सर्वसामान्यांच्या आयुष्यात क्रांती घडवणारे सद्गुरू श्री वामनराव पै !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 11:58 AM2023-10-21T11:58:03+5:302023-10-21T11:58:17+5:30

थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू श्री वामनराव पै यांनी समाजात  वैचारिक क्रांती घडवून आणली. त्यांची आज जन्मशताब्दी. त्यानिमित्त विशेष लेख..

Sadguru Sri Vamanrao Pai who revolutionized the lives of common people! | सर्वसामान्यांच्या आयुष्यात क्रांती घडवणारे सद्गुरू श्री वामनराव पै !

सर्वसामान्यांच्या आयुष्यात क्रांती घडवणारे सद्गुरू श्री वामनराव पै !

आत्मसाक्षात्कारी संत असूनही श्री वामनराव पै हे आयुष्यभर सर्वसामान्यांप्रमाणे वावरले. मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी या पदावर त्यांनी सरकारी नोकरी केली. नोकरी करत असतानाच त्यांना समाजातले अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद, दैववाद, भ्रष्टाचार, दुराचार, व्यसनाधीनता पाहून वाईट वाटू लागलं. ‘बुडती हे जन न देखवे डोळा म्हणोनि कळवळा येत असे’ अशी अवस्था फक्त संतांच्याच ठायी होते. 

वामनराव पै यांनादेखील लोकांसाठी काही तरी शाश्वत असे कार्य करायचे होते. म्हणूनच अज्ञानाच्या आहारी गेलेल्या समाजामध्ये वैचारिक क्रांती घडवून आणण्यासाठी त्यांनी जीवनविद्या तत्त्वज्ञानाची निर्मिती केली. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा विचार जनमानसात रुजवला. 

त्यांनी सांगितलेले विचार आचरणात आणल्याने आजवर अनेक विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण घेत स्वतःचा उत्कर्ष साधला आहे, अनेकांची व्यसने सुटली आहेत, अनेकांच्या अंधश्रद्धा गळून पडल्या आहेत, घरात महिलांना आदराची आणि सन्मानाची वागणूक मिळू लागली आहे, अनेकांचे मोडलेले संसार सावरले गेले आहेत. जीवनविद्या तत्त्वज्ञानाच्या सावलीत आलेल्या प्रत्येकाला आजवर जणू सुखी जीवन जगण्याचा राजमार्गच सापडला आहे. या सुखी आणि समाधानी झालेल्या लोकांनीच मग कृतज्ञतेने वामनराव पै यांना ‘सद्गुरू’ असं म्हणण्यास सुरुवात केली. ज्यामुळे पुढे वामनराव पै हे ‘सर्वसामान्य जनतेचे सर्वमान्य सद्गुरू’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून त्यांनी जगभरात हजारो प्रवचने केली; मात्र त्यासाठी कोणाकडून कधीही बिदागी घेतली नाही. जीवनविद्या तत्त्वज्ञानावर आधारित २७ ग्रंथांचे लेखन केले, मात्र त्यासाठी कधीही रॉयल्टी घेतली नाही. लाखो लोकांना अनुग्रह दिला, मात्र त्यांच्याकडून कोणतीही गुरुदक्षिणा स्वीकारली नाही. संसार आणि परमार्थाची सुरेख सांगड घालत असं निरपेक्ष कार्य अखंड करणारे सद्गुरू वामनराव पै हे या जगातील एकमेवाद्वितीय सद्गुरू होते म्हटलं तरी वावगं ठरू नये. 

श्रीसद्गुरुंनी एप्रिल २०१२मध्ये कर्जत येथे जीवनविद्या ज्ञानपीठाची निर्मिती केली. आज या ज्ञानपीठात विविध कोर्सेसच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन केले जाते. या  वास्तूला सर्वोत्कृष्ट आर्किटेक्ट स्ट्रक्चरचा बहुमानदेखील  मिळाला आहे. दि. २९ मे २०१२ रोजी श्रीसद्गुरुंचे महानिर्वाण झाले. श्रीसदगुरुंच्या महानिर्वाणानंतर त्यांच्याच मार्गदर्शनानुसार, संस्थेच्या विश्वस्तांच्या सहकार्याने व लाखो नामधारकांच्या आग्रहात्सव सद्गुरूंचे चिंरजीव, जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी जीवनविद्या मिशनचं नेतृत्व स्वीकारलं. आज प्रल्हाद पै यांच्या नेतृत्वाखाली जीवनविद्या मिशनच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार अधिक वेगाने होत आहे.
श्री प्रल्हाद पै हे उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांनी मुंबईतील नामांकित शिक्षण संस्था आयआयटी पवईमधून बी.टेक केलेलं आहे, जमनालाल बजाज या शिक्षणसंस्थेतून मास्टर्स इन मॅनेजमेंट केलेलं आहे, जपानमधून “टोटल क्वॉलिटी मॅनेजमेंट”चं शिक्षण घेतलेलं आहे.  प्रल्हाद पै यांच्या नेतृत्वाखाली जीवनविद्या मिशन, जीवनविद्या फाउंडेशन आणि जीवनविद्या सेंटर ऑफ अमेरिका या तीन संस्थाच्या माध्यमातून आज या कार्याचा प्रचार-प्रसार सुरू आहे. 

सद्गुरूंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त घरोघरी विश्वप्रार्थना या उपक्रमाद्वारे ५००,००० कुटुंबापर्यंत हे तत्त्वज्ञान पोहोचविण्याचा संकल्प प्रल्हाद पैंच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने केला आहे. तसेच आपल्या प्रत्येक उपक्रमाद्वारे प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची हा संस्कारही लोकांच्या मनावर बिंबवत जनमानसामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचा संस्थेचा मानस आहे. या दोन व्यापक संकल्पाद्वारे वैचारिक क्रांती घडवत, विश्वशांतीचे वैश्विक ध्येय गाठण्याचा प्रयत्न करीत आपल्या श्रीसद्गुरूंना खऱ्या अर्थाने ‘गुरुदक्षिणा’ यंदा जीवनविद्येची शिष्यमंडळी देणार आहेत.    

Web Title: Sadguru Sri Vamanrao Pai who revolutionized the lives of common people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.