशी सेनेचे पुढे सूर जुळले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मालमत्ता कर माफ करण्याची योजना राबविण्याचा आराखडा तयार करून पुन्हा विजय प्राप्त करण्याकरिता मेहता यांनी सेनेला मोलाचे सहकार्य केले होते. तुकाराम मुंढे यांची नागपूरमध्ये केलेली नियुक्ती, केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधानांकडे मुंढे यांची केलेली तक्रार हे सारे उद्धव यांना नोकरशाहीची हाताळणी कशी करायची, याची जाण नसल्याचे द्योतक आहे का? धारावी झोपडपट्टीत कोरोनाने डोके वर काढल्यावर लागलीच तेथे मोठ्या प्रमाणावर लोकांची आरोग्य तपासणी, जनजागृती करून कोरोना आटोक्यात आणला. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने त्याची दखल घेऊन कौतुक केले. कोरोना हाताळणीवरून शिवसेनेला लक्ष्य करीत असताना धारावीच्या व पर्यायाने सेना सरकारच्या यशात आपलाही हातभार लागला हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही उच्चरवात सांगावेसे वाटले. पवार हेच सरकार चालवितात, असा एक प्रवाद आहे. मात्र, पवार यांना झटपट अनलॉक हवा असतानाही ठाकरे यांनी त्यांच्या धिम्या गतीने लॉकडाऊनमधून अनलॉकच्या दिशेनी वाटचाल केली. या वाटचालीत जर काही बदलले नसेल तर ते ‘मातोश्री’वरील प्रेम आणि पिताश्री बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक असलेल्या ‘महापौर निवासात’ नित्यनेमाने भेट देऊन नतमस्तक होणे.

Web Title: SEEING of a practical leader takes place between Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.