शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

चित्रपटसृष्टीतील राजबिंडा आणि दिलदार ‘देवमाणूस’! अशोक सराफ यांंच्या लेखणीतून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 10:09 IST

रमेश देव यांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली. शून्यातून विश्व उभे केले आणि शेवटपर्यंत टिकवून ठेवले. अनेकांना मोठे केले; पण त्यांच्यातला देवमाणूस कधी हरवला नाही.

अशोक सराफ

रमेश देव ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व होते. रमेशजींच्या जाण्यामुळे चित्रपट आणि रंगभूमीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. नव्या आणि जुन्या अनेक कलाकरांसाठी ते खरोखरच ईश्वराचं रूप होते. त्यांच्या विद्यापीठातूनच या कलावंतांनी अभिनयाचा श्रीगणेशा केला. सहकलाकारालाही अनेक गोष्टी ते शिकवत,  प्रेमानं समजावून सांगत. त्यात आपलेपणाचा भाव खूपच मोठा होता. इतक्या कलाकारांना त्यांनी मदत केली, पण त्याचा कुठलाही गर्व किंवा मीपणा त्यांच्यात नव्हता. अखरेच्या क्षणापर्यंत तर ते कार्यरत होतेच, पण आपल्या आयुष्यात त्यांनी कधी कोणाला दुखावले असेल असे मला वाटत नाही. अभिनयात ते बाप होते, यात दुमत नाही. हिंदी चित्रपटात ते रमले; पण मराठी चित्रपटसृष्टीही त्यांनी अतिशय गाजवली. माझी आणि त्यांची चांगली मैत्री होती असे म्हणण्यापेक्षा ते मला आपला धाकटा भाऊच मानत. आम्ही मराठीत अनेक सिनेमे एकत्र केले आहेत. परंतु चित्रपटसृष्टीत माझ्या करिअरची सुरुवातच त्यांच्यासोबत झाली आहे. त्यांच्या शेवटच्या सिनेमातही मी त्यांच्यासोबत काम केले आहे. ‘दरियाला आयलंय तुफान भारी’ हा खरं तर माझा चित्रित झालेला पहिला सिनेमा होता. या सिनेमाचे ते हिरो होते. माझा पहिला शॉटही त्यांच्याबरोबरच होता. माझा सिनेमातील पहिला शब्द मी त्यांच्यासोबतच उच्चारला होता. हा सिनेमा रखडला म्हणून उशिरा रिलीज झाला. त्यांचा शेवटचा सिनेमा होता ‘जीवनसंध्या’. त्यातही मी त्यांच्यासोबत होतो. त्यानंतर त्यांनी चित्रपटात काम करणं बंद केलं होतं. या सिनेमात सीमाताईही होत्या.

रमेश देव अभिनयात जसे उत्तम, तसेच स्वभावानेही अतिशय दिलदार, मनमिळावू. जाहिराती आणण्यासाठी आम्हाला त्यांचा पुष्कळ फायदा व्हायचा. ते नेहमीच माझ्या कामाची प्रशंसा करायचे. मला बरेचदा सल्ला द्यायचे की खूप धावपळ करू नकोस, शांतपणे काम कर. तुला जमेल तसं काम कर, अंगाबाहेर घेऊन काम करू नकोस. प्रकृती जप.. संपूर्ण कुटुंबच अतिशय सज्जन आणि प्रत्येकाला जीव लावणारं. सीमाताई तर माझी माेठी बहीणच होती. अजिंक्यनेही माझ्याबरोबर खूप कामं केली आहेत.  रमेश भय्या म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील राजबिंडा आणि देखणा नायक होता. त्यांचं रुबाबदार आणि चिरतरुण व्यक्तिमत्त्व पडद्यावर अतिशय शोभून दिसायचं. अनेक भूमिका त्यांनी अक्षरश: जिवंत केल्या. त्यांच्या अस्सल भूमिकांची यादी तरी किती करावी?.. प्रत्येक भूमिकेच्या ते आत शिरत आणि समरसून ती भूमिका करीत. त्यांची भूमिका पाहाताना त्यात ‘रमेश देव’ नव्हे, तर ती व्यक्तिरेखा दिसायची. अतिशय दिलदार असा माणूस आपण आता गमावून बसलो आहोत. 

मोठा असल्याचा टेंभा या माणसाने कधीही मिरवला नाही. देखणं रूप आणि उत्साह त्यांच्यात पुरेपूर भरलेला असायचा. त्यांचे पडद्यावरील आणि प्रत्यक्षातील दर्शनही नेहमीच साजरं असायचं. खलनायक म्हणूनही अनेक भूमिकांचं त्यांनी सोनं केलं. ते आपला संवाद जरी सहज म्हणतात असे वाटले तरी त्यातही त्यांची खास शैली होती. त्यांच्यासाठी वय म्हणजे केवळ एक आकडा होता. ते हजरजबाबी तर होतेच; पण त्यांची विनोदाची जाणही अतिशय उत्तम होती. त्यांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली.. शून्यातून विश्व उभे केले आणि शेवटपर्यंत टिकवून ठेवले. हाती काही नसताना त्यांनी सुरुवात केली आणि कुठल्या कुठे पोहोचले. अडचणी सगळ्यांनाच येतात, त्यांनाही आल्या, पण त्याचा बाऊ न करता आपली वाटचाल ते चालत राहिले. असा देवमाणूस पुन्हा होणे नाही..(शब्दांकन : संदीप आडनाईक)

टॅग्स :Ramesh Devरमेश देवAshok Sarafअशोक सराफcinemaसिनेमाbollywoodबॉलिवूड