वावदूक विधाने करण्यापेक्षा विराटने बोलावे फक्त ‘बॅट’ने!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 03:19 AM2019-11-30T03:19:04+5:302019-11-30T03:19:24+5:30

विराट कोहलीचा समावेश सध्या जगातल्या सर्वोत्तम तीन फलंदाजांमध्ये होतो. जगभरच्या मैदानांवर आणि क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये गेली काही वर्षे विराट ज्या सातत्याने धावा करतोय, ते पाहता सर्वाधिक शतके, सर्वाधिक धावा वगैरे अनेक विक्रम तो लीलया मागे टाकेल यात शंका नाही.

Rather than making silly statements, Virat should just say 'bat'! | वावदूक विधाने करण्यापेक्षा विराटने बोलावे फक्त ‘बॅट’ने!

वावदूक विधाने करण्यापेक्षा विराटने बोलावे फक्त ‘बॅट’ने!

Next

- सुकृत करंदीकर

(सहसंपादक, लोकमत, पुणे) 

विराट कोहलीचा समावेश सध्या जगातल्या सर्वोत्तम तीन फलंदाजांमध्ये होतो. जगभरच्या मैदानांवर आणि क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये गेली काही वर्षे विराट ज्या सातत्याने धावा करतोय, ते पाहता सर्वाधिक शतके, सर्वाधिक धावा वगैरे अनेक विक्रम तो लीलया मागे टाकेल यात शंका नाही. केवळ फलंदाज म्हणूनच नव्हे, तर चपळ क्षेत्ररक्षक म्हणूनही विराटची कामगिरी चमकदार आहे. कर्णधारपदाची जबाबदारी आल्यानंतरही त्याच्या ओझ्याखाली विराट नावाचे ‘रन मशिन’ मंदावले नाही. सचिन तेंडुलकरला हे जमले नव्हते. कर्णधारपदाच्या ताणामुळे फलंदाजीचा बहर ओसरू लागल्याने सचिनला हे पद सोडून देण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. विराट हा विजिगिषू वृत्तीचा, प्रचंड कष्टाळू आणि कमालीचा शिस्तबद्ध खेळाडू आहे. प्रत्येक सामन्यात भारत जिंकलाच पाहिजे, ही स्वत:मध्ये असणारी आग-ईर्ष्या संघातल्या प्रत्येक खेळाडूमध्ये रुजविण्याचा प्रयत्न विराट करतो. याचा परिणाम म्हणूनच विराटकडे कर्णधारपद आल्यापासून भारत तिन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये सातत्याने जिंकतो आहे. कर्णधार आणि फलंदाज म्हणून विराटचा प्रवास सार्वकालिकश्रेष्ठांच्या मांदियाळीत विराजमान होण्याकडे चालू आहे.

विराटचे हे थोरपण मान्य केल्यानंतर मात्र, त्याने नुकत्याच उधळलेल्या मुक्ताफळांचा समाचार घेणे भाग आहे. विराटच्या संघाने बांगलादेशविरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका २-० ने खिशात घातली. एवढेच नव्हे, तर सलग चार कसोटी सामने एका डावाने जिंकण्याचा विश्वविक्रमही नोंदविला. त्यानंतर विराटने दावा केला की, माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटमध्ये ‘विनिंग कल्चर’ रुजविले. गांगुलीच्या कोलकात्यात बोलत असल्याने विराट असे म्हणाला का? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष असलेल्या गांगुलीच्या मर्जीत राहण्यासाठी विराट असे बोलला का? की केवळ भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल इतिहासाबद्दल घोर अज्ञान असल्याने विराट असे बोलून गेला? यातली तिसरी शक्यता सर्वाधिक आहे. अन्यथा विराटकडून एवढा ‘खराब फटका’ खेळला गेला नसता.

सौरव गांगुलीच्या संघाने भारतीय क्रिकेटला चांगले दिवस दाखविले हे खरे आहे. आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड या कठीण मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये गांगुलीच्या संघाने अनेक अविश्वसनीय विजय मिळविले. सन २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत पोहोचला, हा कर्णधार म्हणून गांगुलीच्या कारकिर्दीतला सर्वोच्च क्षण होता. सचिन, द्रविड, लक्ष्मण. वीरेंद्र सेहवाग, कुंबळे, युवराज, झहीर, हरभजन अशा दर्जेदार खेळाडूंच्या सोबतीने गांगुलीने भारतीय क्रिकेटला शिखरावर नेले, पण ती सुुरुवात मात्र नक्कीच नव्हती. गांगुलीसारखे जिगरबाज कर्णधार आणि गांगुलीच्या संघाइतकेच विजयाची भूक ठेवणारे संघ भारतीय क्रिकेटने त्याच्याही आधी पाहिले.

१९८३चा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारा कपिल देवचा संघ आताच्या विराट कोहलीच्या किंवा दीड दशकापूर्वीच्या गांगुलीच्या संघाच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत कमी नव्हता. अजित वाडेकरांच्या संघाने वेस्ट इंडिजमध्ये जाऊन जिंकलेली कसोटी मालिका हा भारतीय क्रिकेटने कूस बदलण्याची सुरुवात ठरली. अगदीच तुलना करायची, तर विराट सध्या मिळवित असलेल्या यशापेक्षा साठ-सत्तरच्या दशकातले विजय अधिक महत्त्वाचे होते. त्याचे साधे कारण म्हणजे त्यावेळच्या गोलंदाजांचा दर्जा आणि आताच्या तुलनेत फलंदाजांना मिळणारे कमी संरक्षण याचा विचार केला, तर साठ-सत्तरच्या दशकातले विदेशातले भारताचे विजय जास्त अवघड आणि म्हणूनच जास्त महत्त्वाचे होते. सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, इरापल्ली प्रसन्ना, बिशनसिंग बेदी यासारख्या अनेकांच्या व्यक्तिगत कामगिरीचा ठसा देश-विदेशात उमटला होता. किंबहुना, सुनील गावस्करांची बॅट तळपली म्हणूनच सचिन तेंडुलकर उदयाला आला. सचिन मैदान गाजवत राहिला, त्यातूनच सेहवाग-रोहित-विराट अशा पुढच्या पिढ्या येत राहिल्या. कपिल देवची जिगरी गोलंदाजी पाहूनच भारतीय गोलंदाजांच्या पुढच्या पिढ्या घडल्या. मागच्या पिढीच्या कर्तृत्वाचा आदर्श घेतच पुढची पिढी त्यापुढचे पाऊल टाकत असते. अजित वाडेकर, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली ही विजयी कर्णधारांची वाटचाल त्यांच्या पूर्वासुरींच्या पायावर उभी आहे. वर्तमान गाजविणाºया विराटने इतिहासाचे भान ठेवले नाही, तरी चालेल; पण त्याने मग वावदूक विधाने करण्याऐवजी फक्त ‘बॅट’नेच बोलत राहावे.

Web Title: Rather than making silly statements, Virat should just say 'bat'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.