वेगाने पसरतेय ब्रह्मपुत्रेतील आग

By Admin | Updated: May 9, 2014 00:22 IST2014-05-09T00:22:40+5:302014-05-09T00:22:40+5:30

संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आसाम प्रांतात कोकरामुगर क्षेत्रात व बक्सा जिल्ह्यात जातीय व धार्मिक कारणांमुळे पुन्हा हिंसा भडकली. या दुर्दैवी हिंसाचारात जवळ जवळ ३२ जण...

Rapidly spreading Brahmaputra fire | वेगाने पसरतेय ब्रह्मपुत्रेतील आग

वेगाने पसरतेय ब्रह्मपुत्रेतील आग

 संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आसाम प्रांतात कोकरामुगर क्षेत्रात व बक्सा जिल्ह्यात जातीय व धार्मिक कारणांमुळे पुन्हा हिंसा भडकली. या दुर्दैवी हिंसाचारात जवळ जवळ ३२ जणांचा बळी गेला. त्यात महिला व लहान मुले जास्त आहेत. कोकराझार व बक्सा जिल्हे अत्यंत संवदेनशील असे जिल्हे आहेत. सन १९८० मध्ये स्वतंत्र बोडो लँडची मागणी सुरू झाली, तेव्हापासून या क्षेत्रात दर वर्षी हिंसाचार होत आहे. यापूर्वी हा हिंसाचार होताना विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, व इतर राज्यांतले काम करणारे मजूर लक्ष्य होते. आसाम पोलीस, केंद्रीय सुरक्षा दल व सैन्यावरही हल्ले झाले आहेत. या क्षेत्रात उद्भवलेली सशस्त्र क्रांती, सशस्त्र विद्रोह मी स्वत: अनुभवला आहे. बोडो लँडचे लोक बहुतेक हिंदू धर्माचे अनुयायी आहेत. ते देव धर्म जास्त मानत नाही, तरी ते निसर्गपूजक आहेत. आसाम शासनाने अनेकवर्ष बोडो जातीच्या लोकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आसाममध्ये उल्फा आतंकवादी संघटनाचा वाढता प्रभाव पाहून बोडो लँडची स्वतंत्र मागणी सुरू झाली. व सशस्त्र क्रांतीकरिता नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट आॅफ बोडो लँड (एनडीएफबी) ची स्थापना झाली. या क्रांतिकारी व बंडखोर संघटनेला बांगलादेश, ब्रम्हदेशामध्ये कॅम्प सुरू करण्यासाठी जागादेखील मिळाली. चीननेही त्यांना सर्वतोपरी मदत केली. अजूनही करत आहे. एन.डी.एफ.बी. हे फार कठोर, निर्दयी व गोरिल्ला युद्धातील चतुर संघटन आहे. भौगोलिक दृष्टीने बोडो लँडला फार महत्त्व आहे. त्याची सीमा बांगलादेश, भूतान, बंगाल, अरुणाचल प्रदेश व आसामला लागून आहे. ईशान्य भारतात येणारा सर्व संचार, नदी, रेल्वे व रस्ता मार्गाने भारताला जोडणारा सर्व भाग बोडो लँडच्याच मार्फत आहे. बोडो लँडला लागूनच पश्चिम बंगाल राज्यातील कुचबिहार क्षेत्रात कामतापुरी लिबरेशन आर्गनाईजेशन (के. एफ. ओ.) नावाची देशद्रोही संघटना कार्यरत आहे. या संघटनेचे सबंध एन. डी. एफ. बी. सोबत आहेत. संपूर्ण बोडो लँड क्षेत्रात जंगल, सुपीक जमीन व पाणी भरपूर आहे परंतु, त्याचवेळी घुसखोरी केलेल्या बांगलादेशी लोकांचे बाहुल्य आहे. सीमाक्षेत्रात काही काही गावांत तर सर्व नागरिक बांगलादेशीच आहेत. स्थानिक समर्थन देणारे त्यांना लोक बंगाली भाषा बोलणारे मुस्लिम म्हणतात. स्थानिक बंगाली भाषिक मुस्लिम नागरिकांत जास्त संख्या बांगलादेशमधून आलेल्या अनधिकृत नागरिकांची आहे. बोडो जातीच्या आदिवासींना ती मान्य नाही. जर ते स्थानिक लोक स्वत:ला बांगलादेशी म्हणतात, तर हे आसामचे मूळ निवासी कसे असणार, असा प्रश्न बोडो दहशतवादी संघटना विचारतात. व्यवसायही बांगलादेशी लोकांकडे एकवटल्याने स्थानिक बोडो तरुणांचा राग या लोकांवर जास्त आहे. आसाम, बोडो लँडक्षेत्रात बांगलादेशातून आलेल्या लोकांना अनधिकृत रूपात रेशन कार्ड, नोकरी, जमीन सर्व मिळून जाते. परंतु, मूळच्या स्थानिक लोकांना अजून हे अधिकार नसल्याकारणाने ही जातीय व धार्मिक हिंसा वाढत चालली आहे. दि. ३० एप्रिलला झालेला हिंसाचार खरे तर बांगलादेशी