स्त्री-पुरुष सहजीवनातील बदलते संदर्भ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 07:19 IST2018-11-14T07:18:43+5:302018-11-14T07:19:34+5:30
कोणतीही स्त्री असो किंवा पुरुष, तिने किंवा त्याने अन्यायाला विरोध हा केलाच पाहिजे! अन्याय कोणावर होतो, हे महत्त्वाचे नाही.

स्त्री-पुरुष सहजीवनातील बदलते संदर्भ!
डॉ. रविनंद नामदेव होवाळ
एका मराठी वाहिनीवरून अलीकडेच प्रसारित झालेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान एका महिलेने तिच्या सासू-सासऱ्यांची माफी मागितली. कारण हे, की तिने त्यांच्याङ्कमुलाला आपल्या आई-वडिलांपासून हिरावून घेतले होते. या महिलेला तिच्या चुकीची जाणीव स्वत:च्या उतारवयात झाली. दरम्यानच्या काळात मुलापासून दुरावल्या गेलेल्या सदरङ्कमुलाच्या मातापित्यांना काय वेदना झाल्या असतील व कोणत्या परिस्थितीतून ते गेले असतील, याचा आपण केवळ अंदाजच बांधू शकतो. परंतु तरीही आपली चूक लक्षात आल्यानंतर ती सर्वांसमोर मान्य करणाºया व त्या चुकीचे परिमार्जन करू पाहणाºया सदर भगिनीचे आपण स्वागतच केले पाहिजे. तसे पाहता अशा प्रकारचा अन्याय तर भारतीय प्रदेशातील प्रत्येक महिलेवर व तिच्या कुटुंबीयांवर मागील शेकडो वर्षांपासून होतच आलेला आहे. विवाह झाला की मुुलीला तिचे घर सोडावे लागते. दुसºया एखाद्या घरात जाऊन स्थिरावावे लागते. असे होते, कारण आपण सर्वांनी स्वीकारलेल्या प्रथा किंवा परंपरेचाच तो एक भाग आहे. आजही आपल्याकडील बहुसंख्य घरांमधील केवळ वडील, काका किंवा भाऊ इ. पुरुषच नाही, तर अगदी आई, काकी, मामी इत्यादी स्त्रियाही आपल्या घरातील मुलींना परक्याचे धन मानतात. अशा घरांतील स्त्री आणि पुरुष हे दोघेही सारखेच दोषी असतात.
कोणतीही स्त्री असो किंवा पुरुष, तिने किंवा त्याने अन्यायाला विरोध हा केलाच पाहिजे! अन्याय कोणावर होतो, हे महत्त्वाचे नाही. अन्याय होतो, ही वाईट बाब आहे. स्त्रियांवरील अन्यायाचा केवळ स्त्रियांनीच विरोध करणे ही चुकीची गोष्ट आहे. स्त्रियांनी फक्त स्त्रियांवर होणाºया अन्यायाचाच विरोध करणे हीसुद्धा चुकीचीच गोष्ट आहे. दोघांनी मिळून एकमेकांवरील अन्यायाचा विरोध करणे, ही अचूक गोष्ट आहे. सर्वांनी मिळून सर्व प्रकारच्या अन्यायाचा विरोध करणे, ही अचूक बाब आहे.
आजही भारतीय प्रदेशातील विवाह किंवा इतर प्रसंगांदरम्यान एखाद्या स्त्रीबाबत केल्या जाणाºया अन्यायात पुरुषांबरोबरच काही स्त्रियाही सहभागी असतात की नाही, याचे आपण डोळसपणे परीक्षण केले पाहिजे. इथल्या जातीय संघर्षात दुर्बल जाती-समूहांतील स्त्री-पुरुषांवर केल्या जाणाºया अन्यायात सबल समूहांतील स्त्री आणि पुरुष दोघेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असतात की नाही, याचेही आपण परीक्षण केले पाहिजे. इतकेच नाही, तर श्रीमंत वर्गाकडून जेथे जेथे गरीब वर्गातील स्त्री-पुरुषांवर अन्याय केला जातो, तेथे तेथे या अन्यायात श्रीमंत वर्गातील स्त्रिया आणि पुरुष दोघेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असतात की नाही, याचेही आपण डोळसपणे परीक्षण केले पाहिजे. सत्याचे पूर्णांशाने अवलोकन करूनच कोणत्याही संदर्भातील अन्याय नष्ट करण्यासाठीची रणनीती आपण ठरवली पाहिजे.
विवाहप्रसंगी आपल्या घरातील मुलासाठी मुलगी शोधताना विशिष्ट जातीचीच मुलगी हवी, गोºया रंगाचीच मुलगी हवी, धारदार नाक किंवा पाणीदार डोळे असलेली मुलगीच हवी, अशा प्रकारचा आग्रह वरपक्षातील केवळ पुरुषच नाही, तर स्त्रियाही धरताना आपण सर्रास पाहतो. अशा ठिकाणी केवळ पुरुष नाही, तर स्त्रिया आणि पुरुष असे दोघेही एखाद्या स्त्रीवर अन्याय होण्यास कारणीभूत ठरतात. दुसºया बाजूने पाहिले असता असे दिसते, की अशा वेळी मुलीच्या कुटुंबातील स्त्रिया आणि पुरुष अशा दोघांवरही अन्याय होतो. मग सन्मानाचा हा लढा केवळ स्त्री विरुद्ध पुरुष असा उरतो कुठे? तो तर अन्यायी स्त्री-पुरुष विरुद्ध अन्यायग्रस्त स्त्री-पुरुष असा बनलेला असतो.
आपल्या आजूबाजूला आज आपल्याला अशी अनेक कुटुंबे दिसतात, की जिथे पुरुषांइतकेच स्त्रियांचेही वर्चस्व निर्माण झालेले आहे. अशा घरांमध्ये एक मुलगा आपल्या आईच्या सल्ल्याने वागतो. एक पती आपल्या पत्नीच्या सल्ल्याने वागतो. तिला घरकामात अल्पस्वल्प मदतही करतो. स्वत:च्या सुख-दु:खापेक्षा आपल्या आई किंवा पत्नीच्या सुखदु:खाचा विचार करून स्वत: झिजत राहतो आणि प्रसंगी स्वत:वरच मोठा अन्यायही करून घेतो. अशा ठिकाणी लिंगभेद गळून पडलेला असतो व केवळ माणुसकीच शिल्लक राहिलेली असते. ही माणुसकी जपणे आणि सर्व बाजूंनी फुलवणे हेच आजच्या सर्व स्त्री आणि पुरुषांनी आपले कर्तव्य मानले पाहिजे. स्त्री आणि पुरुष या दोघांचेही जीवन कसे अधिकाधिक सुखकर बनेल, याचाच आपण अधिक विचार केला पाहिजे व हे करताना अन्यायग्रस्त सासू-सासºयांची माफी मागणाºया सुनेचे आपण मनापासून स्वागत केले पाहिजे. या भगिनीने उतारवयात केलेल्या या सुरुवातीमुळे आपली एक चूक सुधारण्याची संधी अशा प्रकारच्या चुका करणाºया अनेक भगिनींना तरुणपणीच मिळो आणि या अनुषंगाने भारतीय समाजजीवनाच्या सर्वच अंगांनी एक उत्तम समतोल साधण्याची प्रेरणा प्रत्येक संघर्षशील स्त्री-पुरुषाला मिळो, हीच सदिच्छा.
(लेखक सामाजिक विषयांचे अभ्यासक आहेत)