लाखो बाळांना पुनर्जन्म देणारा अवलिया !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 09:10 IST2025-03-05T09:10:11+5:302025-03-05T09:10:29+5:30
ऑस्ट्रेलियाच्या जेम्स हॅरिसन यांनी आपल्या आयुष्यात ११७३ वेळा रक्तदान करून तब्बल २४ लाख मुलांचे प्राण वाचवले !

लाखो बाळांना पुनर्जन्म देणारा अवलिया !
एखाद्या माणसानं आपल्या आयुष्यात किती लोकांचे, त्यातही मुलांचे प्राण वाचवावेत? - एक, दोन, तीन, पाच, दहा, शंभर?... पण ऑस्ट्रेलियाच्या एका व्यक्तीनं आपलं संपूर्ण आयुष्यच लोकांना जीवदान देण्यासाठी वापरलं आणि लाखो मुलांचे प्राण वाचवले. या अवलियाचं नाव आहे जेम्स हॅरिसन. ‘द मॅन विथ द गोल्डन आर्म’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जेम्स हॅरिसन यांनी आपल्या आयुष्यात ११७३ वेळा रक्तदान करून तब्बल २४ लाख मुलांचे प्राण वाचवले !
न्यू साउथ वेल्समधील एका नर्सिंग होममध्ये त्यांनी नुकताच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अख्ख्या जगानं शोक व्यक्त केला आहे. रक्तदान हे मुळातच सर्वश्रेष्ठ दान म्हणून ओळखलं जातं, पण जेव्हा जेम्स यांना कळलं, आपल्या रक्तदानामुळे गर्भातल्या आणि नुकत्याच जन्माला आलेल्या लाखो बाळांना आयुष्य बहाल होणार आहे, त्यावेळी रक्तदान हेच त्यांचं आयुष्यभराचं ध्येय झालं. ८८ व्या वर्षी त्यांचं निधन झालं, पण वयाच्या १८ व्या वर्षांपासून ते ८१ वर्षांपर्यंत ते अखंड रक्तदान करीत राहिले. तेही साधारण पंधरा दिवसांतून एकदा या प्रमाणात.
जेम्स फक्त १४ वर्षांचे होते, त्याचवेळी त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. १३ बाटल्या रक्त त्यांना चढवावं लागलं होतं. त्यावेळी त्यांना ज्यांनी रक्तदान केलं होतं, त्यामुळेच त्यांना नवं आयुष्य मिळालं होतं. त्याबद्दल त्यांना अतीव कृतज्ञता होती. त्याच वेळेस त्यांनी ठरवलं, आपणही रक्तदान करून इतरांचं आयुष्य वाढवायचं. जेम्स यांच्या रक्तात एक दुर्मिळ प्रकारची अँटीबॉडी होती, जी ‘ॲण्टी डी’ म्हणून ओळखली जात होती.
जेम्सच्या रक्तातील अँटीबॉडी गर्भवती महिलांसाठी औषध तयार करण्यासाठी वापरली जात होती. ‘ॲण्टी डी’ लस गर्भवती महिलांना आणि नवजात शिशूंना हेमोलिटिक रोगापासून (HDFN) बचाव करण्यासाठी वापरली जाते. जेम्स यांच्या रक्तात अत्यंत दुर्मीळ असलेल्या या ॲण्टीबॉडीज का, कशा तयार झाल्या यामागचं रहस्य वैज्ञानिक आजतागायत शोधू शकलेले नाहीत. जेम्स यांना जगातील सर्वांत मोठा रक्त आणि प्लाझ्मा दानकर्ता म्हणूनही ओळखलं जातं, कारण त्यांच्या प्लाझ्माच्या माध्यमातूनच लाखो मुलांना नवं आयुष्य मिळालं. नाहीतर या लाखो मुलांचं आयुष्य गर्भातच किंवा जन्मत:च खुडलं गेलं असतं. म्हणूनच लोकांनी त्यांना ‘सोन्याच्या हातांचा माणूस’ अशी पदवीही बहाल केली होती. या अँटीबॉडीचा वापर रीसस नावाच्या आजारामुळे गर्भवती महिलांमध्ये होणाऱ्या समस्यांवर उपचार म्हणून केला जात होता.
जेव्हा ‘आरएच निगेटिव्ह’ रक्तगटाच्या गर्भवती महिलेला ‘आरएच पॉझिटिव्ह’ रक्तगटाचे बाळ जन्माला येण्याची शक्यता असते, तेव्हा त्या महिलेचं शरीर बाळाच्या लाल रक्तपेशींना धोक्याच्या रूपात पाहतं आणि या धोक्याचा सामना करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतं. यामुळे गर्भपात, मूल जन्मत:च मृत जन्माला येणं, ब्रेन डॅमेज किंवा ॲनिमियासह मूल जन्माला येऊ शकतं. जेम्स यांच्या ॲण्टीबॉडीजमुळे लाखो बाळांना तर पुनर्जन्म मिळालाच, पण लाखो महिलांना मातृत्वही मिळालं. जेम्स यांनी ८१ व्या वर्षी जेव्हा अखेरचं रक्तदान केलं, त्यावेळी अनेक महिला आपापल्या बाळांसह साश्रूनयनांनी त्यांना अभिवादन करीत होत्या..