वेदना क्षेत्रात एक क्रांतिकारक संशोधन; मिरची तिखट का लागते? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 06:47 AM2021-10-07T06:47:05+5:302021-10-07T06:47:26+5:30

मिरचीपूड त्वचेला लागल्यावर दाह का होतो याचा शोध घेणारे डॉ. डेव्हिड जुलियस आणि डॉ. अर्डेम पेटापोशियम यांनी वेदनाशमन तंत्रात पुढचे पाऊल टाकले आहे!

A revolutionary research in the field of pain; Why do you need chili powder? | वेदना क्षेत्रात एक क्रांतिकारक संशोधन; मिरची तिखट का लागते? 

वेदना क्षेत्रात एक क्रांतिकारक संशोधन; मिरची तिखट का लागते? 

googlenewsNext

मानवी जगण्यासाठी चव, गंध, उष्ण आणि थंड पदार्थाला प्रतिसाद देण्याची क्षमता फारच महत्त्वाची असते. कोविड झालेल्या कोट्यवधी लोकांची चव आणि वास घेण्याची क्षमता काही काळ नाहीशी झाली होती. अचानक असे का होते, मिरची तिखट का लागते किंवा मिरचीपूड त्वचेला लागल्यावर दाह का होतो, या सगळ्या कारणांचा शोध घेणारे अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड जुलियस आणि डॉ. अर्डेम पेटापोशियम या दोघांना या वर्षीचे आरोग्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. डॉ. जुलियस हे कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक, तर डॉ. पेटापोशियम हे स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रज्ञ आहेत. 

उष्णता, थंडपणा आणि स्पर्श जाणण्याची आपली क्षमता ही आपल्याला आपल्या सभोवतालच्या जगाशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे. आपल्याला शरीराला तापमान, इतर सजीव आणि निर्जीव वस्तूंचा स्पर्श कसा समजतो हे प्रश्न अनेक वर्षं अनुत्तरित होते. खरे तर सर्वच सजीवांसाठी ही निसर्गाची रहस्येच होती. या शास्त्रज्ञांनी पदार्थाच्या आणि शरीरातील आण्विक पातळीवर जाऊन संशोधन करून ही नैसर्गिक रहस्ये उलगडली. यासाठी त्यांनी मिरचीचा उपयोग केला. तिखट मिरचीमध्ये असणारे कॅप्सॅसीन नावाचे रसायन हे शरीरात गेल्यावर किंवा त्वचेवर लागल्यावर शरीरातील मज्जातंतूना उत्तेजित करते आणि त्यातूनच संवेदना किंवा वेदना ओळखणारी शरीरातील आण्विक यंत्रणा कार्यान्वित होते. डॉ. डेव्हिड ज्युलियसला वाटले की, हे कसे घडते यासाठी जर शरीरातील मज्जातंतूना उत्तेजित करणारी आण्विक यंत्रणा खरोखर समजली, तर यामुळे फार मोठी प्रगती होऊ शकते. हा अभ्यास करताना या दोघांना असे दिसून आले की, संवेदना निर्माण करणारी शरीरातील यंत्रणा अशा प्रकारच्या सिग्नलचे रूपांतर विद्युतीय लहरीत करते आणि त्या लहरी क्षणातच आपल्या शरीरात सर्वदूर पसरतात. त्यामुळेच आपले शरीर अशा संवेदनांना लगेच प्रतिसाद देते.

आपल्या शरीराला एखाद्या बाह्य पदार्थाचा किंवा सजीवांचा स्पर्श झाल्यास यांत्रिक वेदना, श्वासोच्छ‌्‌वासात बदल, लघवी होण्याची क्रिया, रक्तदाब कमीजास्त होणे अशा प्रकारच्या क्रिया घडून येतात, तर उष्णता निर्माण करणाऱ्या क्रियांमध्ये आपल्या शरीरामध्ये ताप येणे, दाहक वेदना, स्नायूंच्या वेदना अशा क्रिया घडतात. या सर्व क्रियांचा परस्पर संबंध या शास्त्रज्ञांनी शोधला.  डॉ. जुलियस आणि त्यांच्या टीमने संवेदनात्मक न्यूरॉन्समध्ये (मज्जातंतू)  जीन्सशी संबंधित लाखो डीएनए तुकड्यांची लायब्ररी तयार केली जी, वेदना, उष्णता आणि स्पर्शाला प्रतिक्रिया देऊ शकते. त्यानंतर त्यांनी या संग्रहातील जनुकांना पेशींमध्ये जोडले जे सामान्यतः कॅप्सॅसीनवर प्रतिक्रिया देत नाहीत. ज्यामुळे एकच जनुक संवेदनशीलतेला कारणीभूत ठरते असे या अभ्यासातून दिसून आले. या शास्त्रज्ञांच्या टीमला नंतर कळले की, त्यांनी आधी शोधलेला हा कॅप्सॅसीन रिसेप्टरदेखील उष्णता जाणणारा रिसेप्टर आहे, जो तापमानात सक्रिय असतो, ज्याला वेदनासुद्धा समजते. हे संशोधन वेदना क्षेत्रात एक क्रांतिकारक संशोधन ठरले आहे.

आजपर्यंत शास्त्रज्ञांना वेदनांचे रासायनिक रिसेप्टर अस्तित्वात आहेत हे माहीत होते; परंतु त्यामागची आण्विक क्रिया आणि यंत्रणा याबद्दल मात्र काही माहिती नव्हती. जेव्हा आपण तिखट आणि मसालेदार अन्न खातो तेव्हा आपल्याला मिळणारी संवेदना ही खूप परिचित गोष्ट. असे अन्न आपण जेव्हा खातो तेव्हा अनेक लोकांनी त्यामधील दाहकता आणि उष्णता अनुभवली आहे. अशा प्रकारचे तिखट आणि मसालेदार अन्न हे  बऱ्याच लोकांसाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.  अशा प्रकारच्या सांस्कृतिक गोष्टीला विज्ञानाची जोड देऊन या शास्त्रज्ञांनी एक रोमांचक कोडे सोडवले आहे. या त्यांच्या संशोधनामुळे औषध निर्माण क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. अनेक प्रकारच्या आजारांवरती वेदनाशामक (पेन किलर) औषधे तयार करण्यासाठी या संशोधनाची मोठी मदत होईल. याचबरोबर या संशोधनामुळे दीर्घकालीन वेदना निर्माण करणारे आजार आणि इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी उपचारांच्या नव्या पद्धती तयार करायलाही डॉक्टरांना मदत होईल.

डॉ. नानासाहेब थोरात

मेडिकल सायन्स डिव्हिजन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड

Web Title: A revolutionary research in the field of pain; Why do you need chili powder?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.