प्रादेशिक माध्यमेच नि:स्पृह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेची राखणदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 01:33 PM2023-06-03T13:33:07+5:302023-06-03T13:33:43+5:30

मुख्य प्रवाहातील हिंदी-इंग्रजी माध्यमांनी बहुतांशवेळा निराशाच केलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक माध्यमांची कार्यक्षमता मला फार महत्त्वाची वाटते.

Regional media is the custodian of dispassionate and objective journalism political Political Commentator sanjay baru | प्रादेशिक माध्यमेच नि:स्पृह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेची राखणदार!

प्रादेशिक माध्यमेच नि:स्पृह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेची राखणदार!

googlenewsNext

दर्डा कुटुंबीयांशी माझा दीर्घकाळचा अनुबंध आहे. इंदिरा गांधी यांना प्रथम भेटण्याची संधी मला १९७० साली नागपुरात मिळाली. त्यावेळी विजय दर्डा हे युवक काँग्रेसचे काम करत असत. त्यांचे वडील जवाहरलाल दर्डा हे तर खूप आधीपासूनच काँग्रेस पक्षाशी जोडले गेले होते. त्या काळात इंदिरा गांधी देशात भूमी सुधारणेचा कार्यक्रम राबवत होत्या. १९७०, १९७१ आणि १९७२ ही ती २-३ वर्षे. भूमी सुधार हा या काळात काँग्रेस पक्षाचा मुख्य कार्यक्रम होता.

विजय दर्डा यांनी नागपूरमध्ये या विषयावर एक परिषद आयोजित केली. हैदराबादचा निजाम कॉलेजमधला एक तरुण विद्यार्थी म्हणून मी या परिषदेला हजर होतो. काही जणांना इंदिराजींशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्यात मी होतो. दर्डा कुटुंबाशी माझे नाते हे इतके जुने आहे. व्यावसायिक दृष्ट्यासुद्धा गेली २० वर्षे मी या कुटुंबाशी जोडला गेलो आहे.
गेली अनेक वर्षे मी विजय दर्डा यांच्या स्तंभलेखनाचा वाचक आहे. देशाच्या विविध भागात विजय दर्डा यांच्यासारख्यांचे मतप्रतिपादन फार महत्त्वाचे आहे. कारण देश पातळीवरील मुख्य प्रवाहातील (मुख्यत: हिंदी-इंग्रजी) माध्यमांनी माझ्यासारख्या वाचकांची बहुतांशवेळा निराशाच केलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक माध्यमांची कार्यक्षमता आणि त्यात प्रसिद्ध होत असलेले लेखन मला महत्त्वाचे वाटते.

गेली वीसेक वर्षे मी हे वाचत आलो, त्यात मला भरीव अशी परिपक्वता, समतोल सततच दिसला आहे. विजय दर्डा पक्षपाती भूमिका  घेत नाहीत. त्यांच्या लेखनात व्यावसायिक वस्तुनिष्ठता असते. त्यांचे कुटुंब गेली कित्येक वर्ष काँग्रेसबरोबर जोडले गेलेले असले तरी स्तंभलेखन करताना विविध विषयांकडे ते वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहतात. त्यांच्यासारखे लोक माध्यमांमध्ये आहेत, हे आपले भाग्यच! सगळेच काही संपलेले नाही, याचा दिलासाच या अशा लेखनाच्या निमित्ताने सातत्याने मिळत असतो.

दुसरे म्हणजे आम्ही दोघेही देशाच्या एकाच भागातून आलो आहोत हेही मला सांगितले पाहिजे. स्वतंत्र तेलंगणाची स्थापना झाली तेव्हा विदर्भाच्या वाट्याला हे भाग्य आले नाही, याची खंत त्यांनी एका स्तंभातून व्यक्त केली. आम्ही काय आहोत, याची चुणूक मध्य भारतातून आलेल्या सगळ्याच लोकांमध्ये पाहायला मिळते. गांधीजी वर्ध्याला गेले आणि विनोबा भावे योगायोगाने तेथे आले असे मला मुळीच वाटत नाही. गांधीजी आणि विनोबाजी या दोघांनाही विदर्भाच्या भूमीनेच ओढून घेतले असले पाहिजे. हा हृदयस्थ प्रदेश देशाच्या वैविध्याचे प्रतिबिंब दर्शवितो. महाराष्ट्र एकाचवेळी मागासलेला आणि त्याचवेळी पुढारलेलाही आहे. विदर्भ प्रदेश अजूनही आपले अनेकत्व सांभाळून आहे. 

प्रादेशिक माध्यमांबद्दल माझ्या मनात खास स्थान आणि आस्थाही आहे. मी दैनिकाचा कारभार पाहत होतो त्यावेळी प्रादेशिक बातमीदारांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न मी सातत्याने केला. ‘लोकमत’मधल्या एका पत्रकाराला मी अलीकडेच भेटलो. मी पंतप्रधानांच्या कार्यालयातर्फे माध्यमांशी संपर्क आणि संवादाचे काम पाहत होतो, त्यावेळी ते मला भेटले होते. प्रादेशिक माध्यमांच्या पत्रकारांशी माझी गाठभेट सततच होत असते. निस्पृह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेचा ध्वज उत्तुंग फडकावत ठेवल्याबद्दल मी लोकमत समूहाचे अभिनंदन करतो.

संजय बारु, 
राजकीय भाष्यकार

Web Title: Regional media is the custodian of dispassionate and objective journalism political Political Commentator sanjay baru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.