स्त्रियांना सुरक्षेची हमी देणारा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 00:22 IST2017-05-08T00:22:22+5:302017-05-08T00:22:22+5:30
भारत हा स्त्रियांसाठी कमालीचा असुरक्षित देश आहे, असा अभिप्राय यासंदर्भात अध्ययन करणाऱ्या जागतिक यंत्रणांनी नोंदविला आहे. देशात

स्त्रियांना सुरक्षेची हमी देणारा निर्णय
भारत हा स्त्रियांसाठी कमालीचा असुरक्षित देश आहे, असा अभिप्राय यासंदर्भात अध्ययन करणाऱ्या जागतिक यंत्रणांनी नोंदविला आहे. देशात दरदिवशी शंभर म्हणजे प्रत्येक तासाला चार ते पाच बलात्कार होतात. बलात्कार आणि विनयभंगाच्या ज्या तक्रारी पोलिसांत नोंदविल्या जातात त्यांची ही आकडेवारी आहे. यातील जे गुन्हे पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत त्यांचा समावेश यात नाही आणि त्यांची आकडेवारी याहून मोठी आहे. याखेरीस कुटुंबात होणारे बलात्कार हे सार्वजनिक चर्चेचे विषय कधी होत नाहीत आणि त्यांच्याही नोंदी कोणी ठेवत नाहीत. पत्नीच्या संमतीवाचून तिच्यावर लादला जाणारा शरीरसंबंध हाही बलात्कारच असतो. पण तो पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषाधिकार मानला जात असल्याने नीतीची चर्चा करणारे आपले विचारवंत व व्यासपीठेही त्यांची दखल घेत नाहीत. अशा देशात बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने चार नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावणे ही बाब तसे गुन्हे करू इच्छिणाऱ्यांच्या मनात धडकी भरविणारी व तशा गुन्ह्यांना सरावलेल्यांच्या मनात दहशत बसविणारी आहे. दिनांक १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्ली या देशाच्या राजधानीत सहा गुंडांनी ‘निर्भया’ या तरुणीवर पाशवी बलात्कार करुन तेवढ्याच अमानुष पद्धतीने तिचा बळी घेतला. या सहाही आरोपींना पकडण्यात (यापैकी एकाने आत्महत्या केली, तर एक बालगुन्हेगार ठरला) व त्यांची चौकशी करून त्यांना फाशीपर्यंत पोहोचविण्यात पोलीस यंत्रणेने जी तडफ व सावधगिरी बाळगली ती वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींंनी या प्रकरणात एकट्या निर्भयालाच नव्हे, तर सगळ्या भारतीय महिलांना न्याय व संरक्षण यांची हमी दिली आहे. ‘असा प्रकार कराल तर फासावर जाल’ हेच त्यांनी यानंतरच्या संभाव्य गुन्हेगारांना बजावले आहे. बलात्कार व विनयभंगाचा आरोप असलेले अनेक जण साध्या संशयाचा फायदा घेऊन सुटताना समाजाला दिसतात. बलात्कारित स्त्री विदेशी असेल तरी तीही तडक आपल्या मायदेशी जाते व तिचे गुन्हेगार मोकळे होतात. गुन्हेगार खासदार असेल तर पोलीस संबंधित स्त्रीच कशा वाईट चालीची आहे हे सांगून त्याचा बचाव करण्याच्या प्रयत्नाला लागतात. (सध्या भाजपाच्या अशा दोन खासदारांना वाचविण्याचा वसा आपल्या पोलीस यंत्रणेने घेतलाही आहे.) समाजातले विचारवंत व धर्मगुरूही