वाचाल तर वाचाल!

By Admin | Updated: April 20, 2017 02:37 IST2017-04-20T02:37:15+5:302017-04-20T02:37:15+5:30

इतिहासाचा मागोवा, वर्तमानाचे भान आणि भविष्याचा वेध या तीनही गोष्टी जर कशामुळे शक्य होत असतील तर त्या पुस्तकांमुळेच

Readable! | वाचाल तर वाचाल!

वाचाल तर वाचाल!

इतिहासाचा मागोवा, वर्तमानाचे भान आणि भविष्याचा वेध या तीनही गोष्टी जर कशामुळे शक्य होत असतील तर त्या पुस्तकांमुळेच. व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत अनेक घटकांचा हातभार लागतो. व्यक्ती आणि तिच्याभोवती असणारे जग यांच्या परस्परसंबंधातून व्यक्तिमत्त्वाचे शिल्प साकारत असते. या प्रवासात पुस्तकांची भूमिका अत्यंत मोलाची ठरते म्हणूनच सुस्पष्ट विचारांतून जीवनदृष्टी देणाऱ्या ग्रंथांना मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
‘वाचाल तर वाचाल’ या अल्पाक्षरांमध्ये जीवनाचा संदेश लपलेला आहे. अगदी प्राचीन काळापासूनचे संचित, इतिहास माणसाला जपून ठेवावासा वाटला त्यातून आली अक्षरलिपी व त्यातून आले शब्द. या शब्दांना ग्रंथरूप मिळाले आणि तो संस्कृतीचा ठेवा बनला. हा वारसा आपल्याला पावला-पावलावर समृद्ध करीत आला आहे. अनुभवाला ज्ञानाची जोड मिळाल्यानंतर जीवनाचा अर्थ गवसतो, म्हणून पुस्तके महत्त्वाची ठरतात. दरवर्षी २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. सर्वश्रेष्ठ नाटककार विल्यम शेक्सपिअर आणि ‘डॉन क्विझोट’कार मिग्वेल सर्व्हान्टिस यांच्या निधनाचा दिवस ‘युनेस्को’ने १९९५पासून ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. परंतु ती निव्वळ औपचारिकता न राहता पुस्तकांचे महत्त्व आपल्या मनात ठामपणे रुजणे गरजेचे आहे.
ग्रंथांमुळे जीवन घडते, याची अनुभवसिद्ध उदाहरणे आपल्या सभोवताली असतात. पुस्तकांमुळे अवकाश विस्तारते, ज्ञानात भर पडते, जीवनविषयक दृष्टिकोन अधिक सुस्पष्ट होते. माहितीचा आणि ज्ञानाचा खजिना खुला होतो. यशस्वी लोकांच्या यशोगाथा, त्यांची चरित्रे-आत्मचरित्रे वाचून सामान्यांना प्रेरणा मिळते. अर्थपूर्ण पुस्तकाच्या सहवासात योग्यतापूर्ण वाचक आला की कर्तृत्वाचे गौरीशंकर उदयाला येत असते. सर्जनशील ज्ञानाच्या ओढीने केलेले वाचन ही यशाच्या दिशेने जाण्याची पहिली पायरी असते. यश कर्तृत्वाच्या शिखरावर चढलेल्या अनेक महापुरुषांच्या आयुष्याला पुस्तकांनीच वळण दिले आहे. पुस्तक हे नेहमी जिवाभावाचा साथीदार असते. दु:खात, आनंदात, प्रवासात ते कायम सोबत करते. पुस्तके जशी मित्राची भूमिका बजावतात तशीच प्रसंगी मार्गदर्शकाची व गुरुचीही भूमिका बजावतात. ग्रंथसहवास बालवयात घडला तर देश-विदेशातील संस्कृतींची ओळख होऊन उद्याचे जग एकसंधतेच्या नजरेने पाहण्याची व्यापक दृष्टी प्राप्त होऊ शकते.
भारतीय साहित्यविश्व अनेकार्थाने समृद्ध आहे. त्यातही मराठी साहित्यामध्ये उत्तमोत्तम दर्जेदार लेखकांची परंपरा आहे. वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर, विं.दा. करंदीकर, भालचंद्र नेमाडे, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर, नारायण सुर्वे, दुर्गा भागवत, जी.ए. कुलकर्णी, सुरेश भट, ग्रेस, बा. भ.बोरकर, मंगेश पाडगावकर यांसारख्या प्रतिभावंत सारस्वतांनी मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आणि वाचकांच्या अभिरुचीला समृद्ध केले.
समाजात किती वाचले जाते यापेक्षा काय वाचले जाते, याचा विचार सामाजिक निकोपतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा असतो व ही जबाबदारी प्रामुख्याने लेखकांची आहे. लेखकांनी समाजाला विचारप्रवण बनविणारे विचार समाजात रुजविले पाहिजेत. आजमितीला डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या प्रसारामध्ये आपण वाचनसंस्कृती हरवून बसतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. उत्तमोत्तम साहित्यिक तयार होणे ही त्या त्या काळातील समाजाची गरज असते. तिथे परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे या पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण याचे चिंतन करायला हवे. थोर इतिहासकार गिबन म्हणाला होता, ‘देशातली सगळी संपत्ती जरी माझ्या पायाशी ओतली तरी माझे वाचनप्रेम मी सोडणार नाही.’ पुस्तकांप्रति आपलीही अशीच श्रद्धा निर्माण व्हावी हीच सदिच्छा.
- विजय बाविस्कर

Web Title: Readable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.