दैवतांची पळवापळवी
By Admin | Updated: November 4, 2014 02:00 IST2014-11-04T02:00:11+5:302014-11-04T02:00:11+5:30
पाश्चात्त्य मीडियात या पक्षाला हिंदूंचे हक्क मिळवून देणारा पक्ष म्हणून ओळखले आहे. पण, काँग्रेसवर या तऱ्हेचा ठप्पा नसल्याने हा पक्ष स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षे राज्य करू शकला.

दैवतांची पळवापळवी
हरीश गुप्ता
लोकमत पत्रसमूहाचे नॅशनल एडिटर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अनेक कामे आहेत. ते करू इच्छितात. पण त्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भाजपाला भारतासारखेच विविधांगी बनवायचे! आपली ही भूमिका त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली आहे. भाजपाने मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणीचे काम हाती घेतले आहे. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना हा संदेश दिला. आतापर्यंत भाजपा हा एकांगी पक्ष होता. त्याला आता विविधांगी करण्याची त्यांची इच्छा आहे. हा पक्ष महाराष्ट्रामध्ये भटासेठजींचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पाश्चात्त्य मीडियात या पक्षाला हिंदूंचे हक्क मिळवून देणारा पक्ष म्हणून ओळखले आहे. पण, काँग्रेसवर या तऱ्हेचा ठप्पा नसल्याने हा पक्ष स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षे राज्य करू शकला. एका पिढीसाठी हा पक्ष म्हणजे स्वातंत्र्यासाठी लढा देणारा पक्ष अशी ओळख होती. त्यानंतरच्या पिढीसाठी प्रशासन चालवणारा पक्ष ही त्या पक्षाची ओळख झाली. मोदींनी सत्तेवर आल्यापासून काँग्रेसच्या जागी भाजपाला बसवण्याचा प्रयत्न चालवला आहे. केवळ सत्ताधारी पक्ष म्हणून नव्हे, तर भारताची विविधता स्वीकारणारा पक्ष अशी भाजपाची ओळख ते करून देत आहेत. पक्षाच्या स्वरूपात या तऱ्हेचा बदल करीत असताना ते पक्षासाठी आदर्श पुरुषही शोधत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांवर आपला हक्क दाखवला होता. जणू काही छत्रपतींचे आपण वारसदार आहोत, अशी त्या पक्षाची भूमिका होती. बाळासाहेब ठाकरेंचा हा काल्पनिक वारसा हिसकावून घेण्याचे आणि त्यांचा किल्ला उद्ध्वस्त करण्याचे मोदींनी ठरवले. त्याची अभिव्यक्ती वानखेडे स्टेडियमवरील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथग्रहण समारंभात पाहायला मिळाली. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांच्या आठवणी पडद्यावर दाखवण्यात येत होत्या. शिवराज्याभिषेकाचे चित्र भव्य पडद्यावर झळकत होते. नवे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी एखाद्या छत्रपतीने रथात बसावे त्याप्रमाणे संपूर्ण स्टेडियमवर मिरवणुकीने फिरले. शपथग्रहणापूर्वीपासून आणि अजूनही भाजपा-शिवसेना यांचे संबंध तणावपूर्ण आहेत. शिवसेनेशिवाय भाजपाला सत्तेसाठी २२ जागा कमी पडल्या. अशा स्थितीत सरकारमध्ये शिवसेनेला सामावून घेण्याची कोणत्याही तऱ्हेची घाई त्या पक्षाने दाखवली नाही. आपल्या भांडखोर सहकाऱ्यासोबत सत्तेत बसण्याची तयारी मोदींच्या नेतृत्वातील भाजपाने दाखवली नाही. शिवाजी महाराजांची परंपरा हिसकावून घेण्यामागे त्यांचा निश्चित हेतू होता. उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिवाजी महाराजांवर हक्क सांगत असते. पण ते राष्ट्रीय नेते आहेत, असे सांगून मोदी त्यांचा हक्क डावलून लावत आहेत. शपथविधीनंतर मोदींची ब्रिगेड बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धासुमने अर्पण करण्यासाठी शिवतीर्थावर पोचली. त्यामुळे मराठी माणसाचे आपणही कैवारी आहोत, हे भाजपाने दाखवून दिले. शिवसेना फडणवीस यांच्या सरकारमध्ये केव्हा आणि कोणत्या अटीवर सामील होणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण भगव्याचे एकमेव ठेकेदार हा शिवसेनेचा दावा आता संपुष्टात आला आहे. राज्याचे भविष्य काय राहील, हे यापुढे भाजपा ठरवणार आहे. अशातऱ्हेने मोदी आणि त्यांची टीम भारताचे विविधांगी स्वरूप आत्मसात करण्याच्या प्रयत्नात आहेत.
