हेच ते ‘सॅबोच्युअर्स’?
By Admin | Updated: December 17, 2015 02:52 IST2015-12-17T02:52:41+5:302015-12-17T02:52:41+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांची भेट घेऊन आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत

हेच ते ‘सॅबोच्युअर्स’?
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांची भेट घेऊन आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत हिन्दीतून निवेदन करताना ‘सॅबोच्युअर’ याच शब्दाचा वापर केला. बहुधा हिन्दी भाषेत त्यांना या कुविशेषणाचा प्रतिशब्द सापडला नसावा. अर्थात मराठीतही तसा तंतोतंत शब्द नाही. पौराणिक काळात ऋषीमुनींच्या यज्ञात हाडके टाकण्याचा उद्योग काही राक्षस करीत असत असे सांगतात. हे राक्षस म्हणजेच सॅबोच्युअर्स असे म्हणता येईल. तूर्तास त्यांना घातपाती लोक असे म्हणता येईल. सुषमा स्वराज यांनी अशा घातपात्यांकडे स्पष्ट निर्देश केला नसला तरी इशारा बहुधा हुरियतच्या नेत्यांकडे असावा. कारण स्वराज पाकिस्तानातून परतत नाहीत तोच या नेत्यांनी पाकिस्तानचे भारतातील राजदूत अब्दुल बासीत यांची भेट घेतली (त्यांनीही ती दिली) व भारत-पाक दरम्यान होणाऱ्या चर्चेच्या वेळी पाकिस्तानने कोणती भूमिका घ्यावी याचे मार्गदर्शनही केले. काश्मीर हा विवाद्य मुद्दा असल्याचे आणि काश्मिरातून तत्काळ सैन्य मागे घेण्याचे भारत मान्य करीत नाही तोवर चर्चा होऊ शकत नाही ही भूमिका पाकिस्तानने घ्यावी असे जहालपंथी आणि पाकधार्जिणे हुरियत नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी बासीत यांना सांगितले. त्यांच्या या भेटीवर काँग्रेस पक्षाने सडकून टीकादेखील केली आहे. अर्थात गिलानी आणि बासीत यांच्यातील चर्चेला एक वेगळी पार्श्वभूमीदेखील आहे. भारताचे पाकमधील राजदूत टी.सी.ए.राघवन यांनी याच सप्ताहात पाकिस्तानमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना, उभय देशांदरम्यानच्या चर्चेत काश्मिरचा मुद्दा नक्की असेल आणि असलाच पाहिजे पण काश्मीर कोणते तर आज पाकिस्तानने ज्याला वेढून ठेवले आहे, ते! त्यांच्या या स्पष्ट विधानामुळे हुरियत नेते पिसाळले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान चीनच्या दौऱ्यावर असलेल्या नवाज शरीफ यांनी अलीकडच्या काळात ते स्वत: आणि मोदी व स्वराज यांच्या दरम्यान जी चर्चा झाली ती अत्यंत सकारात्मक असल्याचे चिनी नेत्यांना आवर्जून सांगितले. पण एकीकडे असे प्रमाणपत्र द्यायचे आणि दुसरीकडे हुरियतच्या नेत्यांना गोंजारत राहायचे हा पाकिस्तानचा नेहमीचाच उद्योग राहिला आहे. तशातच भारताने मात्र प्रथमपासून आपली भूमिका स्वच्छ ठेवली आहे आणि ती म्हणजे चर्चा केवळ द्विपक्षीयच राहील तिच्यात तिसऱ्या पक्षाला म्हणजे हुरियतला कोणतेही स्थान राहणार नाही. हे सारे पाहिल्यानंतर सुषमा स्वराज यांना आलेला अनुभव व त्याआधारे त्यांनी व्यक्त केलेला आशावाद गाळूनच घेतलेला बरा.