८६२ कोटी रुपये वेतन! - मला नक्को!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 09:03 IST2025-08-06T09:02:40+5:302025-08-06T09:03:39+5:30
अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि येत्या काळात जो या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणार नाही, तो मागे पडणार हे चित्र आज तरी आहे...

८६२ कोटी रुपये वेतन! - मला नक्को!!
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) उद्याचं भविष्य आहे आणि यापुढील बराच काळ ते जगावर राज्य करील, हे अनेकांना माहीत आहे. त्यामुळे प्रत्येक जण, प्रत्येक कंपनी आपलं एआय मॉडेल अधिकाधिक मजबूत करण्यावर भर देत आहे. एआयनं आज जगभरातील सारी समीकरणं बदलून टाकली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि येत्या काळात जो या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणार नाही, तो मागे पडणार हे चित्र आज तरी आहे.
‘एआय’ कंपन्या तरी यात मग मागे कशा राहतील? एआय क्षेत्रातील जगभरातील तज्ज्ञ, इंजिनिअर्सना अपाल्याकडे ओढण्यासाठी सगळ्याच एआय कंपन्यांमध्ये आता तीव्र चुरस निर्माण झाली आहे. मार्क झुकरबर्गच्या ‘मेटा’ कंपनीनं सध्या आपल्या महत्त्वाकांक्षा यासाठी पणाला लावल्या आहेत. या क्षेत्रात जिथे जिथे जे जे कोणी तज्ज्ञ आणि हुशार लोक असतील त्यांच्यासाठी मेटानं आक्रमक भरती अभियान सुरू केलं असून, त्यांच्यासाठी अक्षरश: पायघड्या घालायला सुरुवात केली आहे. आपली सुपरइंटेलिजन्स लॅब अधिकाधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी कोणतेच प्रयत्न बाकी ठेवलेले नाहीत. त्यासाठी तज्ज्ञांना ‘मूंह मांगे दाम’ द्यायला त्यांनी सुरुवात केली आहे.
किती असावं त्यांचं वेतन आणि पॅकेज? एआय इंजिनिअर्स आणि विशेषज्ञ यांच्यासाठी सुरुवातीचं वेतन तर आत्यंतिक आकर्षक असेलच; पण टप्प्याटप्यानं चार वर्षांत ते तब्बल दहा कोटी डॉलर्सपर्यंत (सुमारे ८६२ कोटी रुपये!) जाईल!
कोणालाही वाटेल, इतकं वेतन आणि इतकी आकर्षक ऑफर कोण नाकारणार? पण असेही काही जण आहेत, त्यांनी ही ऑफर नाकारली आहे आणि आपल्या आहे त्या वेतनावर समाधान मानलं आहे.
एआयच्या क्षेत्रातील ॲन्थ्रोपिक ही अशीच एक प्रसिद्ध प्रयोगशाळा. त्याचे सहसंस्थापक आणि सीईओ आहेत डारियो अमोदेई. त्यांनी नुकतंच सांगितलं, आमचे इंजिनिअर्स, संशोधकांना आपल्याकडे ओढण्यासाठी मेटानं अशा अनेक ऑफर्स दिल्या, पण आमच्या टीमनं त्या नाकारल्या आहेत. ॲन्थ्रोपिकचे मुख्य विज्ञान अधिकारी आणि सह-संस्थापक जेरेड कापलान यांनी एका पॉडकास्टमध्ये नुकतंच सांगितलं, खरं म्हटलं तर व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहता दहा कोटी डॉलर्स ही वाटते तितकी मोठी रक्कम नाही. एआय मॉडेल्सचं प्रमाण आणि प्रभाव पाहता, हे आकडे ‘फायद्याचा सौदा’ वाटू शकतात; पण तसं नाहीए. या व्यवसायाचं मूल्य बघता चार वर्षांत दहा कोटी रुपये वेतन म्हणजे प्रत्यक्षात कंपन्यांसाठी फायद्याचा आणि स्वस्त सौदा ठरू शकतो.
परप्लेक्सिटी एआयचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांनीही या दृष्टिकोनाचं समर्थन करताना म्हटलं आहे, जगातल्या प्रतिभावंतांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी केवळ वेतन ही गोष्ट पुरेशी नाही. उद्देश, प्रभाव आणि बौद्धिक आव्हानांकडेही ते अधिक आकर्षित होतात. तुम्ही नवीन आव्हानांना तोंड देत आहात. आपण आपल्या क्षेत्रात प्रगती करीत आहोत, याची जाणीव तुम्हाला होत आहे, त्या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी तुम्ही शिकत आहात आणि त्याच वेळी, तुम्ही श्रीमंतही होत आहात. अशा वेळी फक्त जास्त वेतन मिळतंय म्हणून आपली नोकरी कोण कशाला सोडेल?..