इतर पक्षांची दैवते पळवून नेणे एवढ्यापुरते हे मर्यादित नाही. इंदिरा गांधींच्या बलिदानाला ३० वर्षे पूर्ण होत असताना ३१ आॅक्टोबर हा दिवस त्यांच्या स्मृतीने साजरा करण्याऐवजी वल्लभभाई पटेल यांच्या त्याच दिवशी येणाऱ्या जयंतीने साजरा करण्याचे ठरवून भाजपाने त्या दिवसाला वेगळी कलाटणी दिली. हा दिवस यापूर्वी काँग्रेसने इंदिरा गांधींच्या स्मरणासाठी वर्षानुवर्षे वापरला. पण पटेलांची आठवण मात्र मूठभर लोकच ठेवत होते. गेल्या आठवड्यात मोदींनी इंदिरा गांधींचा स्मृतिदिन दुर्लक्षित करून जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या समर्थकांना धक्का दिला. मोदींनी आपल्या भाषणात त्या दिवशी मोठ्या प्रमाणात शिखांची कत्तल झाली, अशा तऱ्हेने उल्लेख केला. (इंदिरा गांधींची हत्या त्यांच्या शीख अंगरक्षकाने केली होती.) यापूर्वीच्या अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह प्रत्येक पंतप्रधानांनी इंदिरा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली होती. तसेच त्या दिवशी त्यानंतर झालेल्या शिखांच्या हत्येचा उल्लेख करण्याचे टाळले होते.
सरदार पटेल हे अनेक कारणांसाठी पंडित नेहरूंना खुपत होते. त्याची नोंद इतिहासाच्या पानोपानी आढळते. त्यामुळे नेहरू-गांधींचे समर्थक आजवर पटेलांबद्दल उदासीन राहिले. पटेल १९५० साली मरण पावले. त्यांनी ५०० हून अधिक संस्थानांचे भारतात विलीनीकरण करण्याची भूमिका पार पाडली. त्यामुळे लोहपुरुष अशी त्यांची ओळख झाली होती. तरीही त्यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी १९९१ साल उजाडावे लागले. त्या वेळी काँग्रेसचे पी. व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान होते. पटेलांच्या मृत्यूनंतर काही काँग्रेस नेत्यांनी त्यांचा पुतळा दिल्लीत उभारण्याची नेहरूंना विनंती केली. पण त्यासाठी सरकारी निधी देण्याचे नेहरूंनी नाकारले. त्यानंतर जनसंघाचे खासदार स्वर्गीय कंवरलाल गुप्ता यांनी सार्वजनिक निधी उभारून त्यांचा पुतळा दिल्लीत बसवला. अर्थात, त्या मागे जनसंघाची कोणतीही भूमिका नव्हती, तर एका एनजीओच्या पुढाकाराने ते काम झाले होते.
मोदींनी हा दिवस फक्त आणि फक्त पटेलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वापरला. त्या दिवशी संपूर्ण देशभर ‘रन फॉर युनिटी’ हा कार्यक्रम राबवण्यात आला.
पटेल हे काँग्रेसी होते, असे काँग्रेसने सांगण्याचा प्रयत्न केला. पण, मीडियाने मात्र पटेलांकडे काँग्रेसने कसे दुर्लक्ष केले, हेच दाखवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने नेहमी नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तिघांच्याच प्रतिमा जपल्या. त्यामुळे त्यांनी पटेलांवर दावा सांगणे हास्यास्पद ठरेल. महाराष्ट्रात ज्या प्रमाणे शिवाजी महाराज, त्या प्रमाणे संपूर्ण देशात पटेल हेच भाजपाचे आयकॉन आहेत, असे दाखवण्यात आले. पहिल्यावर दावा सांगणे शिवसेनेवर उलटणार आहे, तर दुसऱ्यावर दावा सांगणे काँग्रेसला महागात पडणार आहे. मोदी जेव्हा एखाद्यावर हल्ला करतात तेव्हा शत्रूचे दैवत, त्याचा रंग आणि त्यांचे प्रतीक हिसकावून घेतात. अशा तऱ्हेने इतिहासच हिसकावून घेतल्यावर त्यांचे विरोधक निष्प्रभ होतात. सध्या तेच घडताना दिसत आहे.