मोदींच्या बौद्ध धर्मप्रेमामागील वास्तव

By Admin | Updated: September 3, 2014 13:40 IST2014-09-03T13:40:53+5:302014-09-03T13:40:53+5:30

ज्या राष्ट्रांत बौद्ध धर्माचा प्रसार झाला आहे आणि जेथील सरकारे बौद्ध धर्माने प्रभावित आहेत,त्या राष्ट्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणीवपूर्वक भेटी देत आहेत. पण यामागचे कारण काय?

The reality behind Modi's Buddhist religion | मोदींच्या बौद्ध धर्मप्रेमामागील वास्तव

मोदींच्या बौद्ध धर्मप्रेमामागील वास्तव

पुण्यप्रसून वाजपेयी, आजतकचे कार्यकारी संपादक

जपानच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी क्योटो येथील तोजी बौद्ध मंदिराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी किंकाकुजी बौद्ध मंदिरालाही भेट दिली. याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात नेपाळ येथे सार्क राष्ट्रांची परिषद होणार आहेस त्याही वेळी ते काठमांडू येथील बौद्धनाथ किंवा स्वयंभूनाथ स्तुपाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. तेथे अमनिभा मोनॅस्टरीला भेट देण्याची इच्छा ते व्यक्त करण्याची शक्यता आहे. हे सर्व उगाचच घडत नाही. त्यामागे निश्चित असा हेतू आहे. मोदी यांनी सर्वप्रथम भूतानला भेट दिली त्यामागेसुद्धा त्यांचा असाच निश्चित हेतूृ होता. ज्या-ज्या राष्ट्रांत बौद्ध धर्माचा प्रसार झाला आहे आणि जेथील सरकारे बौद्ध धर्माने प्रभावित आहेत, त्या-त्या राष्ट्रांना ते जाणीवपूर्वक भेटी देत आहेत. या राष्ट्रांसोबत नवीन नातेसंबंध निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नागपूरच्या आंबेडकरवादी जनतेपासून उत्तर प्रदेशातील मायावतीसारख्या दलित नेत्यांना मोदींना बौद्ध धर्माचे असे अचानक प्रेम का वाटत आहे, हा प्रश्न सतावतो आहे. बौद्ध धर्माने प्रभावित राष्ट्रांशी असलेल्या संबंधांना नवी व्याप्ती देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संघ परिवाराचा विस्तार करण्यासाठी गोळवलकर गुरुजींनी जी शिकवण दिली होती, तिचे तर मोदी अनुसरण करीत नसावेत?
रा. स्व. संघाच्या इतिहासाची पाने उलटली, तर लक्षात येते, की १९७२मध्ये ठाणे येथे पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या निवासस्थानी झालेल्या १० दिवसांच्या चिंतन बैठकीत गुरुजींनी जातीपाती, संप्रदाय आणि भाषा यांच्यापलीकडे जाऊन संघाचा विस्तार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले होते. याचा परिणाम असा झाला, की केरळ येथील दलित बुद्धिवंत रंगाहरी हे संघाचे बौद्धिक प्रमुख म्हणून आता-आतापर्यंत कार्यरत होते. याच पार्श्वभूमीवर, विश्व हिंदू परिषदेचे बाळकृष्ण नाईक हे जगातील बौद्ध धर्म मानणाऱ्या राष्ट्रांच्या सतत संपर्कात आहेत. त्यामुळे संघ परिवाराचे संबंध भूतान, नेपाळ, श्रीलंका, जपानसमवेत डझनभर बौद्धानुयायी राष्ट्रांसोबत जुळले आहेत.
महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टीच्या नावाने राजकारण करणारे आंबेडकरवादी किंवा उत्तर प्रदेशाच्या बहुजन समाज पक्षाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या मायावती यांच्यासाठी मोदींचे हे धोरण धोक्याची घंटा ठरणार आहे. मोदींनी मायावतींना आधीच शून्यावर आणृून ठेवले आहे. त्यामुळे मोदींनी सुरू केलेल्या जन-धन योजनेवर पहिला वार मायावतींनी केला आहे; पण मोदी आपल्या योजनेत इतके पुढे गेले आहेत, की हा वार त्यांच्यासाठी निरर्थक ठरला आहे. मोदींनी राष्ट्रीयतेला एकूण व्यवस्थेत स्थान दिले आहे, जे यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षाने दिले नव्हते. रा. स्व. संघाचीच एक संघटना असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाने समाजातील मागासलेल्या जातींसाठी जे काम केले आहे, तसे काम कोणत्याही राजकीय संघटनेने यापूर्वी केले नव्हते. जयप्रकाश नारायण यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयोग करणारे बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधींनंतर मोरारजी देसाई नव्हे, तर जगजीवनराम यांना पंतप्रधान करण्याचे ठरविले होते.
