प्रतिजैविकांचा प्रतिरोध हे जगासमोरील मोठे आव्हान

By Admin | Updated: March 16, 2016 08:39 IST2016-03-16T08:39:52+5:302016-03-16T08:39:52+5:30

कन्झुमर्स इंटरनॅशनलच्या पुढाकाराने जगातल्या २४० देशांमध्ये १५ मार्च हा दिवस दरवर्षी ग्राहक हक्क दिन म्हणून पाळला जातो. दरवर्षी त्यासाठी एखादा विषय निवडला जातो.

The resistance of antibiotics is the biggest challenge ahead of the world | प्रतिजैविकांचा प्रतिरोध हे जगासमोरील मोठे आव्हान

प्रतिजैविकांचा प्रतिरोध हे जगासमोरील मोठे आव्हान

- प्रा.दिलीप फडके
(ज्येष्ठ विश्लेषक)

कन्झुमर्स इंटरनॅशनलच्या पुढाकाराने जगातल्या २४० देशांमध्ये १५ मार्च हा दिवस दरवर्षी ग्राहक हक्क दिन म्हणून पाळला जातो. दरवर्षी त्यासाठी एखादा विषय निवडला जातो. ‘अँटीबायोटिक्सच्या (प्रतिजैविके) अती वापरामुळे माणसाच्या अन्नपदार्थांवर होणारे दुष्परिणाम’ हा यंदाच्या वर्षीच्या विषय. आहारातील मांसाहारी पदार्थांकरिता जे प्राणी उपयोगात आणले जातात त्यांचा रोगांपासून बचाव व्हावा म्हणून वेगवेगळी अँटीबायोटिक्स दिली जातात. ती बऱ्याचदा घातक आणि अनेकदा वाजवीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात दिली जात असल्याचे आढळले आहे. या अती वापराने, त्यांना प्रतिरोध करणाऱ्या नव्या बॅक्टेरियांची निर्मिती होते आहे व त्यांच्यावर अँटीबायोटिक्सचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक रोगांवर उपचार करणे अशक्य होऊन जाते. याबद्दल जागृती करून सुरक्षित अन्नपदार्थ ग्राहकाना मिळणे आवश्यक आहे. भविष्यात अँटीबायोटिक्सच्या अवाजवी वापराची समस्या अधिक गंभीर होणार आहे. त्यामुळेच हा विषय महत्वाचा आहे. जगातल्या विविध भागांमध्ये या निमित्ताने जे विचारमंथन होते आहे त्याचा आढावा घेणे उद्बोधक ठरेल. जगात आज उत्पादित होणाऱ्या अँटीबायोटिक्सपैकी जवळपास निम्मी कृषी क्षेत्रात आणि त्यातही त्यांचा अवाजवी वापर पशुधन व पोल्ट्री क्षेत्रात (कुक्कुटपालन) होत असतो.
आज मॅक्डोनाल्ड, केंटुकी किंवा सबवे यांच्यासारखे जंकफूड उत्पादक जगभर पसरले आहेत. दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढते आहे. कन्झुमर्स इंटरनॅशनलने या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया आणि ग्राहकांच्या दृष्टीने सुरक्षित खाद्यपदार्थ देण्याबाबत ते देऊ इच्छित असलेली हमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅक्डोनाल्ड शंभर देशांमध्ये काम करते. त्यातील केवळ दोन देशांच्या संदर्भात सुरक्षित खाद्यपदार्थ देण्याची हमी तिने दिली आहे. अमेरिकेत २०१७ पर्यंत आणि कॅनडात २०१८ पर्यंत सुरक्षित खाद्यपदार्थ देण्याची हमी मॅक्डोनाल्ड देते आहे. त्या देशांमध्येसुद्धा इतर मांसाहारी पदार्थांच्या बाबतीत अशी हमी त्यांनी दिलेली नाही. ‘सबवे’ने फक्त अमेरिकेत सुरक्षित खाद्यपदार्थ देण्याची हमी दिली आहे. केंटुकीने तर अशा प्रकारच्या कोणत्याही हमीच्या मागणीला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. कन्झुमर्स इंटरनॅशनलच्या संकेतस्थळावर याबद्दलची अधिकृत माहिती सविस्तरपणे वाचायला मिळते. जगात एक लाखांपेक्षा जास्त दुकाने असणाऱ्या या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मांसाहारी जंकफूडच्या बाजारात प्रचंड प्रभाव आहे.
कन्झुमर्स इंटरनॅशनलचे महासंचालक अमांडा लॉंग यांच्या मते अँटीबायोटिक्सचा अवाजवी वापर होत असल्याने जगात त्याचा प्रतिरोधही वाढतो आहे आणि त्यामुळे जगात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. सुरक्षित खाद्यपदार्थ मिळण्यासाठी बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांनी दिलेली हमी केवळ उत्तर अमेरिकेतल्या दोन देशांपुरती आहे आणि जागतिक बाजारपेठेचा विचार करता ती अत्यंत अपुरी असल्याचेही लॉंग यांनी नमूद केले आहे. असुरिक्षत पद्धतीने अँटीबायोटिक्सचा वापर केल्याने निर्माण होणाऱ्या अँटीबायोटिक्स प्रतिरोधामुळे २०५० पर्यंत दर वर्षाला एक कोटींच्या आसपास मृत्यू होण्याची भीती अभ्यासकांनी व्यक्त केली असून ते लक्षात घेण्यासारखे आहे.