समुदायाच्या विरूद्ध झाला. काही लोकांनी आरोप केला आहे, की बंगाली भाषिक मुस्लिम यांनी एका राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली येऊन बोडो जातीच्या उमेदवाराच्या विरुद्ध मतदान केले. यात किती सत्यता आहे हे प्रत्यक्ष मतमोजणीनंतर विश्लेषण केले तरच कळेल. परंतु, यात मुळीच शंका नाही, की आसाम प्रांतात सध्या सत्तेत असलेला राजकीय पक्ष सातत्याने बांगलादेशी अनधिकृत लोकांचा वापर मतदानात करतो हे वास्तव मलाही माहीत आहे. आज एकाराजकीय पक्षाचे जवळ जवळ १९ आमदार विधानसभेत आहेत व हा पक्ष सत्तापक्षाला पाठिंबा देत आहे. बहुतेक हे सर्व आमदार विधानसभेत बांगलादेशी मतदारांच्या मतांवरच निवडून आलेले आहेत. ही फार चिंतेची बाब आहे. सन १९९८ मध्ये इशान्य भारतात लेफ्टनंट जनरल म्हणून कार्यरत असताना मी लेखी स्वरूपात सरकारला बजावले होते, की २०१९ मध्ये आसाममधून पुन्हा एकदा स्वतंत्र राष्ट्राची मागणी होणार आहे. सध्या सुरू असलेले हिंसा, हल्ले ही त्याचीच तयारी आहे. २००७ मध्ये मी आपल्या निवेदनात स्पष्ट लिहिले आहे की, २०२५ मध्ये होणार्‍या आसामच्या निवडणुकीत बांगलादेशात जन्मलेली किंवा बांगलादेशातील समर्पित व्यक्ती आसामची मुख्यमंत्री होणार आहे. माझ्या अभ्यासाप्रमाणे व एकत्र केलेल्या माहितीप्रमाणे २९, ३० एप्रिलला झालेल्या हिंसाचाराचा मुख्य हेतू जातीय व सामूहिक वैमनस्य निर्माण करण्याचाच होता. हिंसाचाराच्या प्रत्युत्तरात दुसर्‍या धर्माच्या, समाजाच्या लोकांनीही हिंसाचार करावा व आसाम मधून परप्रांतीय लोकांना नेपाळी मजदूरांना बाहेर जाण्यास भाग पाडण्याची तयारी करायला मदत करावी. ज्या प्रमाणे कश्मीरमध्ये दहशतवादी तत्त्वांनी स्थानिक राजकीय पक्षांच्या मदतीने काश्मिरी पंडिताना काश्मीर सोडण्यास भाग पाडले. काश्मिरी पंडित भारतातच शरणार्थी झाले. तेच पुन्हा आसाममध्ये घडवण्याचे षडयंत्र आहे. आसामी व मुस्लिम समाजात शंका व वैमनस्य निर्माण करायचे, दुसरे बंगाली भाषाचे मुस्लिमसमाज व बोडो समाजात शत्रुता निर्माण करायची, तिसरे आसाममध्ये कार्यरत परप्रांतीय व्यवसायी, उद्योजक, शासकीय कर्मचारी व अधिकारी वर्गाला आसाममधून पलायन करायला भाग पाडायचे. त्यांची मालमत्ता जमीन स्वत:च्या ताब्यात घ्यायची, अशी योजना आहे. या सर्व गोष्टीचा सातत्याने अभ्यास व विश्लेषण केले, तर आपल्या लक्षात येईल, की आसाममध्ये सारखा हिंसाचार का होत राहातो? आताच ५ एप्रिल २०१४ ला बातमी आली आहे, की आसाममधील राज्यशासन मुस्लिम समाजाच्या गावांना स्व:रक्षणासाठी शस्त्र देण्याचा विचार करत आहे. आसामसारख्या धार्मिक रूपाने संवदेनशील राज्यात या प्रकारचे पाऊल उचलण्याची काय गरज आहे? आताही लोकांकडे शस्त्र आहेतच व त्याचा वापर हिंसाचाराकरता केला जातो; पण जर शासनानेच अधिकृतपणे परवाना दिला, तर सिव्हिल वॉर भडकण्याची शक्यता कशी नाकारता येईल? मुळात ही कल्पना आली कुठून? नागरिकांना शस्त्र प्रशिक्षण कोण देणार? त्या शस्त्रांची जबाबदारी कोण घेणार? या सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचा विचार कोणी केला आहे का? या प्रकारच्या चुकीच्या कल्पनेला प्रोत्साहन देणारे तत्त्व व पुढारी कोण? त्याचा दूरगामी हेतू व दृष्टिकोन काय आहे? केंद्रशासन व राज्यशासन नागालँड, मणीपूर, त्रिपुरा या राज्यात झालेल्या हिंसाचार बंडाळीपासून काहीच शिकायला का तयार नाही का? केंद्र व राज्यशासन निष्क्रिय असमर्थ व असाह्य ठरल्यामुळेच भारतात नक्षलवादाचा जन्म झाला आणि तोच आता देशभरात पसरला आहे.

 


Web Title: Rapidly spreading Brahmaputra fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.