‘सैयारा’- एक अख्खी पिढी इतकी पागल का झाली आहे?

By मेघना ढोके | Updated: July 26, 2025 16:24 IST2025-07-26T08:02:01+5:302025-07-26T16:24:50+5:30

‘सैयारा’ ही ‘जेन झी’ची लव्हस्टोरी आहे. याआधीच्या पिढ्यांनी रक्ताने पत्रं लिहिली, एकमेकांसाठी जीव दिले; आजची जेन झी ‘रील्स’ करत सुटली आहे, एवढंच काय ते!

'Saiyara' - Why has an entire generation gone so crazy? | ‘सैयारा’- एक अख्खी पिढी इतकी पागल का झाली आहे?

‘सैयारा’- एक अख्खी पिढी इतकी पागल का झाली आहे?

मेघना ढोके
संपादक, लोकमत  सखी डॉट कॉम

एरवी मोबाइलच्या स्क्रीनमध्ये खुपसलेली मुंडकी दहा-पंधरा अंशांत वळवायची वेळ आली, तरी वैतागणारी ‘जेन झी’ पिढीतली मुलं-मुली सध्या एका सिनेमाच्या मागे वेड्यासारखी पागल झाली आहेत. थिएटरमध्ये तरुण गर्दी उसळली आहे. एरवी कशाचंच फार काही न वाटणारी ही मुलं सिनेमा पाहताना रील्स तर शूट करतातच; पण महत्त्वाचं म्हणजे ती ओक्साबोक्सी रडतात, हसतात, नाचतात, गातात... आपल्या गर्लफ्रेण्डला उचलून गरगर फिरवतात, कुणी एकेकटेच देवदास झाल्यागत विषण्ण बसूनच राहतात, कुणी थेट बेशुद्धच पडतात!! मास हिस्टेरिया असावा असं हे काहीतरी विचित्र देशभरात घडतं आहे.

आणि भल्याभल्या, जुन्याजाणत्या माणसांना एकच प्रश्न पडलाय- ‘सैयारा’ नावाच्या या सिनेमात एका अख्ख्या पिढीला पागल करून सोडणारं असं आहे तरी काय?  टिनएजर आणि त्याहून थोडे मोठे पंचविशीच्या आतबाहेरचे तरुण मुलं-मुली एरवी हातातला मोब-ाइल बाजूला ठेवून कुटुंबासोबत ‘ओटीटी’वरचा सिनेमा पाहायला हॉलमध्येही येऊन बसायला तयार नसतात ते चक्क तीन तास थिएटरमध्ये जाऊन गर्दी करतात; अशी काय जादू आहे त्या सिनेमात? एरवी दर दोन वर्षांनी नोकऱ्या बदलतात तितक्याच सहजतेने काही महिन्यांनी गर्लफ्रेण्ड, बॉयफ्रेण्ड बदलणाऱ्या, नात्याविषयी बोलताना ‘नो स्ट्रिंज ॲटॅच्ड, सिच्युएशनशिप, बेंचिंग वगैरे शब्द वापरणाऱ्या अत्यंत कॅज्युअल पिढीला पडद्यावरची ‘प्रेमकथा’ पाहून इतकं भरून यावं?  कशासाठी इतकी दिवानगी? प्रेमाबाबतीत- प्रॅक्टिकल असणाऱ्या या मुला-मुलींना ‘लडका-लडकी मिले, प्यार हुआ-फिर बिछडे-फिर मिले’ ही एका ओळीची यशचोप्रा स्कूलची लव्हस्टोरी का आवडली असेल?

तर त्याचं उत्तर हेच की, ही मुलं तरुण आहेत... आणि प्रेमात पडणं, त्यातला थरार, त्यातली बंडखोरी, लपवाछपवीतली गंमत, मित्रांमधली मस्करी आणि प्रेमभंग हा सगळा जुनाच मसाला अत्यंत श्रवणीय झिंग आणणाऱ्या नशिल्या संगीतात बांधून नव्या ‘सैयारा’ने त्यांना भूल घातली आहे.

गेल्या दशकभरात हिंदी चित्रपटांनी प्रेमाकडे तसं घाऊक दुर्लक्षच केलं. हॉलिवूड-केड्रामा-दक्षिणी सिनेमा-ओटीटी यांच्याशी स्पर्धा करणारे ॲक्शनपट शिजवताना ‘लव्हस्टोरी’चा जणू विसरच पडला. ‘सैयारा’चा दिग्दर्शक मोहित सुरीचीच ‘आशिकी टू’ ही लव्हस्टोरी दहा वर्षे म्हातारी झाली, तरी नवं काही येईना.  शेरशाह, रॉकी और रानी की प्रेमकहानीसारखे सिनेमे आले; पण त्यात प्रेमापेक्षा  देशभक्ती-सामाजिक सुधारणा असेच फार होते. आपल्याच वयाचं कुणीतरी प्रेमात पडतं-रडतं-चिडतं-हरतं-जिंकतं ही गोष्ट गेल्या दशकभरात तरुण झालेल्या पिढीने सिनेमाच्या पडद्यावर अनुभवलेलीच नाही. त्याआधीच्या पिढ्यांनी आपल्या तारुण्यात अशा प्रेमकथा पडद्यावर भरपूर पाहिल्या आहेत. त्यातलं रडणं-हसणं-स्टाइल कॉपी करणं असं सगळं केलेलं आहे.

‘बॉबी’ आला वर्ष १९७३ मध्ये. ही प्रेमातली तत्कालीन बंडखोरी. पुढे ‘एक दुजे के लिए’नंतर ‘एकत्र जगता आलं नाही तर एकत्र मरू तरी’ म्हणत आत्महत्या करणारेही कमी नव्हते. ‘बेताब’, ‘कयामत से कयामत तक’, ‘दिल’, ‘मैने प्यार किया’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘हम आप के है कौन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘जब वी मेट..’ नुसती नावं आठवा. १९७० ते २००० या टप्प्यात तरुण झालेल्या प्रत्येक पिढीची आपापल्या काळची एक सिनेमॅटिक लव्हस्टोरी आहे. त्याही काळी कथा म्हणून ते सिनेमे जेमतेमच होते; पण प्रेमातली बंडखोरी, थरार, मनासारखं जगण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी हे सारं सिनेमाच्या पडद्यावर पाहत त्याकाळची तरुण पिढी वेडी झालीच होती.

घरच्यांच्या विरोधाला न जुमानता, जात-धर्म, आर्थिक स्थितीचा विचार न करता पळून जाणं, जंगलात राहणं, गाणी गाणं, आयुष्य उभं करणं ही ‘सैराट’ प्रेमकथा तशी नवीन नाही.

तारुण्यात हा स्वप्नवाद जगण्याची ताकद देतो आणि ऊर्मीही. जगण्याचे चटके देणारी वाट चालून चाळीशी गाठताना भलेही तो सारा स्वप्नाळूपणा फोल किंवा बावळट वाटतही असेल; पण प्रत्येक पिढी ती वाट चालून आलेलीच असते. 

‘सैयारा’ ही ‘जेन झी’ची लव्हस्टोरी आहे. याआधीच्या पिढ्यांनी रक्ताने पत्रं लिहिली, ओल्या वाळूत आपापल्या प्रेमपात्रांची नावं लिहिली, एकत्र जगता येणं शक्य नाही म्हणून एकत्र जीव दिले; आजची जेन झी ‘रील्स’ करीत सुटली आहे, एवढंच काय ते!

Web Title: 'Saiyara' - Why has an entire generation gone so crazy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.