इंडियन प्रीमियर लीगच्या समालोचकांच्या ताफ्यातून ऐनवेळी हर्षा भोगले यांना वगळण्यात आल्याचे खुद्द त्यांनीच सोशल नेटवर्कवरून जाहीर केल्यानंतर त्याचा बोभाटा झाला. हा निर्णय म्हणे ‘बीसीसीआय’चा असून काही खेळाडूंनी तक्रार केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात येते. वादाला तोंड फुटले ते अमिताभ बच्चन यांच्या टिष्ट्वटने. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात समालोचक भारतीय खेळाडूंपेक्षा विरोधी संघातील खेळाडूंचे कौतुक करतात असे टिष्ट्वट त्यांनी केले व ते अनेकांनी उचलून धरले. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने रिटिष्ट्वट करीत मी अजून काय बोलणार, अशी फोडणी त्यात टाकली. बच्चन यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी हर्षा भोगले यांनी मात्र त्याला आपल्या फेसबुक वॉलवरून सविस्तर उत्तर दिले. त्यांच्या मते, समालोचकाने ‘न्यूट्रल’ राहायला हवं. सोशल नेटवर्कवरून सुरू झालेला हा विषय पुढे इतका सोशल होईल अशी त्यावेळी कोणालाच कल्पना नव्हती. विश्वचषक संपला आणि आयपीएलचे चौघडे वाजू लागले आणि अचानक भोगले यांना डच्चू मिळाला. त्याचे नक्की कारण त्यांना देण्यात आले नसले तरी बच्चन यांच्याबरोबर झालेला वाद, खेळाडूंनी केलेली तक्रार की, विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याबरोबर झालेला वाद याच्या मुळाशी आहे, त्याबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत. एकेकाळी रिची बेनॉ, जेफरी बॉयकॉट, टोनी ग्रेग यांची मक्तेदारी असणारे हे क्षेत्र सुनील गावसकर, संजय मांजरेकर, रवी शास्त्री यांच्याबरोबरीने हर्षा भोगले या मराठी माणसांनी बघताबघता पादाक्रांत केले. यापैकी भोगले वगळता इतर सगळे अनेक क्रिकेटवीर असले तरी क्रिकेटचे बारकावे आणि तंत्र यांचे अचूक वर्णन आपल्या लाघवी आणि रसाळ वाणीने करणारे भोगले या सर्वांहून सरस वाटतात. भारतीय संघाचे निर्देशक म्हणून जबाबदारी सांभाळणारे रवी शास्त्री ‘आयपीएल’मध्ये पुन्हा एकदा ‘आॅन एअर’ आल्याने प्रेक्षकांना आनंद झाला होता. (शास्त्री यांच्याबद्दल अशी एक धारणा आहे की, भारताचा अटीतटीचा सामना सुरू असेल आणि रवी शास्त्री माईकवर असेल तर तो सामना भारत नक्कीच जिंकतो). एकीकडे शास्त्रींचे पुनरागमन पण भोगले समालोचक नाहीत हे कटू सत्य प्रेक्षकांना पचवण्यास जड जाते आहे. कारण काही असो; पण हर्षा भोगले यांनी पुन्हा माईकवर यावे असे सर्वसामान्य प्रेक्षकाला वाटतंय, म्हणून तर त्यांच्या समर्थनार्थ टिष्ट्वटरवर ‘ब्रिंग बॅक हर्षा’ अशी मोहीम सुरू झाली असून तिला प्रचंड प्रतिसादही लाभतो आहे. स्वत: हर्षा यांनीही पुन्हा या खेळाचा एक भाग होण्यास आवडेल असे म्हटले आहे. तो दिवस लवकरच यावा...
‘हर्षा’ची दु:खी कथा
By admin | Updated: April 15, 2016 04:43 IST