रंगरेषेचा संवेदनशील भाष्यकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 00:59 IST2018-07-20T00:59:20+5:302018-07-20T00:59:27+5:30
आयुष्यभर कुंचल्याचे फटकारे देत सामान्य माणसाच्या कोंडमाऱ्याला वाट करून देणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त...

रंगरेषेचा संवेदनशील भाष्यकार
-विजय बाविस्कर
आयुष्यभर कुंचल्याचे फटकारे देत सामान्य माणसाच्या कोंडमाऱ्याला वाट करून देणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त... रंगरेषेच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या कोंडमा-याला वाट करून देण्यासाठी आपला कुंचला आयुष्यभर चालविणारे व्यंगचित्रकार, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य करणारे संवेदनशील भाष्यकार, मिश्कील शैलीत नाटकांचा टोकदार मागोवा घेणारे नाट्यसमीक्षक, वाहतुकीच्या प्रश्नाला वाचा फोडणारे सजग नागरिक, असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे मंगेश तेंडुलकर.
व्यंगचित्रकार हा समाजाचा जागल्या. मार्मिक भाष्य करताना व्यंगावर बोट ठेवून समाजजागृतीसाठी ते आयुष्यभर कृतिशील राहिले. सामाजिक समस्यांवर प्रभावीपणे भाष्य करणारे मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांतून नेहमीच विविध शैलींचे दर्शन व्हायचे. त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते या समस्या मांडताना सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत वावरून प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून कार्य करीत असत. समाजजागृतीचे व्रत त्यांनी अव्याहतपणे चालू ठेवले होते. पुण्यातील वेगवेगळ्या भागात नियमभंग करणाºयांना गुलाबाचे फूल आणि वाहतूक नियमांचे पत्रक वाटताना ते नेहमी दिसायचे. पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. यासाठी त्यांनी व्यंगचित्रांच्या अनेक मालिका रेखाटल्या. त्यांच्या अनेक प्रदर्शनांची मुख्य संकल्पना ही वाहतूक नियमांचे पालन असायची. वृत्तपत्रांपासून सोशल मीडियापर्यंत सर्व साधनांचा ते लीलया वापर करीत असत. व्यंगचित्रे ही केवळ राजकीय स्वरूपाचीच असतात, असा अपसमज तेंडुलकरांनी दूर करून सामाजिक विषयांना व्यंगचित्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा अव्याहत प्रयत्न केला. प्रशासकीय यंत्रणेवरही त्यांनी अनेकदा कोरडे ओढले; परंतु त्यामध्ये जागृती करणे, हाच त्यांचा मूळ उद्देश असे. पुणे पोलिसांनी वाहतुकीच्या संदर्भात कोणताही उपक्रम आयोजित केला की त्याला तेंडुलकर आवर्जून उपस्थित राहत. वाहतुकीच्या प्रश्नासंदर्भात प्रशासनावर व्यंगचित्रांच्या माध्यमातून फटकारे मारताना नियमभंग करणाºया नागरिकांनाही त्यांनी अंतर्मुख केले. रंगरेषांमधून भाष्य करून व्यंगचित्रकार जगाला चांगल्या वाटेवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असतो, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
समाजातील विविध स्तरांमधील घडामोडी, प्रश्न बातम्यांमधून मांडले जावेत, यासाठी ‘लोकमत’ची विविध क्षेत्रातील मान्यवरांची सल्लागार समिती आहे. तिचे ते क्रियाशील व महत्त्वाचे सदस्य होते. या बैठकांमध्ये केवळ औपचारिक हजेरी न लावता चर्चेत सक्रियपणे सहभागी होऊन ते मार्गदर्शन करीत. समाजहितासाठी प्रसंगी अतिशय परखड भूमिका मांडत असत. जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त ‘लोकमत’तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंकाचे अतिथी संपादकपद तेंडुलकर यांनी भूषविले होते. या व्यासपीठावरून त्यांनी व्यंगचित्रकलेच्या अभ्यासक्रमाचा अभाव, राजकीय व्यक्तींचा व्यंगचित्रकारांवरील दबाव, नवोदित व्यंगचित्रकारांची अस्वस्थता, साहित्य संमेलनांपासून दूर राहिलेली व्यंगचित्रकला, बदलती सामाजिक परिस्थिती, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला येणाºया मर्यादा अशा अनेकविध विषयांबाबतची भूमिका ठामपणे मांडली.
रंगरेषेचे अनोखे भाष्यकार असलेल्या मंगेश तेंडुलकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत केवळ व्यंगचित्रे काढलीच नाहीत, तर वेळोवेळी त्यांची प्रदर्शने भरवून लोकांनी ती पाहावीत यासाठीही अविरत कष्ट घेतले. समाजप्रबोधन केले. त्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे व्यंगचित्रकलेला प्रोत्साहन मिळत राहिले. ‘चांगल्या हेतूने कलेची आराधना केल्यास ती नक्कीच साध्य होते,’ यावर त्यांचा विश्वास होता. व्यंगचित्रांच्या माध्यमातून मंगेश तेंडुलकर कायम आपल्यासोबत आहेत, राहतील.