विठोबाच्या जिद्दीला सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 03:04 IST2016-07-09T03:04:36+5:302016-07-09T03:04:36+5:30
दुष्काळामुळे बैलजोडी विकावी लागली तरी हिंमत न हारता विठोबा मांडोळे या शेतकऱ्याने लोखंडी खाटेने तीन एकर शेतात सऱ्या पाडून दोन एकरात कापसाची लागवडदेखील केली.

विठोबाच्या जिद्दीला सलाम
- मिलिंद कुलकर्णी
दुष्काळामुळे बैलजोडी विकावी लागली तरी हिंमत न हारता विठोबा मांडोळे या शेतकऱ्याने लोखंडी खाटेने तीन एकर शेतात सऱ्या पाडून दोन एकरात कापसाची लागवडदेखील केली. कुढत न बसता संकटावार मात करण्याची किमया विठोबाने साधली..
दुष्काळाने आर्थिक कणा मोडला असतानाही संकटावर मात करीत उभारी घेणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुकच्या विठोबा मांडोळे याने संकटात असलेल्या बळीराजाला मोठी हिंमत दिली आहे.
दोन वर्षांपासून खान्देशात दुष्काळी स्थिती आहे. हंगाम जेमतेम येतो. पाणी टंचाईने खेड्यातील स्थिती बिकट आहे. त्याचा फटका खडकी बुद्रुकच्या विठोबासह अनेक शेतकऱ्यांना बसला. काहींनी आत्महत्त्येचा मार्ग स्वीकारला. मात्र विठोबासारखे काही शेतकरी संकटावर मात करीत पुन्हा उभे ठाकले आहेत.
विठोबा हा खरा शेतमजूर. कष्टाने मजुरी करताना त्याने स्वत: शेती करण्याचे धाडस केले. सात वर्षांपूर्वी त्याने गावातील शेतकऱ्याचे तीन एकर शेत कसायला घेतले. बायको, दोन मुलांसह विठोबाने केलेल्या कष्टाला फळ येऊ लागले. छोटं घर बांधलं. बैलजोडी घेतली. पण शेती किती बेभरवशाचा व्यवसाय आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले. दोन वर्षांच्या दुष्काळाने विठोबाचे आर्थिक गणित बिघडवून टाकले. गेल्या वर्षी पाणी व चारा टंचाईमुळे त्यांना बैलजोडी विकावी लागली. मोठा मुलगा बांधकामावर सेंट्रींगचे काम करीत असल्याने त्याचा संसाराला हातभार लागतो. दुसरा मुलगा बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला, त्याचं पुढील शिक्षण थांबविण्याचा कटू निर्णय विठोबा आणि त्याच्या कुटुंबियांनी घेतला.
यंदा खरीपाच्या तयारीच्या वेळी शिल्लक पुंजीतून बियाणे घेतले. तरी बैलजोडी, औतासाठी पैशांची व्यवस्था काही होईना. हंगाम तोंडावर आला असल्याने सगळ्यांची लगबग सुरु झाली होती. पैशांची व्यवस्था होण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर विठोबाने लोखंडी खाटेने सऱ्या पाडायला (शेत आखणे) सुरुवात केली. तीन एकर शेतात सऱ्या पाडून दोन एकरात त्याने कापसाची लागवडदेखील केली. उणीवा, अभावामुळे कुढत बसण्यापेक्षा त्याच्यावर मात करण्याची विठोबाने साधलेली किमया कर्णोपकर्णी पंचक्रोशीत पसरली.
विठोबाला अर्थ सहाय्यासाठी समाज पुढे सरसावला. आमदार उन्मेष पाटील यांनी खडकी येथे जाऊन विठोबाच्या जिद्दीला दाद दिली. बियाणे, कीटकनाशके आणि खते उपलब्ध करुन दिली. चाळीसगावच्या डॉ.विनोद कोतकर दाम्पत्याच्या आई फाऊंडेशनने मुलाच्या आयटीआय प्रवेशाची जबाबदारी घेतली. शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आणि विठोबाला मदत करु लागल्या आहेत.
समाजाने विठोबाच्या जिद्दीची संवेदनशीलतेने दखल घेतली. मदतीचा ओघ सुरु झाला. यातून विठोबाने बळीराजाला सकारात्मक संदेश दिला. परिस्थितीपुढे शरण जाण्यापेक्षा तिच्याशी दोन हात करा. क्षमता सिध्द करा म्हणजे समाज स्वत:हून मदतीला पुढे येतो. मदतीसाठी हात पसरण्यापेक्षा सरी ओढण्यासाठी खाट ओढणाऱ्या विठोबाच्या हातांनी संकटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागाने मात्र विठोबाला मदतीचा हात देण्याऐवजी त्याच्या ‘शेतकरी’ असण्यावर प्रश्नचिन्ह लावले. कारण काय तर त्याच्या नावे शेती नाही, सातबारा, खाते उतारा नसल्याने तो शेतकरी नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईला तो पात्र नसल्याचा नियम कृषी विभागाने दाखविला. माणसांसाठी नियम आहे, नियमासाठी माणूस नाही हे विसरले जात असल्याने विठोबाच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार होत असावा.
विठोबाची विलक्षण जिद्द प्रसारमाध्यमांमुळे जगभर पोहोचली. सामाजिक संस्था, कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचले. काहींनी त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी बोलावलं, कुणी सत्कारासाठी बोलावले. तरीही विठोबा शेतीवाडी सोडून कुठेही जायला तयार झाला नाही. घर-शेती सोडून मी कुठे येणार नाही, आता दोघांना माझी गरज आहे, ही त्याची भूमिका खूप काही सांगून जाणारी आहे.