स्मरण: लोहपुरुषाचे आणि पोलादी कन्येचेही!

By Admin | Updated: October 30, 2015 21:32 IST2015-10-30T21:32:34+5:302015-10-30T21:32:34+5:30

आपल्या देशाच्या एकात्मतेवर आजवर अनेक हल्ले होऊनही आजही आपण एकसंधच आहोत, त्याचे निर्विवाद श्रेय सरदार वल्लभभाई पटेल आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्यासारख्या विभूतींच्या देशसेवेकडे जाते.

Reminder: Iron man and steeled daughter! | स्मरण: लोहपुरुषाचे आणि पोलादी कन्येचेही!

स्मरण: लोहपुरुषाचे आणि पोलादी कन्येचेही!

विजय दर्डा,(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
आपल्या देशाच्या एकात्मतेवर आजवर अनेक हल्ले होऊनही आजही आपण एकसंधच आहोत, त्याचे निर्विवाद श्रेय सरदार वल्लभभाई पटेल आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्यासारख्या विभूतींच्या देशसेवेकडे जाते. आजचा दिवस जसा सरदारांचा जन्मदिन तसाच तो श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अत्यंत दुर्दैवी अशा निर्घृण हत्त्येचा स्मरणदिवस. या दोन्ही घटनांमध्ये तब्बल १०९ वर्षाचे अंतर असले तरी, आजही या उभय व्यक्तींचा देशावरील प्रभाव अविस्मरणीय असाच आहे.
देशाला स्वातंत्र्य बहाल करताना ब्रिटीशांनी त्यांच्या कुटील राजनीतीचा एक अखेरचा डाव खेळून पाहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात देशामध्ये जी विविध संस्थाने होती, त्यांच्यासमोर ब्रिटीशांनी तीन पर्याय ठेवले. एक भारतात विलीन होणे, दुसरा पाकिस्तानशी जोडले जाणे आणि तिसरा, त्यांनी त्यांचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवणे. याबाबत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अत्यंत चाणाक्ष आणि कर्तृत्त्वान नेतृत्वावर या संबंधीचा भार येऊन पडला. त्यांनी अत्यंत कुशलतेने तब्बल पाचशेहून अधिक संस्थानिकांना भारतामध्ये विलीन होण्यास राजी केले. त्यांचे हे उपकार देश कधीही विसरू शकणार नाही. परंतु आपणा साऱ्यांचे हे दुर्दैव की देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर अल्प काळातच सरदारांचे निधन झाले.
स्वतंत्र भारतातील त्यांच्या अल्प कारकिर्दीत दोन महत्त्वाचे पेचप्रसंग उद्भवले होते. एक म्हणजे ३० जानेवारी १९४८ रोजी झालेली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्त्या आणि १९४९ मध्ये बाबरी मशिदीत झालेली प्रभू रामचंंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना. या दोन्ही घटनांच्या संदर्भात खुद्द पटेल यांनी झगझगीत प्रकाश टाकला. तत्कालीन जनसंघाचे (आजच्या भाजपाचा पूर्वअवतार) संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांना लिहिलेल्या पत्रात सरदार म्हणतात, ‘महात्मा गांधींच्या हत्त्येच्या कटामध्ये एक संघटना म्हणून हिंदू महासभेचा काही हात नव्हता हे मी मान्य करतो. पण त्याचबरोबर मी हेही विसरू शकत नाही की बापूंची हत्त्या झाल्यानंतर महासभेच्याच काही कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करून मिठाई वाटली होती. याशिवाय महंत दिग्विजय नाथ, प्रोफेसर रामसिंग आणि देशपांडे यांनी जो अतिरेकी दहशतवाद प्रसारित करण्याचे काम केले, त्यापासून सामाजिक सुरक्षेला असलेला धोकादेखील आम्ही नजरेआड करू शकत नाही. हाच न्याय गुप्तपणे लष्करी वा निमलष्करी धर्तीवर आपले संघटन उभारणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लागू पडतोे.’
विद्यमान काळात सरदार पटेल यांची प्रतिमा एक हिंदूत्त्वनिष्ठ नेता म्हणून रंगविण्यात येत आहे. परंतु अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिमा प्रतिष्ठापीत केल्यानंतर पटेलांनी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री पंडित गोविंद वल्लभ पत यांना एक पत्र लिहिले. त्यात सरदार लिहितात, ‘मला असे वाटते की, ही समस्या उभयपक्षी चर्चा करून सोडविली पाहिजे. चर्चेदरम्यान परस्परांप्रती आदर राखला जावा आणि चर्चा उभय जमातींमधील सामंजस्याच्या पार्श्वभूमीवर व्हावी. मुस्लीम समुदायाला विश्वासात घेऊनच यावर तोडगा निघू शकतो. पण कोणत्याही परिस्थितीत बळाचा वापर करून मार्ग निघू शकत नाही.’ आज आपण देशभर सरदार पटेलांची १४० वी जयंती साजरी करीत असताना, त्यांनी या दोन महत्त्वाच्या विषयांवर व्यक्त केलेले विचार नजरेआड करू शकत नाही. कारण हे दोन विषय आजही तितकेच वादग्रस्त आहेत.
