आजच्या तारखेत देशातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करताना दिसून येत आहे. भूजलाची सातत्याने खालावणारी पातळी ही भविष्यातील धोक्यांचे पूर्वसंकेतच देत आहे. जेथे पाणी नसते तेथील भूमीला सोडून स्थलांतरणाचे प्रमाण वाढते. त्यामुळेच भूजल संवर्धनाचा मुद्दा हा गंभीरतेने घेण्याची आवश्यकता आहेच. हीच बाब लक्षात घेऊन जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयांतर्गत येणाºया केंद्रीय भूमी जल मंडळातर्फे देशातील तिसºया ‘भूजल मंथन’चे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. केवळ शहरी भागच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील भूजलाची पातळी खालावते आहे. काही वर्षांअगोदर जेथे काही फुटांवर पाणी लागायचे, तेथे आता अनेक मीटर खोल खणावे लागत आहे. आपल्या देशात खरे पाहिले तर पाण्याची कमतरता नाही. परंतु पावसाळ्यात पडणारे पाणी वाचविण्याची किंवा पाणी जमिनीत जिरवण्याची यंत्रणाच आपल्याकडे कार्यरत नव्हती. नदी, नाल्यांमधील बहुतांश पाणी समुद्रात वाहून जाते ही बाब भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशासाठी दुर्दैवीच म्हणावी लागेल. परंतु मागील काही काळापासून भूजल संवर्धनासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर कृषीक्षेत्र सिंचनाखाली आलेच. शिवाय त्या त्या परिसरांमध्ये भूजल पातळीदेखील वाढण्यास मदत झाली आहे. आपल्या देशाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता पाण्याचे संवर्धन करणे ही फारशी कठीण बाब नाही. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि समाजाच्या सहभागाची आवश्यकता आहे. तसे पाहिले तर भूजलाची पातळी वाढविण्याची जबाबदारी ही एकट्या सरकारची नाहीच. जोपर्यंत जनमानसातून सहभाग वाढत नाही, तोपर्यंत उद्दिष्टपूर्ती होणे हे निव्वळ अशक्यच आहे. आजच्या घडीला अनेक सामाजिक संस्था भूजल व्यवस्थापन व नियोजनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या संस्थांच्या प्रयत्नांमधून काही गावांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. पाणी केवळ जीवन नाही तर जीवनमान उंचाविण्याचेदेखील साधन आहे. अनेक अविकसित गावांत भूजलाचा योग्य उपयोग केल्यामुळे तेथील लोकांचा विकास झाल्याची उदाहरणे आपल्याच राज्यात आहेत. प्रशासन, जनता, संशोधक, तज्ज्ञ, उद्योगक्षेत्र यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच भूजल संवर्धनासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणीदेखील झाली पाहिजे. असे झाले तर ‘भूजल मंथन’ उपक्रमातून जलामृत निघाले असे म्हणता येईल.
भूजल वाचवा, भूमी वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:36 IST