पवार-मोदी यांच्यातल्या गुळपिठाचे गुपित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 06:35 AM2021-07-22T06:35:26+5:302021-07-22T06:36:57+5:30

केंद्रीय संस्थांचा ससेमिरा सहन करणाऱ्या मोदींना ‘आत’ टाकण्याची खुमखुमी यूपीए काळात अनेकांना होती... असे सांगतात, की तेव्हा पवार मध्ये आले!

the secret behind sharad pawar and pm modi meet | पवार-मोदी यांच्यातल्या गुळपिठाचे गुपित

पवार-मोदी यांच्यातल्या गुळपिठाचे गुपित

Next

- हरीष गुप्ता

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात गेले काही दिवस सतत जे गुळपीठ जमते आहे त्याचे रहस्य काय असावे? याची पाळेमुळे थेट संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) काळात आहेत, हे फारच थोड्या लोकांना माहिती असेल. त्या वेळी मोदी केंद्रीय संस्थांचा ससेमिरा सहन करीत होते.  मोदींना कोठडीत घेऊनच त्यांची चौकशी केली गेली पाहिजे, असा काँग्रेस पक्षातल्या काही ‘ससाण्यां’चा आग्रह होता. शरद पवार यांचा मात्र या योजनेला कडाडून विरोध केला, असे सांगतात. केंद्र सरकारने असे काहीही करण्याला पवार यांनी त्या वेळी अतिशय उच्च स्तरावर विरोध केला होता. जे काही लढायचे ते राजकीय मैदानात, केंद्रीय संस्थांचा वापर करून नव्हे, असे पवार यांचे म्हणणे होते. मोदींच्या विरोधात सीबीआय चौकशी लागली होती; पण तेंव्हाचे सरकार त्यांना अटक करेपर्यंत गेले नाही. पुढे मोदींना न्यायालयांकडूनही दिलासा मिळत गेला.

हे सगळे चालू असताना मोदी आणि पवार यांच्यामध्ये व्यक्तिगत संबंधही निर्माण झाले. गुजरात केडरचे सनदी अधिकारी पी. के. मिश्रा यांना केंद्रात सचिवपदी बढती मिळाली; पण कोणीही केंद्रीय मंत्री त्यांना स्वीकारेना. त्या अडचणीच्या प्रसंगात मोदी यांनी पवार यांना गळ घातली होती, असे सांगण्यात येते. पवारांकडे त्या वेळी बरीच खाती होती. २००६ साली पवार यांनी मिश्रा यांना कृषी खात्याचे सचिव म्हणून स्वीकारले. मोदी यांनी वेळोवेळी पवार यांचा वेगवेगळ्या बाबींवर सल्ला घेतला आहे. त्यामुळे काही राजकीय समझोता होईल न होईल, दोघांमध्ये घट्ट मैत्री आणि एकमेकांबद्दल आदर आहे, हे मात्र नक्की!

२७ वर्षांनी घड्याळाची टिकटिक 

गुजरात दंगलीच्या वेळी मोदी यांच्याशी वाईट वागणारे राजकीय नेते, पत्रकार  यांची यादी मोठी आहे. आर. बी. श्रीकुमार त्या वेळी गुजरात पोलिसात महानिरीक्षक होते. गोधरात दंगल उसळली तेंव्हा पोलिसांच्या एका पथकाचे नेतृत्व त्यांनी केले होते. २००७ साली ते निवृत्त झाले. सध्या सीबीआय त्यांना केंव्हाही ताब्यात घेईल अशी स्थिती आहे. पण, त्याचा संबंध गुजरात दंगलीशी नाही. 

१९९४ साली श्रीकुमार केरळात गुप्तचर विभागाचे उपसंचालक होते. इस्रोचे वैज्ञानिक नंबी नारायणन यांना कुठल्याशा प्रकरणात चुकीने गोवल्याची चौकशी सीबीआयने सुरू केली आहे. केरळ पोलिसांकडून एका गुप्त अहवालाच्या आधारे नंबी, दोन मालदिवी महिला आणि इतरांना अटक करण्यात आली. इस्रोतील हेरगिरीचे ते प्रकरण होते. नारायणन त्या वेळी इस्रोतील उगवते तारे मानले जात. महत्त्वाच्या क्रायोजेनिक इंजीन तंत्रज्ञानावर ते काम करीत होते. डिसेंबर १९९४ मध्ये सीबीआयने नारायणन व इतरांना निर्दोष ठरवले. प्रकरण बंद करण्याचा अहवाल तयार केला. सर्वोच्च न्यायालयाने अहवाल उचलून धरताना हे प्रकरण दुष्टाव्यातून रचलेले कुभांड ठरवले. २०१८ साली केरळ सरकारसह विविध संस्थांकरवी नंबी यांना १.९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली; मात्र त्यावेळी श्रीकुमार यांना कोणताही दंड झाला नाही. 