१९७४मध्ये वाजपेयींनी लोकसभेतील भाषणात ‘यापुढे हिंदू मार खाणार नाही’ असे म्हटलेच होते. संघ परिवाराने वाजपेयींच्या त्या भाषणाच्या करोडो प्रती देशभर वाटल्या होत्या. अर्थात, १९७७मध्ये परराष्ट्रमंत्री झाल्यावर वाजपेयींनी हिंदू शब्दाचा कधी वापर केला नाही, हेही तितकेच खरे! बाळासाहेब देवरस वा त्यांच्या पूर्वी गोळवलकर गुरुजींनी आणि नंतर रज्जूभय्यांनीसुद्धा पं. नेहरूंप्रमाणे सर्वसंमतीचा भाव निर्माण करण्याचाच प्रयत्न केला. कारण, संघाच्या जन्मापासून ‘हिंदू’ शब्द हा त्या संघटनेशी जुळलेला आहे.
डॉ. हेडगेवारांनी हिंदू असण्याची खुलेपणाने वकिली केली होती. १९७१-७२मध्ये विवेकानंद स्मारकाचे काम करणारे एकनाथजी रानडे यांनी इंदिरा गांधींच्या सांगण्यावरून स्वामी विवेकानंदांना हिंदू संस्कृतीऐवजी भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानण्यास मान्यता दिली,
तेव्हा त्यांना संघाच्या प्रतिनिधी सभेतून वगळण्यात आले होते. राजकीय कारणांसाठी हिंदू शब्द जर बाजूला ठेवावा लागला, तर रा. स्व. संघ संकटात येईल, असा इशारा गोळवलकर गुरुजींनी दिला होता. त्याचमुळे गोळवलकर हयात असेपर्यंत एकनाथजी रानडे हे प्रतिनिधी सभेत भाग घेऊ शकले नव्हते. देवरस यांनी राजकीय कारणांसाठी
का होईना; पण हिंदू शब्दाशी तडजोड केली होती.
कुणी हिंदू शब्द उच्चारू नये, अशा सूचनाच रा. स्व. संघाने दिल्या होत्या. केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्ला आणि
गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा यांनी हिंदू
शब्दाचा केलेला वापर मागे घेण्यामागे संघाची हीच भूमिका आहे.
समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न संघ परिवार करीत आहे. त्यामुळे बौद्ध धर्माबाबतही संघाच्या बदलत्या भूमिकेचे प्रत्यंतर पाहावयास मिळते. एके काळी संघाने बुद्धाला विष्णूचा अवतार मानले होते; पण त्याबद्दल आक्षेप घेतला गेल्यावर संघाने बौद्ध धर्म हा वेगळा धर्म असल्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे हिंदू शब्दावर आक्षेप घेतला जाऊ लागताच संघाने ‘राष्ट्रीय’ शब्दाचा वापर करणे सुरू केले. हेडगेवार यांनीसुद्धा हिंदू स्वयंसेवक संघ या शब्दाऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शब्दाचा स्वीकार केला होता. सावरकरांच्या हिंदू महासभेत मुस्लिम, ख्रिश्चन यांना स्थान नव्हते; पण संघाच्या हिंदू शब्दात राष्ट्रीयतेचा भाव आहे आणि त्यात सर्वधर्म व संप्रदायांना स्थान देण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेचे प्रचारक असलेले बाळकृष्ण नाईक अमेरिका सोडून भारतात परतले असून, संघाला बौद्धधर्माशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. संघाचे प्रचारक असलेले नरेंद्र मोदी हेही क्योटोत जाऊन बनारसला क्योटोसारखे करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या या प्रयत्नांनी दलितांचे राजकारण करणारे कितपत संपुष्टात येतील आणि त्यातून भाजपाची किती प्रमाणात वाढ होईल, हे आगामी काळच दाखवून देईल.

Web Title: The reality behind Modi's Buddhist religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.