उपेक्षेला वाचा; परंतु परिणाम काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 07:10 PM2019-09-20T19:10:54+5:302019-09-20T19:11:19+5:30

मिलिंद कुलकर्णी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांसोबत सामाजिक गटांची रणनीती आखली जात आहे. त्यात आता भर पडली ...

Read the neglect; But what is the result? | उपेक्षेला वाचा; परंतु परिणाम काय?

उपेक्षेला वाचा; परंतु परिणाम काय?

Next

मिलिंद कुलकर्णी
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांसोबत सामाजिक गटांची रणनीती आखली जात आहे. त्यात आता भर पडली आहे, मतदारसंघ पुनर्रचनेमुळे उपेक्षेच्या अंधारात लोटल्या गेलेल्या क्षेत्रातील मतदार आता जागरुक आणि संघटित होऊ लागले आहे. गेल्या पंधरवड्यात भडगाव तालुक्यातील जागरुक नागरिकांनी एकत्र येऊन एक सभा घेतली. भडगाव तालुक्यावर होत असलेल्या अन्यायाविषयी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भडगाव तालुका हा पूर्वी पारोळा मतदारसंघाला जोडला होता, पुनर्रचनेनंतर तो पाचोरा तालुक्याला जोडला गेला आहे. तालुका असूनही मतदारसंघात दुय्यम भूमिका बजावावी लागत असल्याने निराशेचा सूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. सभेच्या निमित्ताने तो अधोरेखित झाला. वेगवेगळे विचार व्यक्त झाले. भडगावकरांचा राग शांत करण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींकडून पुढाकार घेतला जाईल. आश्वासनांची खैरात केली जाईल. ठोस शब्द दिला जाईल. पण पुन्हा तो पाळला जाईल काय, याची शाश्वती भडगावकरांना वाटेल काय, हा महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे.
अर्थात, हा विषय केवळ भडगावचा नाही. खान्देशात असे काही तालुके आहेत, ज्यांच्या वाट्याला अशीच उपेक्षा आली आहे. पारोळा तालुक्याची हीच अवस्था आहे. राजकीयदृष्टया अतीशय संवेदनशील आणि प्रभावशाली तालुक्यात एकेकाळी मंत्रिपद, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष अशी पदे होती. परंतु, आता हा तालुका अमळनेर आणि एरंडोल या दोन मतदारसंघात विभाजित झाला आहे. आमदार याच तालुक्याचा निवडून येत असला तरी अमळनेरला जोडल्या गेलेल्या भागातील जनतेला ‘आपला वाली कोण? ’ ही भावना बळावू लागली आहे. एरंडोल हे मतदारसंघाचे नाव असले तरी या भागातील नेत्याला दहा वर्षात आमदारकीची संधी न मिळाल्याने उपेक्षा पदरी आली आहे. धरणगाव आणि बोदवड तालुकेदेखील अनुक्रमे जळगाव ग्रामीण आणि मुक्ताईनगर तालुक्यांना जोडल्याने स्वतंत्र अस्तित्व राहिलेले नाही.
हीच स्थिती यावल तालुक्याची झाली आहे. या तालुक्याचे विभाजन करुन रावेर आणि चोपडा मतदारसंघाला जोडण्यात आला आहे. आमदार तालुक्यातील असले तरी विभाजनाचे दु:ख तालुकावासीयांना आहे. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा तालुका हा शहादा मतदारसंघाला जोडला गेला आहे.धडगाव तालुका हा अक्कलकुवा मतदारसंघाला जोडला आहे. तालुके सहा असले तरी मतदारसंघ चार असल्याने ही उपेक्षेची भावना आहेच.
मतदारसंघ पुनर्रचना करताना ठराविक मतदारसंख्येचा निकष पूर्ण करण्यासाठी लगतच्या तालुक्यातील काही महसूल मंडळे जोडली गेली आहेत. त्यांची अवस्था तर आणखीच बिकट झालेली आहे. पाचोरा तालुक्यातील कुºहाड हे महसूल मंडळ जामनेर मतदारसंघाला जोडले गेले आहे. या मंडळाचा लोकसभा मतदारसंघ रावेर आहे. खासदारांकडे काम असले तर त्यांना मुक्ताईनगर गाठावे लागते. रावेर तालुक्यातील सावदा मंडळ हे मुक्ताईनगर मतदारसंघाला जोडले गेले आहेत. साक्री तालुक्यातील दुसाने मंडळ हे शिरपूरला जोडले गेले आहेत. शहादा तालुक्यातील काही मंडळे नंदुरबारला जोडली गेली आहेत. नंदुरबारची दोन मंडळे नवापूरला जोडली गेली आहेत. पाच वर्षे शासकीय कामासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, बाजार समितीशी संबंधित कामासाठी तालुक्याला जायचे. मात्र विकास कामांसाठी दुसऱ्या तालुक्यातील संबंधित कार्यालयांशी संपर्क आणि पाठपुरावा करावा लागत आहे. हा द्राविडी प्राणायाम दिवसेंदिवस त्रासदायक ठरत असल्याने भडगावसारखे नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
उपेक्षेला वाचा फोडली असली तरी त्याचा काही परिणाम होईल, याची शाश्वती नाही. कारण हा विषय केंद्रीय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. पुन्हा कधी मतदारसंघ पुनर्रचना होईल, तेव्हा काही मार्ग निघू शकेल. त्याला किती कालावधी लागेल, हे कुणीही सांगू शकत नाही.

Web Title: Read the neglect; But what is the result?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.