आता हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले आहे. सीबीआयने त्याकरिता न्यायालयाची विशेष परवानगी घेतली. श्रीकुमार यांनी खोटा गुप्तचर अहवाल तयार केल्याने सर्वांना त्रास झाला, असा आरोप आहे. श्रीकुमार यांनी गोधरा प्रकरणात हाराकिरी केली नसती तर कदाचित हे प्रकरण पुन्हा खुले करण्यात आले नसते, असे म्हटले जाते. मोदी यांच्या अधिपत्याखालील कायदा - सुव्यवस्था अधिकाऱ्यांनी शंकास्पद भूमिका बजावली, असे त्यांनी लिंगडोह समिती आणि नानावटी मेहता आयोगापुढे बनावट प्रतिज्ञापत्र सादर करून सांगितले. आता हे प्रकरण श्रीकुमार यांच्या मानगुटीवर भुतासारखे येऊन बसले आहे. सीबीआय केंव्हाही कारवाई करू शकते. 

अश्विनी वैष्णव यांच्यात दडलेली प्रतिभा 

अश्विनी वैष्णव मोदी यांच्या मनात एवढे का भरले असावेत, याबद्दल आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. वैष्णव यांना राज्यसभेची जागा मिळावी म्हणून मोदींनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि प्रदेश भाजप अध्यक्षांना फोन केला. बिजू जनता दलाला २०१९ साली आपल्या वाट्याच्या राज्यसभेच्या सर्व जागा घेता आल्या असत्या; पण त्यांनी भाजपसाठी एक सोडली. वैष्णव यांच्याशी मोदी यांचे विशेष्य नाते तयार होण्याचे कारण काय?.. 

वाजपेयींच्या काळात २००३ साली वैष्णव पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून काम करीत होते. मोदी यांना त्यांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले असे सांगतात. पण, त्याउलटही चर्चा ऐकायला येते. काही सूत्रांचे म्हणणे असे, की वैष्णव यांच्याकडे ना काही ‘विशेष्य माहिती’ होती, ना वाजपेयींकडे त्यांना काही वजन होते. माजी पंतप्रधानांना मिळणाऱ्या सोयीसुविधांच्या शिष्टाचारानुसार वैष्णव पुढे वाजपेयी यांचे ‘पी. एस.’ झाले, तेव्हाही ते वाजपेयींचा विश्वास संपादू शकले नाहीत. दोन वर्षांतच त्यांना गोव्यात मडगाव पोर्ट ट्रस्टचे डेप्युटी चेअरमन म्हणून पाठविण्यात आले.

२००८ साली वैष्णव अभ्यास रजा घेऊन व्हॉर्टनला गेले आणि शेवटी २००८ मध्ये त्यांनी सनदी अधिकारीपद सोडले. २०१२ मध्ये उद्योजक म्हणून  ते गुजरातेत अवतीर्ण झाले. पुन्हा मोदींच्या संपर्कात आले. बहुविध अनुभव असलेली वैष्णव यांच्यासारखी माणसे मोदी शोधतच होते. उडिया असूनही ते गुजराती उत्तम बोलतात. नोकरी सोडण्यात त्यांनी साहस पत्करले होते. ओडिशातून आलेल्या पी. के. मिश्रा यांच्याशी त्यांची जातीच्या बाजूनेही जवळीक होती. अनेक हुशार, कुशल व्यक्तींप्रमाणे वैष्णव यांनी २०१४ साली मोदी यांच्या ‘वॉर रूम’मध्ये पडद्याआड काम केले. पण, आज ते जेथे पोहोचले त्यासाठी आवश्यक असे  काही खास गुण त्यांच्याकडे असणार, हे नक्की!
 

Web Title: the secret behind sharad pawar and pm modi meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.