बालहक्क रक्षणाचा संकल्प करू या..!
By Admin | Updated: January 1, 2015 02:53 IST2015-01-01T02:53:00+5:302015-01-01T02:53:00+5:30
२०१४चे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी ३५ वर्षांपूर्वी ‘बचपन बचाओ’ आंदोलनाची सुरुवात केली. बालमजुरीला मूठमाती देण्याच्या कार्यासाठी त्यांनी जीवन वेचले.

बालहक्क रक्षणाचा संकल्प करू या..!
२०१४चे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी ३५ वर्षांपूर्वी ‘बचपन बचाओ’ आंदोलनाची सुरुवात केली. बालमजुरीला मूठमाती देण्याच्या कार्यासाठी त्यांनी जीवन वेचले. या कार्यात त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. तसेच त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांचे साहाय्यही मिळाले. सत्यार्थी सध्या १४४ देशांत काम करणाऱ्या ‘ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर’ या संस्थेचे सहसंस्थापक आहेत.
बालमजुरी ही देशातील फार मोठी समस्या आहे. तिचे निवारण करण्यासाठी आपण सर्वांनी संघटित व्हावे. नव्या वर्षात बालहक्कांच्या संरक्षणाचा संकल्प करावा. मी स्वत: तर बालमजुरी पूर्णत: इतिहासजमा केल्याविना मुळीच उसंत न घेण्याचा दृढनिश्चय केला आहे.
बालमजुरी हा देशाला काळिमा आहे आणि तो नष्ट करण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे अनेकांचे बालपण कुस्करले जात आहे. लहान मुलांचे शोषण हेच देशातील गरिबीचे मुख्य कारण आहे आणि दर्जेदार शिक्षणानेच त्यावर मात करता येऊ शकते. बालमजुरी सुधारणा विधेयक २०१२, संसदेत दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. या विलंबामुळे देशातील लक्षवधी मुलांचे बाल्य नैराश्याच्या दिशेने जात आहे. हे विधेयक पारित झाल्यानंतर १४ वर्षे वयापर्यंतच्या कोणत्याही मुलाकडून कोणत्याही प्रकारची मजुरी करून घेणे आणि १८ वर्षांपर्यंतच्या मुलांकडून धोकादायक कामे करवून घेणे बेकायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे हे सुधारणा विधेयक बालमजुरीचे समूळ उच्चाटन करण्यास विशेष साहाय्यकारी ठरणारे आहे. जगभरातील सुमारे ७० देशांनी बालमजुरीविरोधातील आंतरराष्ट्रीय कायद्यांना संमती दिली आहे. ते याला कॉर्पोरेट - सामाजिक भागीदारीचाच एक भाग समजतात. आपल्या देशात किती बालमजूर असतील याच नेमका अंदाज बांधणे कठीण आहे. परंतु सुमारे ५० लाख बालक बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेले आहेत, ज्यामुळे त्यांचे बालपण उद्ध्वस्त होत आहे. ते वाचविण्याच्या कामी प्रत्येक भारतीयाने यथाशक्ती हातभार लावावा, असे आवाहन मी ‘लोकमत’च्या माध्यमातून करीत आहे. प्रतिसादाची अपेक्षा केवळ एका चांगल्या बदलाच्या हेतूपोटी आहे. (शब्दांकन : नितीन अग्रवाल)
कैलाश सत्यार्थी