अशावेळी पुरुषांना दोष न देता स्त्रियांनाच दोषी ठरविताना दिसतात. त्यांनी घरातलीच कामे व जबाबदाऱ्या पार पाडाव्या, असे एका राष्ट्रीय म्हणविणाऱ्या संघटनेच्या प्रमुखाने अलीकडेच म्हटले आहे. काहीजण स्त्रियांच्या पोशाखांना, त्यांच्या मनमोकळ्या वागण्याला व पुरुषांच्या बरोबरीने आत्मविश्वासानिशी वावरण्याच्या वृत्तीला दोष देतात. निर्भयासारखे प्रकरण घडले की मग अशांची दातखिळी बसते. सारा देशच मग तिच्या बाजूने उभा होतो. प्रश्न एकट्या निर्भयाचा नाही. ती हे जग सोडून कधीचीच गेली आहे. तिचे गुन्हेगारही यथावकाश मृत्युपंथाला लागतील; मात्र या घटनेने ज्या एका मोठ्या प्रश्नाकडे देश व समाज यांचे लक्ष वेधले आहे त्याचा विचार यापुढे महत्त्वाचा ठरणार आहे. आपल्या समाजात मुलींना व स्त्रियांना निर्भयपणे वावरता येईल, त्यांना पुरुषांचे भय वाटणार नाही, आपल्या स्त्रीत्वाचा संकोच तिच्या मनात राहणार नाही आणि स्त्री-पुरुष समतेसाठी आवश्यक ते निकोप वातावरण येथे निर्माण होईल अशी धारणा आता साऱ्यात रुजविणे गरजेचे आहे. असे गुन्हे अशिक्षित वा गुन्हेगारी वृत्ती असणारेच करतात हेही खरे नाही. सरकारी कार्यालये, पोलिसांची ठाणी, सार्वजनिक महत्त्वाच्या जागा आणि प्रत्यक्ष घरातही ते होत असतात. बलात्कार हे स्त्रीला नमविण्याचे पुरुषांचे सर्वात मोठे हत्यार व साधन आहे, असे मानसशास्त्र का म्हणते तेही येथे लक्षात घ्यायचे. स्त्रीविषयक मानसिकता बदलणे, आपल्याला मिळतात ते सारे अधिकार व स्वातंत्र्य तिला उपलब्ध करून देणे आणि स्त्रियांच्या माणूसपणाचा आदर करणे याही बाबी समाजमनात रुजणे गरजेचे आहे. लोहिया म्हणाले, स्त्रियांनी बलात्काराकडे अपघातासारखे पाहून आपला पुढचा आयुष्यक्रम आखावा. परंतु बलात्कार ही स्त्रियांना आयुष्यातून उठविणारी, समाज व कुटुंबाच्याच नव्हे तर तिच्या मनातूनही उद्ध्वस्त करणारी आणि तिच्या आत्म्यावर जखम करणारी निर्घृण बाब आहे. तो घाव तिला कधी विसरता येत नाही. आणि ती विसरली तरी समाज तिला तो विसरु देत नाही. निर्भयावर बलात्कार करणाऱ्या आरोपींना मरेपर्यंत फाशी देणे त्याचमुळे महत्त्वाचे व स्त्रियांना अशा आघातांपासून संरक्षण देणारे आहे. या शिक्षेची माहिती सर्वदूर, गावखेड्यात आणि गुन्हेगारांच्या जगतातही पोहोचली पाहिजे. प्रत्येक घरात व कुटुंबात तिची चर्चा झाली पाहिजे. आणि महिलांच्याच नव्हे, तर पुरुषांच्या संघटनांनीही या निर्णयाचे स्वागत करून यापुढे अशा घटना घडू न देण्याच्या प्रतिज्ञा केल्या पाहिजेत. ‘हे असे चालणारच’ असे म्हणणाऱ्या प्रवृत्ती आपल्यात फार आहेत. आता या प्रवृत्तीही ठेचून काढण्याची वेळ आली आहे. देश व समाज यांची जगभर बदनामी अशा घटनांमुळे होत राहिली तर हा देश महासत्ता बनला काय आणि समाज, जगाचा गुरु बनला काय, याचे जगाच्या मनातील स्थान खालचेच राहणार आहे.