अँटीबायोटिक्सचा प्रतिरोध ही केवळ एक पुस्तकी कल्पना नसून तो एक खरा आणि तत्काळ नुकसान करू शकणारा धोका असल्याचे मनदीप धालीवाल या ‘युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या आरोग्य विभागाच्या संचालकांचे विश्लेषण ‘द गार्डियन’ने प्रकाशित केले आहे. या समस्येचे समाधानकारक उत्तर शोधले गेले नाही तर अँटीबायोटिक्स प्रतिरोध हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरू शकेल असे ते सांगत आहेत. ज्याच्यावर अखेरचा उपाय म्हणून वापरल्या जाणाऱ्या अँटीबायोटिक्सचासुद्धा परिणाम होत नाही असा नवा बॅक्टेरिया नोव्हेंबर २०१५मध्ये आढळला असल्याचे सांगून ते म्हणतात की याचा अर्थ थोड्याच काळात बॅक्टेरियामुळे निर्माण होणाऱ्या अनेक प्रकारच्या आजारांवर यापुढे कोणतेही उपचार करता येणार नाहीत. अशा स्थितीत जगातल्या सगळ्या देशांची सरकारे, उद्योग, व्यापारी संघटना आणि सजग नागरिकांच्या संघटना यांनी एकत्र येऊन परिस्थितीचा मुकाबला करणे आवश्यक आहे. तसे झाले तर आपण अजूनही अँटीबायोटिक्स प्रतिरोधाची लाट थोपवू शकू. जगातले श्रीमंत देश आणि बलाढ्य औषध उत्पादक या संशोधनासाठी आवश्यक असणारा निधी उभारू शकतील असा विश्वासदेखील धालीवाल यांनी व्यक्त केला आहे. जानेवारीत जॉन्सन, फायझर यांच्यासह जगातल्या ८५ बायोटेक्नॉलॉजी आणि फार्मा कंपन्यांनी एकत्रितपणाने दावोसच्या जागतिक आर्थिक मंचावर अँटीबायोटिक्स प्रतिरोधाच्या संदर्भात नवे संशोधन आणि नवीन प्रकारच्या औषधांची निर्मिती करण्यासाठी सहकार्याच्या दिशेने प्रयत्न करण्यावर विचार केला आहे.
‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये डॉ. आरोन कॅर्रोल या इंडियाना विद्यापीठाच्या बालरोग विभागातल्या प्राध्यापकांचा लेख प्रकाशित झाला आहे. अँटीबायोटिक्स प्रतिरोधाच्या विरोधातली लढाई आपण हरतो आहोत पण अजूनही वेळ पुरती गेलेली नाही असे ते सांगत आहेत. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार माणसांसाठी वापरल्या जाणाऱ्या अँटीबायोटिक्सपेक्षा कितीतरी पट जास्त अँटीबायोटिक्स आज जनावरांसाठी वापरले जात आहेत. त्या जनावरांचा वापर करून उत्पादित केले जाणारे खाद्यपदार्थ आज सर्रास वापरात आहेत. लॅन्सेट इन्फेकिशअस डिझिझेस जर्नलच्या माहितीनुसार चीनमध्ये कत्तल होणाऱ्यांपैकी २१ टक्के डुकरांमध्ये कोेलीस्टीनचा प्रतिरोध करणारे ई-कोली सापडले आहे. किरकोळीने विकल्या जाणाऱ्यांपैकी १५ टक्के मांस सदोष असल्याचे आढळले आहे. जनावरांना थेट दिल्या जाणाऱ्या अँटीबायोटिक्समुळे निर्माण होणारा प्रतिरोध हा अशा बॅक्टेरियाच्या पहिल्या पिढीतच निर्माण होतो असे नाही तर नंतरच्या पिढ्यांमध्येही तो असल्याचे दिसून येते व ते अधिक भयंकर आहे.
या पार्श्वभूमीवर फॉर्च्युनमध्ये आलेली एक बातमी लक्षवेधक आहे. खाद्यक्षेत्रात काम करणाऱ्या आणि जगातल्या नामांकित ५०० कंपन्यांमधील कारगिल कंपनीने मासाहारी पदार्थांच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या व अँटीबायोटिक्स वापरलेल्या पशुधनापैकी २० टक्के पशुधन कमी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. समस्येचे भीषण स्वरूप पाहाता कारगिलचा निर्णय अतिशय अल्प प्रमाणातला व केवळ अमेरिकेपुरताच आहे, हे मान्य करूनसुद्धा स्वत: होऊन घातक अँटीबायोटिक्सचा वापर कमी करण्याचा हा निर्णय महत्वाचा असून पुढील काळात इतर उत्पादकांनाही त्याच मार्गाने जावे लागणार आहे.

Web Title: The resistance of antibiotics is the biggest challenge ahead of the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.