आजच्याच इंदिराजींच्याच पुण्यस्मरण दिवशी त्यांच्या स्मृती ताज्या करताना एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे. या पृथ्वीतलावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींमध्ये काही गुण तर काही उणिवा असतात. म्हणून इंदिराजींसारख्या ऐतिहासीक व्यक्तीच्या कारकिर्दीचे परिशीलन करताना त्यांच्या व्यक्तीमत्त्वामधील विशिष्ट पैलू समोर ठेऊन ते करण्याने काहीही साध्य होऊ शकणार नाही. १९७५ साली देशाते जी आणिबाणी लागू केली गेली, तो एक अत्यंत चुकीचा निर्णय होता, याबाबत वाद होऊ नये. पण त्याबद्दल भारतीय जनतेने इंदिराजींना दंडित केले व तिथेच या काळ्या कालखंडाची अखेरही झाली.
गेल्या ६७ वर्षांच्या स्वतंत्र्य भारताच्या इतिहासात दीर्घकाळ देशाचे नेतृत्त्व करताना श्रीमती इदिरा गांधींनी ज्या अनेक विधायक गोेष्टी केल्या, त्या नजरेआड केल्या जाऊ शकत नाहीत. त्यांनी एकाच वेळी देश आर्थिकदृष्ट्या आणि लष्करी सामर्थ्यदृष्ट्याही बलवान करण्याचा दुहेरी नीतीवर सातत्याने काम केले. देशाच्या अन्नधान्नाच्या गरजेसाठी विदेशांकडे पाहण्याची नामुष्की श्रीमती इंदिरा गांधी यांच्याच हरित क्रांतीमुळे संपुष्टात आली. त्याचबरोबर १९७४ साली त्यांनी घडवून आणलेल्या अणु चाचणीमुळे देश जगातील मोजक्या अण्वस्त्रधारी देशाच्या पंक्तीत जाऊन बसला. बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर तेथील विस्थापिताना भारतात शरण येता यावे म्हणून त्यांनीच सीमा खुल्या केल्या व त्या काळातील पाकिस्तानधार्जिण्या अमेरिकेच्या विरोधात त्याच ठामपणे उभ्याही राहिल्या. आज युरोपात निर्वासितांची जी काही परवड होते आहे, त्या पार्श्वभूमीवर १९७१च्या भारत-बांगलादेश स्थितीशी तुलना केल्यास इंदिराजींचे बलशाली आणि कणखर नेतृत्व डोळ्यासमोर उभे राहते.
बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिल्याच्या परिणामी पाकिस्तानला जी काही जखम झाली, तिचा बदला घेण्याचे त्या देशाचे प्रयत्न तेव्हांपासून आजतागयात अव्याहत सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून मग पाकिस्तानने पंजाब आणि काश्मिरात दहशतवाद निर्माण होण्यास आणि तो वाढत जाण्यास अनंत प्रयत्न केले. पंजाबचा प्रश्न इंदिराजींनी शांततेने आणि सलोख्याच्या मार्गाने सोडविला. पण अखेर त्यात त्यांना त्यांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली. १९७५ च्या आणिबाणीतील अत्याचार जसे कोणीही नजरेआड करीत नाही तसेच इंदिकाजींच्या हत्त्येनंतर देशभर जे शीखविरोधी हिंसक आंदोलन छेडले गेले, तेही कुणी दृष्टीआड करीत नाही. पण त्यासाठी व तेही मृत्युपश्चात इंदिराजींना का जबाबदार धरले जावे?
एक स्वतंत्र लोकशाही देश म्हणून आपल्याकडे विविध विचारसरणींची सरकारे येत राहणे क्रमप्राप्तच आहे. पण म्हणून भूतकाळातील देशाच्या नररत्नांना आपल्या सोयीप्रमाणे वळवून घेणे देशाला परवडणारे नाही. भविष्यात देशात बिगर भाजपा सरकार आले, तर असे सरकार देशाला एक स्वायत्त अण्वस्त्रधारी देश बनविण्याची जी कामगिरी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर इतिहासाने नोंदविली आहे, ती पुसून टाकू शकणार नाही. त्याच न्यायाने सरदार वल्लभभाई पटेल आणि श्रीमती इंदिरा गांधी यांचे कार्यकर्तृत्त्वदेखील कोणतेही सरकार वेगळ्या प्रकाशामध्ये दाखवू शकणार नाही. तसा प्रयत्न करणे देशविघातक ठरू शकते.

Web Title: Reminder: Iron man and steeled daughter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.