संघाची ‘असहिष्णू’ सावली

By Admin | Updated: November 17, 2015 03:26 IST2015-11-17T03:26:21+5:302015-11-17T03:26:21+5:30

संघाच्या विखारी हिंदुत्वाची मूकपणे का होईना भाजपा पाठराखण करीत असेल तर पुढे अनेक आव्हाने उभी ठाकणार आहेत. आपल्या पक्षातील बहुजन नेत्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम

The Sangh's 'intolerant' shadow | संघाची ‘असहिष्णू’ सावली

संघाची ‘असहिष्णू’ सावली

- गजानन जानभोर

संघाच्या विखारी हिंदुत्वाची मूकपणे का होईना भाजपा पाठराखण करीत असेल तर पुढे अनेक आव्हाने उभी ठाकणार आहेत. आपल्या पक्षातील बहुजन नेत्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम कसे राहील आणि त्यांना संघाच्या सावलीपासून दोन हात लांब कसे ठेवता येईल, याकडे भाजपा नेत्यांना कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल.

बिहार विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची कारणमीमांसा करण्यात भाजपा नेते गर्क आहेत. मोदी-शाहंचा अहंकार, योगी आदित्यनाथ, गिरिराज सिंहसारख्यांची शिवराळ भाषा, दादरी हत्त्याकांड, गोमांस, आरक्षण अशा अनेक निमित्तांच्या गर्दीत आणखी एका गोष्टीची भाजपामध्ये चर्चा होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पक्षात वाढत असलेला हस्तक्षेप हे कारण या पराभवामागे असल्याचे नेते खासगीत बोलतात. विशेषत: भाजपात असूनही संघाशी फटकून वागणाऱ्या बहुजन समाजातील नेत्यांना या चिंतेने ग्रासले आहे. असेच सुरू राहिले तर पुढच्या निवडणुकीत कठीण आहे, असे त्यांना वाटते.
विदर्भातील बहुतांश भाजपा आमदारांचा संघाशी संबंध नाही. डॉ. सुनील देशमुख, समीर मेघे, आशिष देशमुख या विद्यमान भाजपा आमदारांची राजकीय जडणघडण संघाविरुद्ध लढण्यातच झाली. भाजपात असूनही राजकारणातील ‘सहिष्णू’ ओळख मिटू न देण्यात हे आमदार यशस्वी ठरले. त्यामुळे एरवी भाजपा आणि संघाला मत न टाकणाऱ्या मतदारांनी त्यांच्या प्रतिमेकडे बघून मतदान केले. मेघे, देशमुखांची नावे प्रातिनिधिक आहेत. विदर्भातील ४४ भाजपा आमदारांमध्ये असे ‘सहिष्णू’ चेहरे दिसतील. या सर्वांना भविष्याची चिंता सतावत आहे. सध्या अशी परिस्थिती आहे की, भाजपा मंत्र्यांचा, आमदारांचा पीए कोण असावा याचा निर्णय संघ पदाधिकारी घेतात. मंत्री, आमदारांचे रोजचे रिपोर्टिंग या पीए कम खबऱ्यांच्या माध्यमातून संघाला होत असते. त्यामुळे हे पीए की संघाचे हेर? अशा संशयाच्या भोवऱ्यात मंत्री-आमदार सापडले आहेत. विदर्भात पुढील दोन वर्षांत नगरपरिषद आणि महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यात बिहारसारखे हाल होऊ नयेत म्हणून स्थानिक नेते कामाला लागले आहेत. विकासकामांचा झंझावात निवडून येण्यासाठी पुरेसा नसल्याने सामाजिक व जातीय समीकरणांकडे त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. अशावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे वर्चस्व किती सहन करायचे या विवंचनेत हे नेते सापडले आहेत. महाराष्ट्रात भाजपाला तळागाळापर्यंत पोहोचवताना पक्षाला बहुजन चेहरा राहील, ही काळजी घेण्यात आली. आमगावचे लक्ष्मणराव मानकर, लाखांदूरचे नामदेवराव दिवटे, साकोलीच्या इंदुताई नाकाडे, खामगावचे पांडुरंग फुंडकर, मोतीरामजी लहाने, अकोल्याचे श्यामराव धोत्रे, बाळापूरचे वसंतराव देशमुख या बहुजन समाजातील नेत्यांना याच कारणांमुळे बळ देण्यात आले. त्यावेळी भाजपात संघाचा हस्तक्षेप नव्हता असे नाही, पण दबावामुळे बहुजन समाज भाजपापासून दूर जाईल, ही भीती धुरिणांना वाटत होती. पण पुरोगामी चळवळी जसजशा कमकुवत होत गेल्या, बहुजनांचे नेते वैयक्तिक लाभांसाठी लाचार होत गेले तसतसा संघ निर्ढावत गेला. गोपीनाथ मुंंडेंना केंद्रीय मंत्रिमंडळात घ्याच, अशी विनवणी गडकरी-फडणवीसांना सरसंघचालकांकडे करावी लागली, ही गोष्ट संघाने भाजपावर ताबा मिळवल्याचे द्योतक होती.
आरक्षणाचा फेरविचार करण्यात यावा, असे सरसंघचालक सांगतात तेव्हा भाजपाला मत देणाऱ्या ओबीसींच्या पोटात भीतीचा गोळा उठणे स्वाभाविक आहे. बिहारमध्ये भाजपाचा पराभव दलित, अल्पसंख्याक मतदारांनी केलेला नाही. संघाचे असहिष्णू हिंदुत्व मान्य नसलेल्या ओबीसी हिंदूंनीही त्यात हातभार लावला, ही गोष्ट कशी विसरता येईल? संघाच्या विखारी हिंदुत्वाची मूकपणे का होईना भाजपा पाठराखण करीत असेल तर या पक्षासमोर आव्हानांची मालिका उभी ठाकणार आहे. आपल्या पक्षातील बहुजन नेत्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम कसे राहील आणि त्यांना संघाच्या ‘असहिष्णू’ सावलीपासून दोन हात लांब कसे ठेवता येईल, याकडे भाजपा नेत्यांना लक्ष द्यावे लागेल. अन्यथा पराभवाचे धक्क्यांवर धक्के बसत राहतील. बिहार निवडणुकीचा हाच अन्वयार्थ आहे.

 

Web Title: The Sangh's 'intolerant' shadow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.